प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.         
 
अशोककालीन व तत्पूर्वीचें खरोष्ठी लिपींतील लेख:-  अलेक्झांडर बादशहाच्या हिंदुस्थानावरील स्वारीनंतर पंजाबांत इराणी लोकांचा अंमल राहिला नसल्यामुळें  ही नाणीं ख्रिस्तपूर्व चवथ्या शतकांतील असण्याचा पुष्कळ संभव आहे. अशोकाच्या लेखांपैकी फक्त शहाबाजगढी व मान्सेरा या ठिकाणचे शिलालेखच खरोष्ठी लिपीत खोदविलेले आहेत. यावरून असें दिसतें कीं, ही लिपि त्या काळी केवळ गांधार देशांतच, म्हणजे हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवरील पेशावर व रावळपिंडी जिल्ह्यांत व अफगाणिस्थानांतील काबुल जिह्यांतच प्रचलित होती. म्हैसूरच्या राज्यांतील सिपूर येथील अशोकाच्या लेखांतील शेवटच्या म्हणजे तेराव्या ओळींत ‘ पडेन लिखितं ‘ या शब्दानंतर लिहलेली ‘लिपिकरेण’ ही पांच अक्षरें व भरहुतच्या स्तूपावरील दरवाजावरहि कोठें कोठें एखादें अक्षर खरोष्ठी लिपींत खोदलेलें आहे. परंतु त्यावरुन अनुमान निघूं शकतें कीं, हे लेख खोदणारीं माणसें पंजाबाकडील असून त्यांना खरोष्ठी लिपीचेंहि ज्ञान होतें, म्हणून त्यांनीं कांहीं कांही अक्षरें त्या लिपीचीं काढलीं.