प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
प्रागैतिहासिक कालांतील ब्राह्मीलिपि:- निझामच्या राज्यांत जी. यझदानी यांस प्रागैतिहासिक काळांतील मातीची भांडीं सांपडली आहेत त्यांवर एकंदर १३१ अक्षरें असून त्यांतील पांच ब्राह्मी लिपींतील अक्षरांशी जुळतात. तसेंच कलकत्ता येथील पदार्थसंग्रहालयांत नूतन अश्मयुगांतील दोन पाषाण आहेत. त्यांवर कांही अक्षरें खोदलेलीं आहेत. त्यांपैकी एक आसाममध्यें सांपडलेला असून त्यावरील अक्षरें इजिप्तमधील प्रागैतिहासिक लिपीशीं साम्य दाखवितात. दुसरा बहारप्रांतांतील रांची येथे सांपडलेला असून त्यांतील तीन अक्षरें अशोककालीन ब्राह्मी लिपितील अक्षरांसारखी पण उलटी आढळतात. वरील दोन उदाहरणांवरून प्रागैतिहासिक काळीं ब्राह्मी लिपीचें अस्तित्त्व होतें, व ब्राह्मी लिपि ही उसनी आणलेली नसून स्वयंभू आहे असे. रा. देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांनी प्रथम त्याच परिषदेंत प्रतिपादन केलें आहे. परंतु त्यांचा पूर्ण लेख अद्यापि छापला गेला नाहीं व त्यांनी लिपीला निश्चित काळ दिलेला नाही.
त्याचप्रमाणें एच. कृष्णशास्त्री यांनी, प्राकृत व द्रविड यांच्या मिश्रणानें झालेल्या भाषेमध्यें कोरलेले कांही लेख मदुरा आणि तिनवेल्ली जिल्ह्यांतील कांही गुहांत सांपडले आहेत, व त्यांतील सुमारें वीस अक्षरें अशोककालीन ब्राह्मी लिपींतील अक्षरांशी जुळतात, पण त्याचें आकाराच्या बाबतींत सिलोनमधील गुहालेखांतील अक्षरांशी व भट्टिप्रोलूच्या लेखांतील अक्षरांशी साम्य दिसतें तेव्हां या गोष्टीचा विद्वानांनी विचार करावा असें सुचविले. परंतु त्यांनींहि लिपीच्या कालावर विशेष प्रकाश पाडला नाहीं.