प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.            

खरोष्ठीची आयुर्मर्यादा:- ख्रिस्तपूर्व पांचव्या शतकाच्या सुमारास खरोष्ठीची उत्पत्ति झाली असावी असें वर दाखविण्यांत आलेंच आहे. ज्यांच्यावर कालनिर्दैश केलेला आहे अशा हिंदुस्थानांत सांपडलेल्या खरोष्ठी लेखांपैकी सर्वांत अलीकडचा लेख म्हटला म्हणजे पेशावर जिल्ह्याच्या चारसड्डा तहसीलींतील हरतनगर येथें मिळालेल्या बुच्या मूर्तीच्या बैठकींवरील लेख होय [ ए. इ. पु. १२, पा, २०२]. त्यावर सं. ३८४ असें लिहिलेले आहे. हा सन शालिवाहन शकाचा आहे, किंवा विक्रमसंवताचा आहे, किंवा दुसरा एखादा आहे याचा अद्याप निर्णय झाला नाहीं. पं. ओझा यांचे असें अनुमान आहे कीं, साधारण: इसवी सनाच्या तिसर्‍या शतकापर्यंत ह्या लिपीचा पंजाबांत प्रचार राहून नंतर ब्राह्मी लिपीनें तिचें स्थान घेतलें असावें. हिंदुस्थानांत जरी ही लिपि फार दिवस टिकून राहिली नाही तरी हिंदुकुश पर्वताच्या उत्तरेकडील मुलुखांत व चिनी तुर्कस्थानांत बौद्ध धर्माचा व भारतीय संस्कृतीचा प्रवेश झाला असल्यामुळें तेथें मात्र ती नंतर कित्येक शतकेंपर्यत प्रचलित असावी असें त्यांनां वाटतें. कारण, सुप्रसिद्ध प्राचीनवस्तुसंशोधक डॉ. सर ऑरल स्टाइन यानें चिनी तुर्कस्थानादि देशांतून महत् प्रयासानें ज्या कित्येक पुरातन वस्तू गोळा केल्या आहेत त्यांत खरोष्ठीत लिहिलेलीं पुस्तकें व लांकडाच्या फळ्याहि आहेत.