प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.       

दोन लिपींतील परस्पर संबंध शोधून काढण्याची कसोटी:- दोन लिपींचा परस्पर संबंध आहे किंवा नाही हें शोधून काढण्याचा एकच मार्ग आहे; व तो हा कीं त्या दोन लिपींतील सदृश उच्चार होणार्‍या वर्णांचें एकमेकांशी कितपत साम्य आहे हें पहावयाचें. कोणत्याहि लिपींतील कांही वर्णांच्या आकृती दुसर्‍या लिपींतील कांही वर्णांच्या आकृतींशी थोड्याबहुत प्रमाणांत नेहमी मिळत असतातच. उदाहरणार्थ ब्राह्मीच्या र, ज आणि ल या अक्षरांचें फारशींतील | (अलिफ्), (ऐन्) व J (लाम्) या अक्षरांशी बरेंच साम्य आहे; व त्याचप्रमाणें ब्राह्मीच्या अ, उ, ओ, क, ग, ज, ध, र, आणि ठ या अक्षरांचे रोमन लिपीतील H, L, Z, X, A, E, D, I  व O या अक्षरांशीं पुष्कळ सादृश्य दिसून येतें. परंतु त्यावरुन ब्राह्मी लिपीचा फारशी किंवा रोमन लिपीशीं संबध जोडण्याचा हास्यास्पद प्रयत्‍न कोणीहि करणार नाही हें उघड आहे. ख्रिस्तपूर्व सातव्या शतकाच्या सुमारास फिनीशियन लिपीपासून ग्रीक लिपि निघालीं असें पूर्वी एके ठिकाणीं सांगितलेच आहे. प्रथमारंभी ग्रीक लिपि उजवीकडून डावीकडे लिहीत जाण्याचा परिपाठ होता. परंतु त्याच्या ऐवजी पुढें ती लिपि जेव्हां डावीकडून उजवीकडे लिहिण्याची वहिवाट पडली, तेव्हां त्या लिपीचें मूळ स्वरूप पालटून प्रत्येक अक्षराची डावी बाजू उजवीकडे व उजवी डावीकडे गेली. याप्रमाणें ग्रीक लिपीचें स्वरूप पालटल्यावर तिच्यापासून पुढें पुरातन लॅटिन लिपीची उत्पत्ति झाली व या लॅटिन लिपिपासून मग रोमन लिपि निघाली. याप्रमाणें प्रस्तुत रोमन लिपीचा फिनीशियन लिपीशीं जरी अजमासें २६०० वर्षांपूर्वीचा संबध आहे, तरी देखील रोमन लिपींतील A, B, D, E, H, K, L, M, N, P, Q, R व T ही तेरा अक्षरें फिनीशियन लिपींतील सदृश उच्चार होणार्‍या वर्णांशी अजूनहि पुष्कळ अंशी मिळत असलेलीं दिसून येतात. रोमन लिपींतील H, L इत्यादि नऊ अक्षरांचें ब्राह्मी लिपींतील विसदृश उच्चाराच्या अ, उ, आदिकरून नऊ अक्षरांशी जेवढें साम्य दिसून येतें तितकें रोमन लिपीतील उपरिनिर्दिष्ट तेरा वर्णांचें फिनीशियन लिपीतील सदृश उच्चाराच्या तेरा वर्णांशी खास दिसून येत नाहीं. तरीहि पण रोमन व फिनीशियन लिपींचा परस्परसंबध नाकबूल करून कोणीहि सुज्ञ मनुष्य ब्राह्मी लिपीस रोमन लिपीच्या मातृस्थानीं बसविण्याचें धाडस करणार नाहीं.