प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.  
 
फिनीशियन भाषेची व्यापकता आणि तिचा स्पर्धणार्‍या लिपिंविरूद्ध जय:- यूरोपीय पंडित सामान्यत: फिनीशियाच्या लिपीपासून आजच्या सुधारलेल्या सर्व राष्ट्रांतील वर्णमालायुक्त लिपींची उत्पत्ति झाली असें मानतात. आशियाच्या वायव्य भागांत तुर्कस्थान देशांत सिरिया नांवाचा जो पोट विभाग आज आपणांस परिचित आहे त्यालाच प्राचीन ग्रीक व रोमन लोकांनी फिनीशिया असें नांव दिलें होतें. हें राष्ट्र एके काळी फार भरभराटीच्या स्थितींत असून त्याचा दूरदूरच्या देशांशी व्यापार चालत होता. त्या देशांत संवृद्ध झालेल्या लिपीस आद्यस्थान देण्याची प्रवृत्ति आहें. तथापि, फिनीशियाच्या लिपीला आद्यस्थान देण्यास आख्यायिकांशिवाय दुसरा चांगलासा पुरावा नाहीं. प्राचीन काळीं फिनीशियाच्या लोकांचा परदेशांशीं व्यापार करण्यांत हातखंडा असें वर्णमालेचा शोध लागल्यावर एका टोंकापासून दुसर्‍या टोंकापर्यंत तिचा प्रसार करण्यास हे फिनीशियाचे लोकच कारणीभूत झाले. तथापि वर्णमालेची कल्पना खुद्द फिनीशियन माणसांच्या डोक्यांतूनच निघाली असेल असें आज निश्चित म्हणवत नाहीं. जगामध्ये नेहमी एखादी कल्पना जो यशस्वी करून दाखवितो त्याला तिचें श्रेय मिळतें मग ती कल्पना त्याची स्वत: ची असो वा नसो. वर्णमालेची कल्पना खास कोणाच्या डोक्यांतून निघाली हें कांहीच सांगता येत नाहीं. ती कल्पना कोणाच्या तरी डोक्यांतून निघाली व तिनें शेवटीं मिसरी व बाबिलोनी अशा दोन्हीहि लिपीनां नामशेष करुन टाकलें एवढें मात्र खरें. तथापि ही गोष्ट घडून येण्यास बराच कालावधि लागला असला पाहिजे. कारण फिनीशियन राष्ट्राचें महत्त्व नाहींसें झालें व त्या लोकांच्या मूळ लिपीत शेंकडों फेरफार करुन युरोपीय व आशियांतील सुधारलेल्या राष्ट्रांनीं तिचा स्वीकार केला तरी बाबिलोनच्या लेखकांचा आपल्या जुन्या चित्रलिपींत व ध्वनिचिन्हलिपींत पत्रव्यवहार चालतच होता.

फिनीशियन लिपीमध्यें सारे अजमासें वीसच वर्ण आहेत. त्या लिपींत सेमेटिक भाषेंतील एकूणएक व्यंजनांच्या उच्चारांकरितां अक्षरें योजलेलीं आहेत, पण स्वरांकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष केलेलें दिसतें. प्रत्येक व्यंजनाच्या उच्चाराकरितां एक एकच चिन्ह योजल्यामुळें वर्णांची संख्या बरीच कमी होऊन लिपि फार सोपी झाली. पुराणाप्रिय लोकांनी ह्या लिपीला संदिग्ध म्हणून नांवें ठेविली असल्यास त्यांत नवल नाही. तथापि सेमेटिक लोकांना स्वररहित वर्णमालाच पुढें आवडूं लागली असें दिसतें. कारण, अद्यापहि त्यांनी खालींवर कांही टिंबें देण्यापलीकडे ही उणीव भरून काढलेली नाहीं.

आर्यन भाषा बोलणार्‍या यूरोपीय राष्ट्रांच्या लक्ष्यांत फिनीशियन लिपीचा हा दोष आल्यावांचून राहिला नाहीं. ग्रीक लोकांनी प्राचीन काळींच स्वरांच्या कांहीं नवीन उच्चारांकरितां चिन्हें योजून त्यांची आपल्या लिपींत भर घातली.{kosh Issac Taylor’s History of the Alphabet ; an account of the origin and development of letters. New edition, २ vols. London, १८९९.}*{/kosh} तरी पण ते तिला पूर्ण निर्दोष करूं शकले नाहींत. आज इंग्रजी भाषेत स्वरांचे सुमारें तीस निरनिराळे उच्चार आहेत. तरी त्यांकरितां त्यांच्या लिपीमध्ये चिन्हें सारी सहाच आहेत. उदाहरणार्थ एका ‘ ए ’ ह्या अक्षराचाच अँ, आ, ऑ व ए अशा चार निरनिराळ्या उच्चारांसाठी उपयोग केला जातो. कोणत्या शब्दांत कोणत्या स्वराचा काय उच्चार करावयाचा हें सर्व स्मरणशक्तीवर विसंबून किंवा अनुमानानेंच काढणायाची पाळी यावी हा वस्तुत: लिपींतील एक मोठा दोषच आहे.