प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
बुहलरच्या ग्रंथातील दोन लिपींच्या वर्णांत सादृश्य दाखविण्याची सदोष रीति:- सेमेटिक व ब्राह्मी लिपींच्या घडणींमध्यें मुख्य फरक हा दिसून येतो कीं, फिनीशियन आदिकरून लिपींच्या अक्षरांतील वरचा भाग प्राय: स्थूल असून खालच्या भागांत उभ्या किंवा तिरकस रेघा दृष्टीस पडतात. परंतु ब्राह्मी लिपीच्या बर्याच अक्षरांत वरच्या भागास बारीक रेषांनी आरंभ होऊन खालचा भाग अधिकाधिक स्थूल झालेला दिसून येतो. ब्राह्मीचें सेमेटिक लिपीशी सादृश्य दाखवितांना, त्यांमध्यें हा फरक दिसून येण्याचें बुहलर् नें असें कारण सांगितलें की, हिंदू लोकांनी सेमेटिक लिपीतील कित्येक अक्षरें उलटीं करुन त्यांचा वरचा भाग खाली व खालचा वर करून टाकला. कांही अक्षरे उभी होतीं तीं आडवीं केली व कांहीमधील मूळचा कोन उघडून त्याच्या दोन वेगवेगळ्या रेषा केल्या. याशिवाय त्या लिपींत आणखी जे भेद दिसूं लागला त्याची वासलात लावण्याकरितां या पंडितानें असें ठरविलें कीं, ब्राह्मी लिपि प्रथम उजवीडून डावीकडे लिहिण्याचा प्रघात होता; परंतु पुढें तो बदलून जेव्हां ती लिपि डावीकडून उजवीकडे लिहिण्याची रीत प्रचारांत आली तेव्हां तिच्या अक्षरांचे मूळ रूप पालटून त्यांची डावी बाजू उजवीकडे व उजवी डावीकडे झाली. वरील गोष्टी गृहीत धरूनहि जेव्हां सादृश्य दाखविण्यास अडचण पडूं लागली, तेव्हां हिंदू लोकांच्या माथीं मूळच्या सेमेटिक अक्षरांवर आणखी असे संस्कार केल्याचा आरोप करण्यांत आला कीं, त्यांनी कोठें मुळांतील रेषा मागेंपुढें सरकविली, कोठें रेषा नव्हती तेथें नवीन काढली, कोठें मूळची रेषा पुसून टाकली, कोठें ती वाढविली, कोठें ती लहान केली, कोठें खालच्या बाजूची रेषा वर नेली, कोठें दोन रेषांनां जोडणारी नवीन रेषा काढली, कोठें आडवी रेषा उभी केली, कोठें तिरकस रेषा सुधी केली, कोठे परस्परांचे छेदन करणार्या रेषांऐवजी एक टिंव ठेविलें, कोठें डावीकडे मुरडलेल्या रेषेस वरच्या बाजूस वाढवून तिची गांठ केली, कोठे त्रिकोणास धनुष्याकृति केलें व कोठें मुळांतील कोपरे मिटवून त्यांची अर्धवर्तुळाकृति रेषा केली. इतकेंहि करुन शेवटी बुहलरला ब्राह्मीच्या सात वर्णांची उत्पत्ति अगदी भिन्न उच्चारांच्या फिनीशियन वर्णांपासून काढावी लागली. फिनीशियनपासून ब्राह्मीची अक्षरें कशी सिद्ध झालीं हे दाखविण्यासाठी बुहलरनें प्रत्येक ओळीत आरंभी फिनीशियन अक्षर दिलें असून शेवटी त्यापासून सिद्ध झालेला अशोकाच्या लेखांतील ब्राह्मीचा वर्ण दिला आहे. त्यांच्या दरम्यान फिनीशियनपासून ब्राह्मीचें अक्षर तयार होत असतांना त्याची मध्यंतरींची निरनिराळीं रूपांतरें दाखविलीं आहेत. हीं रूपांतरें बुहलरला कोठें प्राचीन काळच्या लेखांत सांपडली आहेत अशांतला मुळीच भाग नाहीं. फिनीशियनपासून ब्राह्यीचीं अक्षरें तयार होण्याकरितां मधलीं रूपांतरें कशी असावयास पाहिजेत हें त्यानें केवळ कल्पनेनें ठरवून ती आपल्या पुस्तकांत घातलीं आहेत.