प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
शिलालेखांवरून निघणारे अनुमान:- आतां आपण उपलब्ध झालेल्या प्राचीन लेखांवरून भरतखंडांतील लेखनकलेस जास्तीत जास्त किती प्राचीनत्त्व देतां येतें तें पाहू. भूर्जपत्रावर, ताडपत्रावर किंवा कागदावर लिहिलेले लेख हजारो वर्षें टिकणें शक्यच नसल्यामुळे अशा लेखांचा आपल्या कार्यास कितपत उपयोग होइल तें निराळें सांगावयास नको. आजतागायत उपलब्ध झालेल्या भूर्जपत्रावर लिहिलेला सर्वांत जुना संस्कृत ग्रंथ म्हटला म्हणजे खोतान प्रांतात खडलिक येथें सापडलेले ‘संयुक्तागम’ नावाचें बौद्ध सूत्र होय. त्याची लिपि इसवी सनाच्या चवथ्या शतकांतील असावी असें तज्ज्ञांचे मत आहे. ताडपत्रावर लिहिलेल्या एका पुरातन नाटकाचा काहीं भाग सापडला आहे त्याचा काळ याच्याहि पूर्वीचा आहे.हें नाटक इसवी सनाच्या दुसर्या शतकाच्या सुमारास लिहिलेलें असावें असा अंदाज आहे (क्लिनर संस्कृत टेक्स्ट भाग १). मध्यआशियांत याकैद शहराच्या ६० मैल दक्षिणेस ‘कुगिअर’ नांवाच्या गावी वेबरला मिळालेले चार संस्कृत ग्रंथ हे भारतीय प्राचीन लिपीत कागदावर लिहिलेले सर्वांत जुनें लेख होत. ही पुस्तकें इसवी सनाच्या पाचव्या शतकाच्या सुमारास लिहिली गेली असावी असा तर्क आहे (ज. ए. सो. बंगा;{kosh Journal of the Asiatic Society of Bengal.}*{/kosh} पु.६२ पान ८).
अर्थात् भूर्जपत्रावर, ताडपत्रावर किंवा कागदावर लिहिलेले जे कांहीं लेख आपणांस सांपडले आहेत, त्यांच्या प्रत्यक्ष प्रमाणांवरुन हिंदुस्थानांत लेखनकलां खरोखर किती प्राचीन कालापासून अस्तित्वांत होती याचा स्थूल अजमास देखील काढतां येणार नाहीं. भूर्जपत्रादि वस्तूंपेक्षां शिलांवर किंवा स्तंभांवर खोदविलेले लेख बरेच अधिक दिवस टिकण्यासारखे असल्यामुळें प्रस्तुत कार्यास आपणांस अशा लेखांचा कांही तरी उपयोग होण्याचा संभव आहे. ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकांत मौर्यवंशी अशोक राजानें पाषाणांवर व स्तंभावर कोरविलेले लेख पंजाब, संयुक्तप्रांत, बिहार, बंगाल, नेपाळ, ओरिसा, मद्रास इलाख्यांतील गंजम जिल्हा, राजपुतान्यांतील जयपूर संस्थान माळव्यांतील भोपाळ संस्थान, मुंबई इलाख्यांतील काठेवाड व ठाणें जिल्हा, मध्यप्रांत, हैदराबादचें राज्य व म्हैसूर संस्थान, इतक्या ठिकाणीं सांपडले असल्यामुळें व या लेखांत देशपरत्वें अक्षरांच्या आकृतीमध्येंहि फरक आढूळून येत असल्यामुळें, त्या काळीं हिंदुस्थानांतील सर्व भागांत लिहिण्याची कला प्रचलित होती एवढेंच केवळ नव्हे, तर तिचें ज्ञान तेथील लोकांना त्याच्याहि पुर्वी बर्याच वर्षांपासून असलें पाहिजे असें अनुमान निघतें.
अशोक पूर्व अजमीर बडली स्तंभलेख:- इ. स. १९१२ साली पं गौरीशंकर हीराचंद ओझा यांना अजमीर जिल्ह्यांत बडली नांवाच्या गांवी स्तंभावर खोदविलेल्या लेखाचा एक तुकडा मिळाला. तो हल्ली अजमार येथील पदार्थसंग्रहालयांत आहे. त्याच्या पहिल्या ओळीत ‘ वीर [T] यभगव [त]’ हीं व दुसर्या ओळींत ‘ चतुरासितिव [स]’ अशी अक्षरें खोदलेलीं आहेत.यावरून असें दिसतें कीं हा लेख जैनांचा अंतिम तीर्थंकर जो महावीर त्याच्या निर्वाणाच्या ८४ व्या वर्षी कोरविलेला असावा. हें अनुमान जर बरोबर असलें, तर या लेखाचा काळ ख्रिस्तपूर्व (५२७-८४ = ) ४४३ हा निघतो. या लेखाची लिपि अशोकाच्याहि पूर्वीची आहे असें मानावयास कांही आधारहि पंडित ओझा यांनी दिला आहे. या लेखामध्यें ‘वीराय’ शब्दांतील वी हें अक्षर र्ठ अशा रीतीनें लिहिलें आहे. यांतील ‘ व ’ या व्यंजनास जोडलेल्या ‘ ई ’ या स्वराचें अर्धवर्तुलाकृति चिन्ह अशोकाच्या किंवा त्याच्या नंतरच्या कोणत्याहि लेखांत आढळून येत नाही. यावरुन हें चिन्ह अशोकाच्या पूर्वी रुढ होतें, परंतु त्याच्या काळी तें प्रचारांतून अजीबात नाहीसें झालें असून त्याऐवजीं निराळेंच चिन्ह व्यंजनास जोडण्यांत येऊं लागलें होतें असें अनुमान निघतें. अशा प्रकारें अशोकाच्या वेळी फक्त ‘ ई ’ या स्वराच्या चिन्हांतच बद्दल झाला नसावा. महाक्षत्रप रूद्रदामा याच्या गिरनार येथील लेखांत व्यंजनास जोडलेल्या ‘ औ ’ या स्वरांचें चिन्ह तीन प्रकारचें दिसून येतें. यातील ‘ पौ ’ ह्या अक्षरांतील ‘औ’ चें चिन्ह अशोककालीनच आहे. परंतु ‘ नौ ’ व ‘ यौ ’ ह्या अक्षरांतील ‘औ ’ चें चिन्ह अशोकाच्या किंवा त्यानंतरच्या कोणत्याहि लेखांत आढळून येत नाही. यावरून हेंच अनुमान निघतें की, त्या चिन्हांचें रूपांतर अशोकाच्या पूर्वीच होऊन गेलें होते; पण गिरनारच्या लेखकास त्या चिन्हांची माहिती असल्यामुळें त्यानें त्यांचा उपयोग केला. प्रचारांतून गेलेल्या चिन्हाचा मागाहून उपयोग केला गेल्याचें हें कांही एकटेच उदाहरण नाहीं. मेवाडस्थ अपराजित राजाच्या काळांतील वि. सं. ७१८ मधील कुंडेश्वर येथील लेखांत दिसणार्या कुटिल लिपींतील वर जोडलें जाणारें ‘ आ’ चे चिन्ह लुप्त होऊन त्याच्या जागीं आपण व्यंजनाच्या उजव्या अंगास काना देत असतों. परंतु कुटिल लिपीतील उपरिनिर्दिष्ट चिन्हाचें ज्ञान अजूनहि कित्येकांना असल्याचें पंडित ओझा यांनां आढळून आलें आहे. कारण एखाद्या अक्षरास काना देण्याचें चुकून राहून गेलें व मागाहून चुकीची दुरूस्ती करण्यास उजव्या अंगास जागा नसली, तर कित्येक लेखकांनी वरच्या बाजूस कुटिल लिपीतील ‘आ’ चें चिन्ह जोडल्याचें त्यानीं प्रत्यक्ष पाहिलें आहे.
पिपरावापात्रलेख:- आतांपावेतों अशोकाच्या पूर्वीचा असा आणखी एकच शिलालेख उपलब्ध झाला असून तो हल्लीं कलकत्याच्या ‘ इंडियन म्यूझियम ’ मध्यें आहे. तो नेपाळच्या तराईतील पिपरावा या ठिकाणी असलेल्या एका स्तूपांत बुच्या अस्थी ठेविलेल्या पात्रावर कोरलेला सांपडला पिपरावा पहा). त्याचा काळ अशोकाच्या पूर्वींचा असला पाहिजे असें बुट्लरचें मत आहे (ज. रॉ. ए. सो: सन १८९८, पान ३८९), पण वस्तुत: तो ख्रिस्तपूर्व ४८७ साली बुद्धांचें निर्वाण झाल्यानंतर लवकरच खोदविलेला असावा असें पंडित ओझा यांनां वाटतें. कारण, कुसिनार येथें बुचें देहावसान झाल्यावर चंदनकाष्ठयुक्त चितेवर त्याच्या देहास अग्नि देण्यांत येऊन, त्याच्या अस्थी राजगृह, वैशाली, कपिलवस्तु, अल्लकप्प, रामग्राम, पावा, वेठदीप व कुसिनार येथील लोकांनीं वांटून घेऊन त्यांवर स्तूप बांधिले. कपिलवस्तु ही बुचे वडील शुद्धोदन यांची रहाण्याची जागा होती. अर्थात् पिपरावा येथील स्तूपांत मिळालेल्या अस्थी कपिलवस्तूच्या शाक्य लोकांच्या वांट्याच्या असल्या पाहिजेत, व तेथील स्तूपहि त्यांनीं बुध्दाच्या निर्वाणानंतर लवकरच बांधला असला पाहिजे.
वरील दोन शिलालेखांवरून एवढें सिद्ध होतें कीं, पांचव्या शतकांत देखील भरतखंडातील लोक लेखनकलेला अनभिज्ञ नव्हते.