प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.          

अशोकोत्तरकालीन ग्रीक राजांचे खरोष्ठी लेख:- अशोकाच्या नंतर लिपि बहुतांशी परकीय राजांच्या नाण्यांवर व लेखांमध्येंच पहावयास सांपडते. ख्रि. पू. ३२६ सालीं अलेक्झांडर उर्फ शिकंदर बादशहानें हिंदुस्थानावर स्वारी करून पंजाबांतील बहुतेक भागावर व सिंध प्रांतांत आपला अम्मल बसविला. या ठिकाणीं जरी ग्रीक लोकांचा अंमल पुरीं १० वर्षें देखील टिकला नाहीं, तरी हिंदुकुश पर्वताच्या उत्तरेस ‘बॅक्ट्रिया’ (बलख) देशांत मात्र त्यांचें राज्य चिरस्थायि झालें होतें. तेथील  युथिडेमॉस राजाच्या कारकीर्दीत बहुधा त्याच्या डिमेट्रिऑस नामक मुलाच्या हाताखाली ख्रि. पू. दुसर्‍या शतकाच्या प्रांरभाच्या सुमारास ग्रीक लोकांनी हिंदुस्थानावर पुन्हां स्वारी करून काबुल व पंजाब हे दोन्ही प्रांत आपल्या अमलाखालीं आणले. या ठिकाणीं नंतर अंमल वाढत, कमी होत, जवळ जवळ इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या अखेरपावेतों कायम राहिला. अफगाणिस्थानांत व पंजाबांत या राजांची जी कित्येक नाणी सांपडलीं आहेत त्यांच्या एका बाजूस प्राचीन ग्रीक लिपीतील अक्षरें असून दुसर्‍या बाजूस खरोष्ठी लिपीचे प्राकृत भाषेंतील लेख आहेत [पर्सी गार्डनर कॉ;ग्री. सी.प्लेट ३-१५. व्हा; कॅ.कॉ. पं. म्यु. पुस्तक १,प्लेट १-९; व स्मि. कॅ.कॉ इ. म्यु. प्लेट १-६ ].