प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
अंकज्ञान:- ऋग्वेदामध्यें नाभानेदिष्टानें एक हजार अष्टकर्णी गाई दान करण्याकरितां सावर्णि राजाची स्तुति केली आहे [ ‘ सहस्त्र मे ददतो अष्टकर्ण्य;’ (ऋग्वेद सं.१०.६२.,७२)]. या ठिकाणी अष्टकर्णी गाय म्हणजे जिच्या, कानावर आठाच्या आंकड्याचें चिन्ह केलें आहे अशी गाय असाच केला पाहिजे [ कर्णे लक्षणस्याविष्टाष्टपत्र्चमणिभिन्नछिन्नछिद्रस्तुवस्वस्तिकस्य (६.३,११५); कर्णो वर्णलक्षणात् (६.२.११२) हीं पाणिनीची सूत्रें व त्यांवरील काशिकेंतील व्याख्यान पहा ]. कारण वेदकाळांतील ऋषी आपापल्या गाई ओळखतां याव्या म्हणून त्यांच्या कानांवर कांहीतरी खूण करीत असत असें मानण्यास पुष्कळ आधार आहे [ अथर्व सं. ६.१४१; व १२.४,६ आणि मैत्रायणी सं.४.२,९ पहा ]. मैत्रायणी संहितेंत तर हें चिन्ह कोणत्या मुहूर्तावर करावें व कसें करावें या संबंधांत एक प्रकरणचें प्रकरण दिलें आहे. प्रत्येक ऋषीचें अलग अलग चिन्ह असून त्या चिन्हावरून गाईस नांव असे. उदाहरणार्थ, वसिष्ठाची स्थूणाकर्णी ( म्हणजे स्तंभचिन्हांकित ) इत्यादी.
वेदकाळांत जुगार खेळण्याची चाल बरीच प्रचारांत होती. राजसूय यज्ञांत ‘ अभिभुरसि ‘ हा मंत्र ह्मणून यजमानाच्या हातीं पांच अक्ष देण्याचा विधि आहे. [यजु. वाज. सं. १०.२८] या पाच [ कृतमयांना... त्रेतायांना... द्वापरोऽयानां...... आस्कंदोऽयानां......अमिभूरयांना ’ (तैत्ति. सं. ४.३,३). अक्षराजाय कितवं कृतायादिनवदशं त्रेतायै कल्पिनं द्वापरायाधिकल्पिनमास्कंदाय सभास्थाणुं (यजु. वाज. सं. ३०.१८). यांतील अक्षराज म्हणजे कलि.] अक्षांपैकीं पांचाचा आंकडा असलेल्या [ ‘अथ ये पत्र्च कलि: स: ‘ (तैत्ति. ब्रा.१.५,११,१) कलि नांवाच्या अक्षाचेंच दुसरें नांव ‘एष वा अयनभिभूर्यत्कलिरेषहि सर्वानयानभिभवति ‘ [ शतपथ ब्राम्हण ५.५,४,६; तैत्तिरीय ब्राह्मण ३.४.१.१६ व यजु. वाज. सं. ३०.१८ ही ऐकमेकांशी मिळवून पाहिलीं असता कळून येईल कीं, कलि = अभिभू = अक्षराज. ] अभिभू असून, तो जिंकणारा अक्ष होता म्हणून ‘अभिभूरसि’ या मंत्राचा अर्थ तूं जिंकणारा आहेस असा होतो. दुसर्या एका जुव्याच्या खेळांत कृत, त्रेता, द्वापर व कलि या नांवाचे जे चार अक्ष वापरीत असत त्यांवर अनुक्रमें ४,३,२ व १ हे अंक खोदविलेले होते [ रॉथ व बोथलिंग यांचा संस्कृत कोश (वार्टेबुख्) ]. चार अक्षांपैकी चोहोंचा आंकडा असलेला कृत हा जिंकणारा अक्ष होता [कलि:शयानो भवति संजिहानस्तु द्वापर:| उत्तिष्टंस्त्रेता भवति कृतं संपद्यते चरन् || (ऐतरे. ब्रा. ७.१५). अर्थ:- कलि ( नांवाचा अक्ष ) निजला आहे, द्वापरानें आपलें स्थान सोडलें आहे, त्रेता अजून उभा आहे व कृत चालून राहिला आहे ( तुला यश मिळवण्याची आशा आहे ). यत्न करीत रहा; ‘कृत यजमानो विजिनाति ’ ( आपस्तंब श्रौतसूव ५.२०१ ); कृत मे दक्षिणें हस्ते जयो मे सव्य आहित: ’ (अथर्व सं.७.५० [ ५२ ]. ८); ‘ समेतु विश्वतो भगो अन्तर्हस्तं कृतं मम ’ (अथ. सं. ७-५० [ ५२ ]. ८); ‘ चतुरश्चिद्दमानादबिभीयादा निधातो: (ऋग्वे. सं. १.४१,९); ‘ यथा कृताय विजितायाधरेया: संयन्त्येवमेनं सर्वे तदभिसमेति यत्किं च प्रजा: साधु कुर्वन्ति ’ (छांदोग्य. उपनि.,४.१४.६) यावरील शंकराचार्यांचें भाष्य- ‘कृतो नाम अयो द्यूतसमये प्रसिद्धश्चतुरङक: स यदा जयति द्यूते प्रवृत्तानां तस्मै विजिताय तदर्थभितरं त्रिद्वे [?] काङका: अधरेया: त्रेताद्वापरकलिनामान: संयन्ति संगच्छन्ते अन्तर्भवन्ति’ ]. ऋग्वेदांतील एक सबंध सूक्तचें सूक्त [ऋग्वे. सं.१०.३४ ] एका जुगार्याच्या विलापानें भरलेलें आहे. त्यातं तो म्हणतो कीं, एकपर अक्षामुळें मी आपली पतिव्रता स्त्री गमावून बसलों. येथे एकपरचा अर्थ ज्याच्यावर एक ह्या आंकड्याचें चिन्ह आहे तो अक्ष. द्वापर व त्रेता हीं नावेंहि त्या त्या अक्षावरील अंकाच्या चिन्हावरूनच पडली असावी. पाणिनीच्या ‘ अक्षशलाकासंख्या: परिणा ’ (२.१-१०) या सूत्रावरून व कात्यायनाच्या, पतंजलीच्या व काशिकेंतील त्या सूत्राच्या व्याख्यानावरूनहि वरील अनुमानासच पुष्टि मिळते. कारण त्यावरुन आपणांस असें कळतें कीं, परि ह्या शब्दाचे ‘वाईट अक्ष ’ या अर्थी अक्ष व शलाका या शब्दाप्रमाणें एक,द्वि त्रि व क्वचित् प्रसंगी चतु: इतक्या संख्यावाचक शब्दांशी अव्ययीभाव समास होत असत [ उदाहरणार्थ अक्षपरि, शलाकापरि, एकपरि, द्विपरि इत्यादि ] व अक्ष व शलाका या शब्दांशी तो एकवचनांतच होत असल्यामुळें [ ‘अक्षेण विपरीतं वृतम् ‘ अक्षपरि ], द्वि, त्रि व चतु: या शब्दांशीहि तो एकवचनांतच होत असला पाहिजे. अर्थात् एक, द्वि, त्रि व चतु: हे शब्द एक, दोन, तीन व चार ह्या अर्थी वापरले नसून तेथें त्यांचा त्या त्या अंकाचें चिन्ह ज्यांवर आहे असे अक्ष असाच अर्थ केला पाहिजे हें उघड आहे.