प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
अरमइकपासून खरोष्ठीची उत्पत्ती:- इराणी बादशहांनी अरमइक लिपि हिंदुस्थानांत आणिल्यानंतर पुढें त्यांच्याच कारकीर्दीत त्या लिपीपासून खरोष्ठीची उत्पत्ति झाली असावी असें मानण्यास पुष्कळ जागा आहे. कारण इराणच्या बादशहांची जी नाणी उपलब्ध झाल्याविषयीं मागें एका ठिकाणीं उल्लेख आला आहे त्यांवर ब्राह्मी व खरोष्ठी ह्या दोन्हीहि लिपीतील अक्षरांचे ठसे सांपडत असल्यामुळें, इराणी लोकांचा हिंदुस्थानाशी संबंध आला असतांनाच खरोष्ठीचा जन्म झाला असला पाहिजे असें अनुमान काढणें प्राप्त होतें. अरमइकमध्ये फक्त २२ सच वर्ण असून त्यांपासूनहि ब्राह्मीतील केवळ १८ च निरनिराळ्या वर्णांच्या उच्चारंचें कार्य होत असल्यामुळें, भरतखंडातील भाषांकरितां ती लिपि होती तशीच उपयोगी पडणें शक्यच नव्हतें. परंतु राजकीय पत्रव्यवहारांत व व्यापाराच्या कामी त्याच लिपीचा उपयोग होत असल्या कारणानें तींतच थोडीफार सुधारणा करून आपल्या भाषेंतील पत्रव्यवहाराच्या कामीं तिचा उपयोग करण्याची अवश्यकता इराणी बादशहाच्या अमलाखाली असलेल्या त्या काळच्या भरतखंडातील लोकांस वाटणें अगदी साहजिक होते, हें कार्य चिनी ज्ञानकोशांत म्हटल्याप्रमाणें खरोष्ठ नामक एखादा भारतीय पंडितानें हातीं घेऊन पार पाडलें असल्यास व त्याच्या नांवावरूनच पुढें ह्या लिपीस खरोष्ठी हें नांव मिळालें असल्यास ती कांही अशक्य कोटींतील गोष्ट नाहीं. इराणी लोकांचा हिंदुस्थानाशीं जो संबंध आला तो ख्रि. पू, सहाव्या शतकाच्या उत्तरार्धांतच आला असल्यामुळें ख्रि. पू. पांचव्या शतकाच्या सुमारास अरमइकपासून खरोष्ठीची उत्पत्ति झाली असावी असें अनुमान काढण्यास कोणताहि प्रत्यवाय दिसून येत नाहीं.