प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.        

ब्राह्मीच्या अत्यंत विकसित स्वरूपामुळें “ फिनीशियन” कल्पनेची अग्राह्मता:- सर्वांत उत्तम लिपि तीच कीं, जिच्यामध्ये प्रत्येक उच्चारासाठी इतका असंदिग्ध संकेत असतो की त्यायोगें आपण जसें बोलूं तसेच लिहून घेतां येतें; व तें लिहलेलें जर दुसर्‍या कोणीं वाचलें तर त्यांत व आपण जें बोललों होतों त्यांत बिलकुल फरक पडत नाहीं. ही कसोटी जर ब्राह्मी लिपीस लावून पाहिली तर तिचें निर्विवाद श्रेष्ठत्व कोणासहि नाकबूल करतां यावयाचें नाही; आणि तिच्यांत व सेमेटिक लिपींत चांगुलपणाच्या दृष्टीनें पाहिलें असतां जमीनअस्मानाचें अंतर आहे हेंहि अगदी स्पष्ट दिसून येईल. ब्राह्मी लिपींत स्वरांची व व्यंजनांची संख्या पूर्ण असून तींत र्‍हस्वदीर्घांकरितां व अनुस्वारविसर्गांकरितां निरनिराळी चिन्हें आहेत. प्रत्येक व्यंजनाचा उच्चार कोणत्या स्वरापासून होतो तें पाहून वैज्ञानिक क्रमानें त्यांची मांडणी केली आहे. तिच्या योगानें केवळ संस्कृत भाषेंतीलच नव्हे तर दुसर्‍या कोणत्याहि आर्य भाषेंतील ध्वनी व्यक्त करून दाखवितां येतात. व व्यंजनाबरोबर स्वरांची चिन्हें जोडण्याची ब्राह्मीमध्यें जी विशेष सोय आहे ती दुसर्‍या कोणत्याहि लिपींत नाही. सेमेटिक लिपींत २२ अक्षरें आहेत, पण त्यांनी फक्त १८ च निरनिराळे उच्चार लिहून दाखवितां येतात. तींत किंवा तिजपासून निघालेल्या कोणत्याहि लिपींत स्वर आणि व्यंजनें वेगवेगळी नाहीत, स्वरांत र्‍हस्वदीर्घाचा भेद नाहीं, अक्षरांत क्रम नाहीं, एका उच्चाराकरितां अनेक चिन्हें आहेत व एका चिन्हापासून अनेक उच्चार होतात. त्यांत स्वरांचा व्यंजनांशी संयोग करण्याची सोय नसून व्यंजनापुढेंच स्वर वेगळा लिहावा लागतो; आणि स्वरांची संख्या देखील पूर्ण आहे म्हणावी तर तेंहि नाही. फिनीशियनची उत्पत्ति ख्रिस्तपूर्व दहाव्या शतकांत झाली असें म्हणतात. जन्मभूमीत तिचा विकास होऊन ती हिंदुस्थानापावेतो येण्यास बराच काळ लोटणें अवश्य आहे. परंतु इकडे हिंदुस्थानात तर ब्राह्मी लिपि अशोकच्या काळी म्हणजे ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकांतच पूर्णावस्थेस जाऊन पोंचलेली दृष्टीस पडते. अशोकाच्या पूर्वीचे फारसे लेख अद्याप उपल्बध झाले नाहींत. परंतु पुढे मागें होण्याचा संभव आहे. पिपरावा व बडली येथें सांपडलेले लेख ख्रिस्तपूर्व पांचव्या शतकांतील आहेत असें प्रतिपादन करण्यांत आले आहे. कलकत्ता येथील ‘इंडियन म्यूझिअमच्या सज्जांत उदय व नंदिवर्धन यांचे, व मथुरेच्या पदार्थसंग्रहालयांत अजातशत्रूचा पुतळा आपणांस आढळून आल्याचें श्री. जयस्वाल यांनी नुकतेंच प्रसिद्ध केलें असून [ विभाग पहिला, शुद्धिपत्र, पृष्ठ ३०० वर दिलेली टीप पहा ] त्यांवरील लेखहि मौर्य राजांच्या पूर्वींचे आहेत असें म्हणतात. ज्याला लेखनकला अवगत असल्याशिवाय आपली अष्टाध्यायी रचतांच आली नसती असें पूर्वी दाखविण्यांत आलें आहे त्या पाणिनीचाच काळ ख्रिस्तपूर्व सातव्या शतकापूर्वी ढकलण्यांत येतो. वेदांतर्गत ग्रंथांतील संस्कृत वाङ्मय तर फिनीशियन लिपीचा जन्म होण्याच्या शेंकडों वर्षें अगोदरचें आहे हे कोणासच नाकबूल करतां येत नाहीं. तेव्हां असा साहजिकच प्रश्न उद्भवतो कीं, जीत ६३ किंवा ६४ मूल उच्चार आहेत अशा संस्कृत भाषेच्या लेखनाकरितां केवळ १८ च उच्चारांचीं चिन्हें असलेल्या भिकारड्या सेमेटिक लिपीची मदत घेऊन उपयोग तरी काय झाला असेल ? ज्या लोकांनी सेमेटिक सारखी अपूर्ण व क्रमरहित लिपि घेऊन, तिची लिहण्याची दिशा पालटून, अक्षरांची तोडमोड करून, केवळ १८ उच्चारांची चिन्हें मिळाली असतां आणखी ४५-४६ चिन्हें स्वत:च्या कल्पनेनें निर्माण करून, व्यंजनांशी जोडण्याकरितां स्वतंत्र स्वरचिन्हांची कल्पना काढून, अनुस्वारविसर्गांचीं चिन्हें बनवून, स्वर व व्यंजने वेगळी करून, त्यांनां उच्चाराच्या स्थानानुक्रमानें संगतवार लावून सर्वांगपूर्ण अशी नवी लिपि बनविली त्यांना केवळ १८ चिन्हांकरितां दुसर्‍याच्या तोंडाकडे पाहण्याची गरज लागली असेल काय ? लागली असेल असेंच, म्हणजे बेबरचें म्हणणें जरी खरें धरलें तरी भारतीयांनी आपल्या लिपियोजनेंत तीनचतुर्थांश प्रमाणांत नवीन सृष्टी उत्पन्न केली असें होईल. पाश्चात्त्य पंडितांपैकी सर्वच कांही सारखे दुराग्रही नसतात. एडवर्ड थॉमस [ न्युमिसमॅटिक: क्रॉनिकल, इ. स. १८८३ नं.३], प्रा. डॉसन [ ज. रॉ. ए. सो. इ. स. १८८१ पा. १०२ व इ. अँ. पु. ३५ पा. २५३], जनरल कर्निगहॅम [किइन्स ऑफ एन्शंट इंडिया पु.१, पा. ५२ ] व प्रो. लॅसन [ इंडिश्च आल्टर थुमस्कुंड, द्वितीयावृत्ति पृ. १००६ (१८६७) ] यांनी ब्राह्मी लिपीची अप्रतिमता ओळखून ती विदेशीय लिपीपासून काढली असणें शक्य नाहीं असा स्पष्ट कबुलीजबाबहि दिला आहे.