प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
चीनच्या लेखनसाहित्याचा इतिहास:- चीन देशांतील अत्यंत प्राचीन लेखनसाहित्यांची माहिती त्या देंशात सांपडलेल्या अत्यंत प्राचीन म्हणजे ख्रि. पू. १८०० पासून सांपडलेल्या अवाढव्य अशा भिन्न भिन्न प्रकारच्या लेखांवरून मिळण्यासारखी आहे. चिनी लेखनकलेच्या इतिहासास पौराणिक काळांत आरंभ होत असून त्या वेळेपासून भिन्नभिन्न प्रकारचें लेखनसाहित्य उपयोगांत आणलेंलें दिसतें.
कांशाचीं भांडी:- ह्यांपैकी अत्यंत प्राचीन अशा ख्रि. पू. १८०० पासून ८०० पावेतोंच्या १००० वर्षांच्या कालविभागांतील बरेचसे हस्तलेख कांसे नामक धातूच्या घंटा, मोठमाठ्या कढया व दुसरी अनेक प्रकारचीं कांस्यनिर्मित यज्ञोपकरणें यांवर कोरून लिहिलेले आढळतात.
अस्थिखंड:- परंतु ह्या कालच्या कांही मागाहून ह्मणजे ख्रि. पू. ११०० ते ५००- च्या सुमारास जादूटोणा, मंत्रतंत्र यांच्या निमित्तानें निरनिराळ्या प्राण्यांच्या अस्थिखंडांवर अशुभविनाशक लेख लिहिण्याची पद्धति पडली. हे लेख सामान्य लोक देवालयांतील उपाध्यायांपासून लिहून घेत असत. अशा प्रकारचे हाडकांवरील हस्तलेख चीनच्या उत्तर भागांत बर्याच ठिकाणी सांपडले आहेत. अर्थात् वरील कांस्यपट व हे हाडकांवरील लेख लिहिण्यास कसल्या तरी तीक्ष्ण अशा अणकुचीदार हत्यारांचा लेखणीसारखा उपयोग केला जात असावा. ह्या हाडांवरील लेखांतील लिपींचा उपयोग मागाहून ठशाकरितां केला जात असे.
वेळूच्या लेखण्या:- ख्रि. पू. ५०० च्या सुमारास म्हणजे ‘ चौ ’ राजघराण्याच्या कालांत वेळूच्या किंवा लांकडाच्या लेखण्यांचा लिहिण्याकरतां उपयोग केला जात असें हें निश्चित झालें आहे. अर्थात् अशा प्रकारच्या लेखण्यांकरितां कांही पातळ शाईसारखें द्रव्य लागत असलेंच पाहिजे; परंतु या वेळूच्या लेखण्यांनी कशा प्रकारच्या पदार्थांवर लेख लिहीत असत हें समजत नाहीं.
कुंचले:- वरील “ चौ ” राजघराण्याच्या अमदानीच्या अखेरीस बांबूच्या किंवा लांकडाच्या लेखण्यांचा उपयोग कमी होत जाऊन त्यांच्या जागीं कसल्यातरी प्रकारचे कुंचले उपयोगांत आणण्यास सुरूवात झाली. ह्या कुंचल्यांच्या साधनानें सध्यांच्या वार्निससारख्या एखाद्या द्रवरूप रंगांत लिहिण्याचें काम चाले.
शिलादुंदुभी:- ह्याशिवाय ख्रि.पू. ८ व्या शतकांतील ‘ चौ ’ ‘ हसुअन् ’ राजाच्या कारकीर्दीतील सुप्रसिद्ध असे शिलादुंदुभीवरील लेख नुकतेच प्राचीनवस्तुसंशोधक शास्त्राज्ञांनी शोधून काढले आहेत. त्यांवरून शिलालेखाची पद्धतीहि चीनमध्यें तुरळक तुरळक प्रचारांत असल्याचें दिसतें.
विटा:- नुकतेच थोड्या दिवसांपूर्वी कांही जुन्यापुराण्या घरांच्या अवशेषांत ख्रि. पू. १५० वर्षाच्या काळचे कांही मातीच्या विटांवर कोरून लिहिलेले ग्रंथ सांपडले आहेत. अर्थात् हे ग्रंथ बाबिलोन व असुरिया येथील विटांवरील लेखांसारखेच शंकूसारख्या एखाद्या अणकुचीदार पदार्थानें लिहलेले दिसतात.
आतां आपण चीनच्या शेजारी असलेला जो आपला देश त्याच्या लेखनसाहित्याच्या इतिहासाकडे वळू.