प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
पाणिनीच्या अष्टाध्यायीचा पुरावा:- पाणिनीच्या ग्रंथांत त्याच्या काळीं लेखनकला अस्तित्वांत होती असें ज्यावरून अनुमान काढतां येईल असा एकहि शब्द नसल्याचें जें मॅक्समुल्लरचें विधान आहे तें बरोबर नाहीं. कारण पाणिनीनें लिपि, लिबि, लिपिकर व यवनानी हे शब्द तयार करण्याचे जे नियम दिलें आहेत त्यांतील ‘दिवाविभानिशा......लिपिलिबिबलि ... (३.२.२१) ह्या सूत्रांतील लिपि व लिवि यांचा अर्थ ‘लिहिणें’ आहे; व इंद्रवरूणभव...... यवयवन’ ...... (४-१-४९) ह्या सूत्राचें विवरण करतांना कात्त्यायन व पतंजलि यांनी यवनानी शब्दाचा अर्थहि यवनलिपि असाच केला आहे. यवनानी ह्या शब्दाविषयीं कांही विद्वान, उ. वि. का. राजवाडे, असें म्हणतात कीं अष्टाध्यायींतील तो शब्द केवळ यवन स्त्रीचा वाचक असावा. यवनलिपि असा अर्थ जो कात्यायन व पतंजलि यांनी केला आहे, तो त्यांनीं स्वकालीन प्रयोगांवरून केला असला पाहिजे असें ते प्रतिपादन करतात ( भारत इतिहाससंशोधक मंडळाचा शके १८३२ सालाचा अहवाल व एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका पुस्तक २८ पान १८० पहा ).
अनेक ग्रंथ परिचय:- लिपि व लिबि ह्या शब्दांशिवाय पाणिनीच्या ग्रंथात दुसरे आणखीहि असे पुरावे आहेत कीं, त्यांवरून त्याच्या काळच्या लोकांस लेखनकला अवगत होती असें मानणें प्राप्त होतें. त्याच्या काळीं, कृत, प्रोक्त व उपज्ञात असे तीन प्रकारचे ग्रंथ अस्तित्वांत होते. कृत म्हणजे रचित ग्रंथ ( १.३.७५, ४.३.८७, ४.३.१-१६ ); वेदांच्या शाखांकरितां प्रोक्त हा शब्द वापरला आहे (४.३.१०१); आणि नवीन विषयावर प्रथमच लिहिलेल्या ग्रंथास उपज्ञात हें नाव आहे (४.३.११५ व १.४.२१). ‘शिशुकन्दय मसभद्वन्द्वेंद्रजननादिभ्यशच्छ:’ (४.३.८८) ह्या सूत्रावरून पाणिनीस आपल्या काळच्या कित्येक ग्रंथांची व त्यांच्या विषयांची माहिती होती असें दिसतें. भिक्षुशास्त्र व नाट्यशास्त्र हे दोन सूत्रात्मक ग्रंथ त्याच्या काळीं अस्तित्वांत होते (४.३.११०-११). महाभारत ग्रंथाचाहि अष्टाध्यायींत उल्लेख आहे (६.२.३८). ह्यांशिवाय आपिशलि (६.१.९२), स्फोटायन (६.१.१२३), गार्ग्य (८.३.२०), शाकल्य (८.३.१९),शाकटायन (३.४.१११), गालब (६.३.६१), भारद्वाज (७.२.६३), काश्यप (१.२.२५), चाक्रवर्मण (६.१.१३०) व सेनक (५,४,११२), या व्याकरणकारांची नांवे व मतेंहि पाणिनीनें प्रसंगोपात आपल्या ग्रंथांत दिलीं आहेत. पाणिनीच्या काळीं लेखनकला अस्तित्त्वातं नव्हती असें मानलें तर त्याला त्याच्या काळचे सर्व ग्रंथ मुखोद्रत होते असें समजावें लागेल, किंवा ज्यांनीं हें निरनिराळे ग्रंथ मुखोद्रंत केले होते त्या सर्वांनां आपल्या समोर बसवून त्यानें आपली अष्टाध्यायी तयार केली असें तरी गृहीत धरावें लागेल !
स्वरित चिन्ह व सूत्ररचनेची सूक्ष्म दृष्टीनें बसविलेली व्यापक पद्धति:- पाणिनीच्या सूत्रात्मक ग्रंथाचें वास्तविक स्वरीप नीट ध्यानांत आणलें तर लेखनकलेच्या अभावीं असला ग्रंथ तयार होणें किती असंभवनीय आहे हें चटकन ध्यानांत येतें. एकच गोष्ट पुन्हां पुन्हा सांगण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून पाणिनांनें ती प्रथमारंभीच देऊन ही व्यवस्था किती सूत्रांपावेतों चालेल हें स्वरित चिन्हानें दर्शविले होतें. अशा रीतीनें प्रथमारंभी उल्लेख केल्या जाणार्या गोष्टीस अधिकार हें पारिभाषिक नांव आहे, हीं अधिकारसूत्रें पाणिनीच्या अष्टाध्यायींत ठिकठिकाणीं दृष्टीस पडतात; तथापि तदंगभूत ‘स्वरित’ चिन्हांचा मात्र आतां लोप झाला असल्यामुळें ती कशी होती व कोठे लिहीत असत याची कल्पना पाणिनीच्या ग्रंथावर ज्यांनी टीका लिहिल्या आहेत त्यांनीं दिलेल्या त्या शब्दाच्या स्पष्टीकरणावरूनच केली पाहिजे. ( अष्टाध्यायीवर टीका लिहिल्या गेल्या तेव्हां अमुक एक अधिकार कोठपावेतों चालतो हें टीकाकारांनीच आपल्या टीकांत स्पष्ट शब्दांनी सांगितल्यामुळें ‘स्वरित’ चिन्हांची आवश्यकता राहिली नाहीं. ) वेदाप्रमाणें अष्टाध्यायांच्या पठनांत उदात्त किंवा अनुदात्त स्वराचा भेद नसल्यामुळें ‘स्वरित’ हें कांहीतरी वर्णपर चिन्ह असलें पाहिजे, असे आपणांस ‘ स्वरितो नाम स्वरविशेषो वर्णधर्मो न स्वरधर्म: ’ ह्या पाणिनिसूत्र १-३-११ वरील काशिकेवरून व ‘एकश्रुत्या सूत्राणां पाठात् ’ ह्या पतंजलीच्या महाभाष्याच्या पहिल्या अन्हिकावरील कैयटाच्या टीकेवरून कळतें. पतंजलीनें आपल्या महाभाष्यांत कात्यायनाचा असा आधार दिला आहे कीं, ‘ यावतिथोऽलनुबंधस्तावतो योगानितिवचनातसिद्धम् ’ म्हणजे एखाद्या अधिकारसूत्राची व्यवस्था पुढील जितक्या सूत्रांपावेतों चालवयाची असेल तेवढ्या सूत्रांच्या आंकड्याचा निदर्शक वर्ण अधिकारसूत्राला पाणिनि जोडत असे. शिवसूत्रांत दिलेले ‘अ, इ, उ ’ इत्यादी वर्ण अनुक्रमे वर्ण १,२,३ इत्यादि आंकड्यांबद्दल पाणिनीनें योजिले होते असें कात्यायनानें मानिलें आहे, कैयटानें याचें असें एक उदाहरण दिलें आहे कीं, पाणिनीच्या ५,१,३०, ह्या सूत्रावर इ हा अनुबन्ध लाविला असतां त्याचा अर्थ या सूत्राचा अधिकार दोन सूत्रांपावेंतों चालेल असा होतो. पतंजलीनें यावर ‘ अथेदानीं यत्राल्पीयांसोऽल: भूयसश्च योगानधिकारोऽनुवर्तते कथं तत्र कर्तव्यं ‘ म्हणजे अधिकारसूत्राची व्यवस्था पुढील जितक्या सूत्रांपर्यंत चालावयाची असेल तितके वर्णंच शिवसूत्रांत नसतील तेव्हां काय करावयाचें अशी शंका काढून तिजवर कात्यायनाचेंच पुन: असें समाधान दिलें आहे कीं, ‘ भूर्यासप्राग्वचनं ’ म्हणजे पतंजंलि म्हणतो कीं, ‘ भूयसि प्राग्वचनं कर्तव्यं भूयसि प्रागमुत इति वक्तव्यम्.’ याचा अर्थ असा की पुढें येणार्या अमुक शब्दापावेतों असें तेंथें म्हणावें. उदाहरणार्थ, सूत्र १.४.५६ मध्यों ‘ प्राग्रीश्वरान्निपाता:,’ म्हणजे पुढें येणार्या रीश्वर शब्दाच्या अगोदरपावेतों सर्व निपात समजले जावे असें सांगितलें आहे. सूत्र १.४.९७त रीश्वर शब्द आला असून तेथें हा अधिकार समाप्त होतो. या ठिकाणीं एक गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे ती ही कीं, पाणिनीनें ईश्वर शब्द न ठेवतां त्याच्या जागीं कृतिम ‘ रीश्वर ’ शब्द योजिला आहे, कारण असें की त्यानें ईश्वर शब्द वापरला असता तर त्या सूत्रांत अतिव्याप्तीचा दोष येऊऩ पुढें आलेल्या ‘ ईश्वरे तो सुनकसुनौ ’ (३,४,१३) ह्या सूत्रांतील ईश्वर शब्दापावेतों त्याचा अधिकार पोचण्याचा संभव होता.
याशिवाय पाणिनीनें स्वत:च्या धातुपाठांतून ‘ फणादिसात धातूंनां ’ ( ६.४.१२५), ‘ जाक्षिति आदिकरून सहा धातू ‘ (६.१.६) असे आपल्या अष्टाध्यायींत ठिकठिकाणीं हवाले दिले असल्याचे आढळून येतात.
अशा प्रकारचा व्याकरणग्रंथ लेखनकला अस्तित्वांत नसतांना होणें किती असंभवनीय आहे हें कोणासहि सहज दिसून येईल. पंडित ओझा यांचें तर असें मत आहे कीं, अष्टाध्यायीसारखा सूत्रात्मक ग्रंथच काय, पण व्याकरण शास्त्रावरील कोणताहि ग्रंथ लेखनकलेच्या अभावीं तयार होणें शक्य नाहीं. कोणत्याहि भाषेचें व्याकरण तयार होण्यास त्या भाषेंत अगोदर कांही लेखनिबद्ध वाङ्मय असावें लागतें. वाङ्मयाचा काळजीपूर्वक अभ्यास केल्याशिवाय व्याकरणविषयक नियम बनविणें दुरापास्त आहे. हिंदुस्थानांतील ज्या असंस्कृत प्राथमिक जातींच्या भाषांत लेखनिबद्ध वाङ्मयाचा अभाव आहे त्यांच्या भाषांची व्याकरणें यूरोपीय पंडितांनीं अगदीं अलीकडेच तयार केलेलीं आहेत हें विसरतां कामा नये. फार तर काय, हिंदुस्थानांतील ज्या भाषांची व्याकरणें झालीं आहेत त्या भाषा बोलणार्या समाजांतील निरक्षर लोकांपैकीं एकासहि व्याकरणांतील पारिभाषिक शब्दाचें ज्ञान असलेलें आढळून येत नाहीं.