प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
लेखन व वर्णपृथक्करण यांचे संस्कृतिविकासांतील पौर्वापर्य:- संस्कृतीच्या इतिहासांत सर्व जगाचें अवलोकन केलें तर असें दिसतें कीं चित्रलिपीच्या पुढील पायरी मातृका लिपि देखील एकाएकीं उत्पन्न होत नाहीं. शब्दांचे वर्णानुसार पृथक्करण करण्यापूर्वी पादपृथक्करण, म्हणजे अवयव हाच जणू काय एक वर्ण समजून पृथक्करण करण्यांत येतें. आणि हें देखील चित्रलिपीशीं परिचय झाला आणि नवीन शब्दांस चित्रें शोधण्याचा त्रास पडूं लागला म्हणजे होऊं लागतें. भाषेंतील वर्णांस निरनिराळे करण्याकडे एकाएकीं प्रवृत्ति होत नसल्यामुळें, ज्या काली भाषेंतील वर्ण अत्यंत सूक्ष्म तर्हेनें तपासले गेले असतात त्या काली लेखनकला अस्तित्वांत नव्हती हें संभवनीय दिसत नाहीं.