प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.       

अथर्ववेदान्तर्गत उल्लेख:-  अथर्ववेदामध्ये एका ठिकाणीं ‘यद्यद्युत्तं लिखितमर्पणेन | (१२.३,२२) असा उल्लेख आहे. याचा अर्थ जें जें कांहीं अर्पणेन म्हणजे सुव्यवस्थेनें लिहलेलें प्रकाशित असेल तें असा होतो.

दुसरा उल्लेख ‘क एषां कर्करी लिखत्’ | (२०.१३२,८) असा आहे.

यांखेरीज ऋग्वेदामध्ये आढळणारे पुढें दिलेले अक्षराविषयी उल्लेखहि अथर्ववेदांत आढळून येतात :-
ऋचो अक्षरे परमे व्योमन् | (.१५,१८).
अक्षरेण मिमते सप्तवाणी: | (.१५,२).
अक्षरेण प्रतिमिमीते अर्कम् ऋतस्य नाभावभि संपुनाति | (,३,४०).

अष्टापदी नवपदी बभूवुषी सहस्त्राक्षरा भुवनस्य पंक्तिस्तस्या: समुद्रा अधिविक्षरन्ति | (,१५,२१).

ऋच: पदं मात्रया कल्पयन्तो (.१५.१९).

येथें अक्षर या शब्दावर विशेष जोर दिलेला आहे, याचीं कारणें दोन आहेत. अक्षर या शब्दाच्या यौगिक अर्थावरून जें क्षरत नाहीं ते अक्षर म्हणजे बोललेल्या वाचेपेक्षां ज्यामध्ये अधिक स्थायिपणा आहे अशी वाणी, अर्थात् जी दुसर्‍या कोणत्या तरी पदार्थावर अंकित केलेली आहे अशी वाणी असाच अर्थ होतो. आजहि आपणांमध्ये काळ्या धोंड्यावरची रेघ म्हणून जी म्हण प्रचारांत आहे, तीवरून दगडावर काढलेली किंवा कोरलेली रेघ कायमची अक्षर अशी होते अशी समजूत व्यक्त होते. अक्षरांचें अस्तित्व ही लिपांच्या विकासांतील सर्वांत शेवटची व परिणत अवस्था कशी आहे, याचें विवेचन मागें आलेच आहे. अर्थात् वर उध्दृत केलेले मंत्र ज्या कालीं रचले गेले, त्या काली ब्राह्मी लिपि अथवा संकृत वाणी ही यापूर्वीच्या दोन्ही अवस्थांतून पलीकडे गेली होती व पूर्णावस्थेस पोंचून तिची वर्णमाला तयार झाली होती असें स्पष्ट होतें.