प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.         

ब्राह्मी लिपीच्या उत्पत्तीविषयी आपलें अज्ञान:- हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास अद्याप गाढ अंध:कारांत गुरफटलेला आहे. विदेशीय लोकांच्या आपल्या देशांत ज्या वरचेवर स्वार्‍या होत गेल्या त्यांत जुन्यां स्थळांचा नाश होऊन त्यांच्या जागीं नवीन वसाहती होत गेल्याकारणानें आपल्या पूर्वजांच्या वसतीचें अवशेष भूपृष्ठाच्या पन्नास फूट खाली गेले आहेत. सर्व देश एकाच राजाच्या ताब्यांत पूर्वी कधीं न राहिल्यानें आपल्या देशाचा क्रमबद्ध इतिहास लिहिला जाऊं शकला नाहीं. ऐतिहासिक संशोधन आपल्या येंथे अजून प्राथमिकावस्थेंतच आहे. सर्वांत जुने असे जे शिलालेख आज उपलब्ध आहेत ते ख्रिस्तपूर्व पांचव्या शतकाच्या अलीकडचेच आहेत. तथापि जे आहेत तेच लेखनकला त्या काळीं पूर्णावस्थेंत होती असें दाखवितात. आपल्या प्राचीन वाङ्मयांत लेखनकलेसंबंधी जे उल्लेख सांपडतात ते मात्र याहूनहि फार जुने आहेत. प्राचीन शिलालेखांतील अक्षरांची शैली घ्या किंवा प्राचीन वाङ्मयांतील कोठलेहि लेखनकलेसंबंधी उल्लेख घ्या, त्या सर्वांवरून हेंच दिसून येतें की त्या काळीं हिंदुस्थानांतील लेखनकला प्रौढावस्थेंत होती. अशा स्थितींत ब्राह्मी लिपीची उत्पत्ति कशी झाली व ती ज्या स्वरूपांत आपणांस दृष्ठीस पडते त्या स्वरूपांत येण्यापूर्वी तिच्या अक्षरांचीं कोणकोणतीं परिवर्तनें झाली, याविषयी आपणांस निश्चित असें कांहीच सांगतां येणें शक्य नाही. निश्चयपूर्वक कांही सांगतां येत असेल तर तें एवढेंच कीं, लेखनकलेच्या अस्तित्वाविषयीं जेथपर्यंत पुरावा सांपडतो तेथपर्यंत ती परिणतावस्थेंत व पूर्ण व्यवहारांत आलेलीच दृष्टीस पडते; व हिंदुस्थानच्या बाहेरून आलेल्या कोणत्याहि लिपीपासून तिची उत्पत्ति सिद्ध करणें शक्य नाहीं.