प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
ब्राह्मी लिपीच्या उत्पत्तिशोधार्थ प्रयत्न:- प्राचीन काळीं हिंदू लोकांनां लेखनकला अवगत नव्हती असें पाश्चात्त्य पंडितांनी प्रथम ठरवून टाकलें. अर्थात मग त्यांना हिंदू लोक ती कला कोणापासून शिकले अथवा त्यांनी आपली ब्राह्मी लिपि कोणत्या लिपीपासून तयार केली याचा निर्णय करणें साहजिकच प्राप्त झालें. या विषयावर निरनिराळ्या पंडितांनी निरनिराळी मतें प्रकट केलीं आहेत. डॉ० आल्फ्रेड मूलर, प्रिन्सेप व सेनार्ट [ इं. अँ. पु. ३५, पान २५३ ] या विद्वानांचें असें मत आहें कीं, शिकंदर बादशहाच्या स्वारीनंतर-म्हणजे ख्रि.पू. ३४५ सालच्या सुमारास- हिंदू लोकांचा ग्रीक लोकांशी परिचय झाला तेव्हां त्यांनीं ग्रीक लिपीपासून आपली ब्राह्मी लिपि तयार केली. कस्टचें मत [ ज,रॉ.ए.सो.पु.१६ पानें ३२९ व ३५९ ] याहून भिन्न आहे. तो म्हणतो कीं, ज्या अर्थी ग्रीक, रोमन व सेमेटिक या सर्व लिपी फिनीशियन लिपीपासून निघाल्या व ज्या अर्थी ख्रि. पू. आठव्या शंतकांत लेखनकला अवगत असलेल्या या फिनीशियन लोकांचा व्यापारामुळें भरतखंडांतील लोकांशी संबंधहि येत होता, त्या अर्थी या देशांतींल ब्राह्मी लिपि फिनीशियन लिपीपासूनच निघाली असली पाहिजे. रॅप्सन [ रॅ. ए. इ. पानें १७-१८ ] यानें मोआबच्या लेखातींल फिनीशियन लिपीपासून ब्राह्मीची उत्पत्ति मानली आहे. तथापि विल्सन [ इं. अँ. पु. ३५ पान२५३] यानें ग्रीक व फिनीशियन यांपैकी कोणत्यातरी एका लिपी-पासून ब्राह्मी निघाली असावी असें आपलें संदिग्धच मत दिलें आहे: व स्टीव्हन्सनला [ ज.बाँ. ब्रँ, राँ. ए. सो. पु. ३ पान ७५ ] ब्राह्मी लिपि एक तर फिनीशियन लिपीपासून निघाली असावी किंवा मिसर देशच्या हिअरेटिक लिपीपासून तरी तिची उत्पत्ति झाली असावी असें वाटतें. पॉल गोल्डस्मिथचा [ अकॅडेमी; इ. स १८७७ ता. ९ जानेवारी ] असा अजमास आहे कीं, फिनीशियनपासून अगोदर सिलोनची लिपि व सिलोनच्या लिपीपासून मग ब्राह्मी लिपि तयार झाली असावी; पण ई, मूलरला [ रिपोर्ट ऑन एन्शंट इन्सिक्पशन्स ऑफ् सिलोन पृष्ट २४ ] हें मत मान्य नाही; कारण तो म्हणतो कीं, भरतखंडांत ज्या काळीं लेखनकला प्रचलित होती त्या काळीं सिलोनच्या लोकांस तिचें ज्ञानहि नव्हतें. बर्नेलचा [ ब.सा.इं.पॅ. पान ९ ] असा तर्क आहे कीं, फिनीशियन पासून निघालेल्या ‘ अरमइक ‘ अक्षरांपासून ब्राह्मीची अक्षरें तयार झाली असावी. पण आयझॅक टेलरला [ अल्फा बेट; पु. २ पान ३१३ ] ‘ अरमइक व ब्राह्मी या दोन लिपीत कांहीच साम्य दिसत नाहीं. त्याचें म्हणणें असे आहे कीं, (सूचना – मूळ प्रत पान नं ५४ व ५५ मधील मजकुरासंबंधी काय करायचे? ते ठरवणे.) लिपि ही आपणास ठाऊक नसलेल्या कोणत्या तरी एखाद्या दक्षिण सेमेटिक लिपीपासून निघाली असावी व त्या लिपीचा जरी आपणांस अजूनपर्यंत पत्ता लागला नाहीं तरी तिचे लेख पुढे मागें ऑर्मझ, ओमान किंवा हॅड्रामांट यांपैकीं कोठें तरी आढळून येण्याचा संभव आहे. लेर्नामाँट [ एसे ऑन फिनीशियन अल्फाबेट; पु.१ पा. १५० ] व एडवर्ड कॉल्ड [ स्टोरि ऑफ् दि अल्फाबेट; पा, २०७ ] यांचें असें अनुमान आहे कीं, फिनीशियन पासून ‘ हिमिअरिटिकची ’ व हिमिअरिटिक’ पासून ब्राह्मीची उत्पत्ति झाली असावी. र्हीस डेव्हिड्स [ डे. बु. इं. पान ११४ ] यानें निरनिराळ्या विद्वानांच्या निरनिराळ्या मतांची एकवाक्यता करण्याकरितां, ब्राह्मी लिपि ही उत्तर सेमेटिकपासून निघाली नाहीं किंवा दक्षिण सेमेटिपासूनहि निघाली नाही असें सांगून, ज्या लिपीपासून उत्तर व दक्षिण सेमेटिक या दोन्हीहि लिपी निघाल्या अशा एका युफ्रेटिस नदीच्या आसमंत भागीं प्रचलित असलेल्या लिपीपासून ब्राह्मी लिपीचा संभव झाला, असा सिद्धांत काढण्याचें धाडस केलें आहे. वेबर [ इंडिश्चस्किझेन पृ.२२५-५० ] व विल्यम जोन्स, मॅक्समुल्लर, व्हिटनी इत्यादि कित्येक [ इं. अँ. पु. ३५ पा. २५३ ] विद्वानांचें मत ब्राह्मी लिपि सेमेटिकपासूनच निघाली असावी असें पडतें. पण हॅलवेला [ जर्नल एशियाटिक; इ, स. १८८५ पा. २६८ ] ब्राह्मीची कांही अक्षरें ग्रीकपासून, कांही खरोष्टीपासून व कांही ‘अरमइक ’ पासून निघालेलीं दिसतात. सन १८९५ साली बुद्दलर यानें ‘भरतखंडातील ब्राह्मीलिपीची उत्पत्ति ’ या नावाचें एक पुस्तक छापून त्यांत असे सिद्ध केलें आहे कीं, ब्राह्मी लिपीची २२ अक्षरें उत्तर सेमेटिकपासून घेतलीं गेली व बाकीचीं अक्षरें त्याच अक्षरांपासून तयार करण्यांत आलीं. मॅक्डोनेल्ड [ हि.सं. लि. पान १६ ], डॉ. बार्नेट [ अँटिक्विटीज ऑफ् इंडिया पा. २२५ ] वगैरे कांही विद्वानानीं पुढें बुद्दलरच्या मतासच आपली संमति दर्शविली. डीकेचें मत मात्र कांही निराळेंच आहे. त्याला क्युनिफॉर्म म्हणजे कीलाकृति लिपीपासून निघालेल्या एखाद्या लिपीवरून ब्राह्मीची अक्षरें घडलेलीं दिसतात.
जगांतील मुख्य मुख्य प्राचीन लिपींचा तुलनात्मक आकृतिपट | |
ब्राह्मीपासून नागरी लिपीचा विकास / ब्राह्मीपासून कानडी लिपीचा विकास |