प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
कुशन राजांच्या कारकीर्दीतील लेख:- कुशनवंशी राजे मध्यअशियांतून हिंदुस्थानांत आले. यांनां कवि कल्हण आपल्या राजतरंगिणींत तुरूष्क म्हणजे तुर्कवंशी म्हणतो. कुशनवंशी राजांच्या नाण्यांवर त्यांची जी चित्रें दिलीं आहेत त्यांतील त्यांच्या तुर्की पोषाखावरूनहि कल्हणच्या म्हणण्यासच पुष्टि मिळते. या राजांपैकीं कुजुल कडफिसेस, कुजुलकर कडफिसेस व वेम कडफिसेस या तीन राजांच्या नाण्यांवर खरोष्ठी लेख आहेत ; परंतु कनिष्क हुविष्क व वासुदेव यांच्या नाण्यांच्या दोन्हीहि बाजूसं ग्रीक लिपींतील लेख आढळून येतात [ गा; कॅ. कॉ. ग्री. सी. प्लेट २५-२६. व्हा; कॅ, कॉ. पं. म्यु. पु.१, प्लेट १७-२०. स्मि; कॅ, कॉ. इ. म्यू; प्लेट ११-१४ ]. कुशनवंशी राजांचे ताम्रपटादि लेख मात्र बरेच सांपडतात. यापैकीं एकट्या कनिष्काचेच [ ज. ए; इ. स. १८९०, भाग १ पा. १३६; इ. अँ; पु. १० पा. ३२६ व पु. ११ पान १२८; क; आ. स. रि; पु. ५ पा. १६० च्या समोरची प्लेट ; आ. स; इ. स. १९०९-१० पा. १३६-३८; इं. अँ. पु. ३८ पा. ५८ ] सात लेख असून त्यांपैकी दोन लेखांवर सं. ११ व एकावर सं. ४१ दिलेला आहे. हे सर्व पंजाब किंवा वायव्य सरहद्दीकडील प्रांत या भागांतच मिळाले आहेत. हुविष्काचा एक लेख [ ए. इं; पु.११ पा. २१०-११ ]. अफगाणिस्थानांत सांपडला असून त्यावरचा संवत् ५१ आहे. कुशनवंशी कोणातरी राजाचे सं. ११२ व सं १३६ मधील आणखीहि दोन लेख [ क; आ. स. रि; पु. ५, पा. १६१ व प्लेट १६, संख्या ४; ज. रॉ. ए. सो; इ. स. १९१४ पा. ९७५-७६ व इ. सं १९१५ पान १९२ च्या समोरची प्लेट ] उपलब्ध झाले आहेत. याशिवाय त्यांच्याच कारकीर्दींतील इतरेजनांचेहि कित्येक लेक मिळाले आहेत [ ज. रॉ. ए. सो; इ. स. १९१५ पान ९२ व त्याच्या समोरची प्लेट; इं. अँ. पु.३७ पान ६६; क; आ. स. रि; पु.५ पा. ५८, प्लेट १६, संख्या २; ज. ए; इ. स. १८९०, भाग १ पा. १३०; इ. अँ; पु. ३७, पान ६४ ; ज. ए; इ. स. १८९४, भाग २, पान ५१४; इं. अँ; पु. ३७, पान ६५; इं. अँ; पु. ३७, पा. ६६; आ. स; इ.स. १९०३-४ पा. २५५; प्लेट ७० संख्या ९; ज ए; इ. स. १८९४ भाग २; पा. ५१०; आ. स. १९०३-४, पा. २५१, प्लेट ७०, संख्या ४; ए. इं; पु. १२, पा. २०२]. या सर्व लेखांवर २८ पासून ३८४ च्या दरम्यानचे संवत् आहेत. हा संवत् कोणता आहे याविषयी निर्णयात्मक असें कांही ठरलें नाही. परंतु तो शक संवत् असावा असा पंडित ओझा यांचा तर्क आहे. यांशिवाय संवत् नसलेले जे लेख सांपडले आहेत ते पुढें दिल्याप्रमाणें आहेत. क; आ. स. रि; पु. २, पा. १३० व प्लेट ५९; ए. इं; पु. १२ पा. ३०१: क: आ.स.रि.पु. २, प्लेट ५९, संख्या ३; ज. ए. सो. बंगा; इ. स. ९०८ पा. ३६४; ए. इं. पु. ८, पा २९६; क; आ. स. रि. पु. २ प्लेट ५९; आ. स; १९०२-३, पा. १६३; आ. स: १९०२-३, पा. १६७,१७६; ए. इ; पु. ७ पा. ११८ च्या समोरची प्लेट; क; आ. स. रि; पु. ५, प्लेट १६, संख्या ५ व ६; आ. स; इ. स. १९०३-४; प्लेट ७०, संख्या २, ३, ५ ,६ व ८, हे बौद्ध स्तूपांत ठेविलेल्या शिलापात्रांवर, सोन्याच्या, चांदीच्या किंवा तांब्याच्या पत्र्यावर, पाषाणावर किंवा देवतादिकांच्या मूर्तीच्या दगडी बैठकीवर खोदविलेले आहेत. यांतील बहुतेक गांधार देशांतच ,व त्यांतूनहि विशेषत: तक्षशिला (पंजाबच्या रावळपिंडी जिल्ह्यांतील शाहढेरी ) व चारसड्डा (पुष्कलावती) येथेंच मिळाले आहेत. पंजाबच्या बाहेर अफगाणिस्थान किंवा मथुरा यांशिवाय अन्यत्र कोठेंहि हे लेख सांपडले नाहीत.