प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.

भारतीय लेखनकला:-  भारतीयांत अंकपद्धतीचा अत्यंत प्राचीन काळीं प्रचार झाला;  आणि भारतीयांची लेखनकला देखील फार प्राचीन आहे असें आज सिद्ध झालें आहे. तथापि भारतीयांची लेखनकला सर्वांशी भारतोद्भव आहे हें मात्र पूर्णपणें सिद्ध झालें नाही. भारतीयांची मातृकालिपि ही कोणत्या तरी चित्रलिपीचें परिणत स्वरूप आहे काय हा प्रश्न अद्याप सुटला नाही. भारतीय लिपि जरी प्राचीन आहे, तरी आज जे अवशेष उपलब्ध आहेत त्यांवरून आज तरी जगतांत पहिली लिपि भारतीय होय असें म्हणतां येणार नाही. असुर्या व इजिप्त येथील लिपीच्या प्राचीन काळापर्यंत भारतीय लिपीची प्राचीनता आज नेतां येत नाहीं.

भारतीय लेखनकलेविषयीं आपणांस हें म्हणतां येईल की, विचारव्यंजक अगर वस्तुव्यंजक चित्रलिपीचें स्वरूप अजीबात बाजूला टाकून जगांतील सध्यां अस्तित्वांत असलेल्या लिपित अत्यंत श्रेष्ठ प्रकारची लिपि आणि अतुल्य प्रकारची अत्यंत शास्त्रीय वर्णमाला भारतीयांनीं जितकी लवकर विकासविली तितकी जगांतील कोणत्याहि राष्ट्रानें विकासविली  नाहीं.