प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.    

वेदकालीन छंद: शास्त्र:- ऋग्वेदामध्यें गायत्री, अनुष्टुभ् बृहती, विराज, त्रिष्टुभ, व जगती इतक्या छंदाची नांवे आलीं आहेत [ऋग्वे. सं.१०. १४, १६; १०. १३२, ३; ४.]  वाजसनेयि संहितेंत यांशिवाय पंक्ति छंदाचेंहि नांव सांपडतें व द्विपदा, त्रिपदा, चतुष्पदा, षट्पदा व ककुभ् इत्यादि छंदांतील भेद दिले आहेत. [यजु.वाज. सं. ११. ८; १४. १९; २३. ३३; २८. १४, इत्यादि].  अर्थव वेदामध्यें निरनिराळ्या ठिकाणीं निरनिराळ्या छंदांची नांवें आली असून शिवाय एके ठिकाणीं एकंदर ११ छंद असल्याविषयी उल्लेख आला आहे [ अथ. सं. . ९, १९ ] शतपथ ब्राह्मणांत मुख्य छंद आठ आहेत असें म्हटलें आहे [ विराडष्टमनि छन्दांसि (शं ब्रा..३,३,६]; व तैत्तिरीय संहित्ता [ सप्तक्षरं प्रथमं पदं अष्टाक्षराणि त्रीणि......यदष्टाक्षरा तेन गायत्री यदेकादशाक्षरा तेन त्रिंष्टुभ्यद् द्वादशाक्षरा तेन जगती...... सप्तपदा शक्करी (तै.सं. .१, १, ६; ७ )] मैत्रायणी संहिता [ अनुष्टुभं... चतुर्धा ह्येतस्या अष्टा अष्टा अक्षराणि बृहतीं... चतुर्धा ह्येतस्या नव नवाक्षराणि | इत्यादि (मै. सं. .११,१०)], काठक संहिता [गायत्रीं......चतुर्धा हि तस्याप्षट् षडक्षराणि उषणिहं......चतुर्धा हि तस्यास्सप्त सप्ताक्षराणि | इत्यादि (का.रां.१४.४)|  व शतपथ ब्राह्मण [ द्वादशाक्षरा वै जगती | ४|…… षटत्रिंशदक्षरा बृहती...... |८|…… दशाक्षरा विराटू |११|  (शं ब्रां.-३-३) इत्यादी ] यांमध्यें कित्येक छंदांतील अक्षरांची संख्या दिली असून त्यांच्या प्रत्येक पादांत किती किती अक्षरें असतात हें देखील सांगितलें आहे.

वैदिक काळांत छंदोबद्ध श्लोक रचले जात होते यांत मोठेंसें नवल नाहीं. कारण लिहितां वाचतां न येणारीं माणसें देखील छंदोबद्ध कवन करूं शकतात, याचें प्रत्यक्ष उदाहरण म्हटलें म्हणजे, हिंदुस्शानांतील स्त्रीसमाजांत ९५ पैकी फक्त एकाच बाईस लिहितां वाचतां येत असूनहि (हिंदुस्थानच्या १९११ सालच्या खानेसुमारीचा अहवाल पुस्तक १, भाग २, पानें ७०-७१ पहा ), त्यांच्यामध्ये ईश्वरोपासनापर, देवतादिकांच्या स्तुतिपर व वेदांताची उपदेशपर जी गाणीं आज प्रतलित आहेत, त्यांचा जर कोणी संग्रह केला तर वेदसंहितांहूनहि एक बरेंच मोठें बाड तयार होण्याचा संभव आहे. ह्या गाण्यांचा जर कोणीं अभ्यास केला तर त्यांतून कित्येक नवीन नवीन छंद निघतील. परंतु ती गाणीं लिहून ठेविलेली नसल्यामुळें ज्या स्त्रियांनी तीं पाठ करून ठेविलेलीं आहेत त्यांनां देखील त्यांच्या छंदांचें लेशमात्रहि ज्ञान होऊं शकलें नाहीं. वास्तविक पाहतां छंद:शास्त्र तयार करणार्‍या माणसास छंदोबद्ध वाङ्मयाचा काळजीपूर्वक अभ्यास करून प्रत्येक छंदातील अक्षरांच्या किंवा मात्रांच्या संख्येप्रमाणे त्यांचे वर्गीकरण करुन प्रत्येक वर्गाचें कांहीतरी नांव ठरवून टाकावें लागतें. अशा रीतीनें निश्चित झालेली नांवें मग लोकांमध्यें प्रचारात येतात. वेदकालीन समाज जर निरक्षर असता तर त्या वेळच्या लोकांनां आपल्या कवनांतील छंदाचें ज्ञान कधींहि झालें नसतें. ब्राह्मणांत व वेदांत निरनिराळ्या छंदांची नांवें व त्यातील अक्षरांची संख्याहि दिलेली सांपडते, या गोष्टीवरून त्या काळीं हिंदुस्थानांत लेखनकला चांगल्या परिणतावस्थेंत असली पाहिजे असेंच अनुमान निघतें.