प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.               

हिंदुस्थानांतील लेखनसाहित्य:-  प्राचीन काळापासून आतांपर्यंत हिंदुस्थानांत ज्या ज्या वस्तूंचा लिहिण्याच्या कामीं कागदासारखा उपयोग करण्यांत आला त्यांचे मुख्यत: दोन विभाग करतां येतील; रोजच्या व्यवहारांत लिहिण्याकरितां व पुस्तकें छापण्याकरितां हल्लीं आपण जो कागद वापरतों तो फार झालें तर पांच सात शतकेंपर्यंत शाबूत राहूं शकेल. परंतु एवढ्या अवधींत तो इतका जीर्ण होईंल कीं, त्यावरील लेखाची नक्कल करून ठेविली नाहीं तर तो कायम राहील अशी आशाच बाळगावयास नको. अर्थात् नक्कल करणार्‍याच्या भरंशावर न राहतां ज्या गोष्टी चिरस्मरणीय करून ठेवावयाच्या असतात त्यांचे लेख पंचमहाभूतांच्या विनाशक क्रियेस दाद न देंता टिकून राहूं शकतील अशाच पदार्थांवर लिहून ठेविले पाहिजेत हें उघड आहे. यांत्रिकं शक्तीने तयार झालेल्या स्वस्त कागदांचा हिंदुस्थानांत प्रचार ताडपत्र, भूर्जपत्र, हातांनीं तयार केलेले कागद, पट अथवा कापसाचें कापड, लांकडी पाटी, रेशमी कापड व कातडें ह्या वस्तूंचा रोजच्या व्यवहारांत लिहिण्याच्या कामीं उपयोग करण्यांत येत होता. जे लेख चिरकाल टिकावे अशी लिहिणाराची इच्छा असे, ते शिलांवर, विटांवर, सुवर्णपटांवर, रौप्यपटांवर, ताम्रपटांवर अथवा पितळेच्या. कांशाच्या किंवा लोखंडाच्या वस्तूंवर खोदविलेले सांपडतात. सदरहू वस्तूंपैकीं कांहीचा उपयोग बर्‍याच प्राचीन काळापासून हिंदू लोकांस ठाऊक होता अशाविषयीं जुन्या ग्रंथांत उल्लेख आले आहेत. तथापि ताडपत्रादिकांवरच्या सारखे विनाशी लेख इसवीसनाच्या दुसर्‍या शतकापूर्वींचे आज हिंदुस्थानांत उपलब्ध नाहींत. चिरंजीव लिखाणांतील खात्रीलायक सर्वांत जुने लेख म्हटले म्हणजे ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकांतील अशोकाचे शिलालेख होत.

ताडपत्र:- वर सांगितलेल्या विविध वस्तूंपैकी ताडपत्राचाच उपयोग हिंदुस्थानांत प्रथमत: करूं लागले असावे असें संस्कृत वाङ्मयांत पुस्तकासंबधीं जे पारिभाषिक शब्द आढळतात त्यांवरून दिसून येत आहे. ताडपत्र हें ज्याच्या पानापासून तयार करतात त्या तालवृक्षाची उत्पत्ति हिंदुस्थानातील बहुतेक सर्व भागांत थोडीबहुत व दक्षिण हिंदुस्थानामध्यें विशेषेंकरून होते. काळजीपूर्वक बनविलेल्या पोथ्या या तालवृक्षाच्या पानाचे एकपासून चार इंचपर्यंत रूंदीचे तुकडे करून, वाळवून, त्यांना पाण्यांत उकळून व पुन्हां वाळवून, आणि मग शंख किंवा कवडी यांसारख्या एखाद्या गुळगुळीत वस्तूनें घोटून त्यांवर लिहिलेल्या असतात. पानांची लांबी थोडी असल्यास प्रत्येक पानास व त्याच आकाराच्या खाली व वर ठेविलेल्या लांकडाच्या फळ्यांस मध्यें एकच भोंक पाडून, व जास्त असल्यास दोन्ही बाजूंस एक एक भोंक पाडून त्यांतून दोरी ओवून त्यांचें पुस्तक बांधलेलें असतें, ह्या बांधण्याच्या रीतीवरूनच एखाद्या विषयावरील पुस्तक ग्रंथ किंवा सूत्र हें नांव पडलें असावें;  व ताड पत्रामुळें वृक्षाचा व पुस्तकाचा जो संबंध जडला त्यायोगें पुस्तकाविषयींच्या परिभाषेंत स्कंध, कांड शाखा, वल्ली, पर्ण व पत्र यांसारखे वृक्षासंबधीं शब्द आले असावे. ताडपत्रावर शाईनेंहि लिहितात. परंतु लिहिण्याच्या क्रियेस संस्कृतमध्यें जो ‘ लिख् ’ हा धातु आहे त्यावरून लोखंडाच्या तीक्ष्ण कलमेनें ताडपत्रावर अक्षरें कोरुन त्यांवर काजळ फासण्याचीच रीति सर्वांत जुनी असली पाहिजे असें दिसतें. यांतील पहिली रीति पश्चिम व उत्तर हिंदुस्थानांत व दुसरी दक्षिणे मध्यें प्रचलित होती. ताडपत्रावर लिहिलेला सर्वांत जुना ग्रंथ म्हटला म्हणजे इसवी सनाच्या दुसर्‍या शतकाच्या सुमाराचा डॉ. लुडर्स यानें छापविलेला नाटकाचा अंश होय [ क्लीनर, संस्कृत टेक्स्टस, भाग १]. तथापि बुच्या निर्वाणानंतर म्हणजे ख्रिस्तपूर्व पांचव्या शतकांत राजदगृहाजवळ सप्तपर्ण गुंफेंत भरलेल्या बौद्धसंगीतीनें ‘ त्रिपिटक ’ ताडपत्रावरच लिहविलें होतें असा प्राचीन लेखांत उल्लेख सांपडतो [ हुएन्त्संगच्या चरित्रांचें बीलकृत रूपांतर पा. ११६-१७ ]. बंगालमध्यें दुर्गापाठ लिहिण्याच्या व रामेश्वराच्या व जगन्नाथाच्या मंदिरांत भरणा केलेल्या रूपयांच्या पावत्या देण्याच्या कामीं व तसेंच हिंदुस्थानच्या दक्षिण व आग्नेय भागांतील प्राथमिक शिक्षणाच्या शाळांत अद्यापहि ताडपत्रच वापरतात.

भूर्जपत्र:- कागदासारखा जिचा उपयोग करण्यांत येत होता अशी प्राचीन काळापासून हिंदुस्थानांत प्रचारांत असलेली दुसरी वस्तु म्हटली म्हणजे भूर्जपत्र होय. भूर्जपत्रावरील प्राचीन लेख विशेषत: पंजाबांत व थोडेसे ओरिसांत सांपडतात. हीं भूर्जपत्रें तूज अथवा भूर्ज नांवाच्या वृक्षाच्या सालीपासून बनविलेलीं असतात. ह्या सालीस तेल लावून व घोटून गुळगुळीत व मजबूत केल्यावर वाटेल तेवढ्या लांबीरूंदीचीं पानें कापून मग तीवर शाईनें लिहीत असत. पुरातन काळीं भूर्जपत्रांचीं पुस्तकें ताडपत्रांच्या पुस्तकांप्रमाणेंच दोरी ओंवून बांधीत असत. मोंगलाच्या कारकीर्दीत मात्र या पुस्तकांनां हल्लीच्या पुस्तकांप्रमाणें कातड्याचा पुठ्ठा चढवून बांधण्याची वहिवाट पडली. भूर्जपत्रावर लिहिलेलीं सर्वांत जुनीं अशी आज उपलब्ध असलेलीं पुस्तकें म्हटलीं म्हणजे खोतान येथें सांपडलेला दुसर्‍या किंवा तिसर्‍या शतकांतील ‘ धम्मपद ’ नामक खरोष्टी लिपीच्या प्राकृत ग्रंथाचा कांहीं अंश, चौथ्या शतकांतील ‘ संयुक्तागमसूत्र ’ नामक संस्कृत ग्रंथ, सहाव्या शतकाच्या सुमाराचीं मि. बॉवर यांच्या संग्रहातील पुस्तकें व आठव्या शतकांतील बख्शालींचें अंकगणित हीं होत. हीं जी भूर्जपत्रांवर लिहिलेलीं कांहीं थोडीशीं पुस्तकें आज शाबूत स्थितींत सांपडलीं आहेत, त्याचें कारण स्तूपांच्या आंत दगडांमध्यें गाडलेलीं असल्यामुळें तीं तेथें सुरक्षित राहूं शकलीं हेंच होय. भूर्जपत्रें मोकळ्या हवेंत लवकर जीर्ण होत असल्यानें पंधराव्या शतकापूर्वींची मोकळीं राहिलेलीं कोणतींहि भूर्जपत्रें अद्याप मिळालीं नाहीत. हल्ली भूर्जपत्रांचा लिहिण्याच्या कामीं मुळींच उपयोग करण्यांत येत नाहीं. तरी गंड्यागोट्यांतील यंत्रतत्रं भूर्जपत्रांवर काढण्याची रूढी असल्याकारणानें अद्यापहि तीं पसार्‍याच्या दुकांनी विकत मिळतात ( भारतीय प्राचीन लिपिमाला पानें १४३-४४).

कागद:- कित्येक यूरोपीय विद्वानांचें असें मत आहे कीं, यूरोपप्रमाणें हिंदुस्थानांतहि मुसलमानांनीच कागद आणले, इसवी सनाच्या तेराव्या शतकापूर्वींची कागदाचीं पुस्तकें अद्याप हिंदुस्थानांत सांपडलीं नसल्यामुळें ह्या विधानास खोडून काढण्यास प्रत्यक्ष असा कोणताच पुरावा आज उपलब्ध नाहीं. तथापि आशिया खंडात यार्कंद शहराच्या दक्षिणेस ६० मैलांवर कुगिअर [ ज. ए. सो. बंगा. पु ६२, पा. ८ ] येथें व काशगार इत्यादि ठिकाणीं जी पांचव्या शतकाच्या सुमारास भारतीय गुप्तलिपींत लिहिलेली कागदाचीं संस्कृत पुस्तकें सांपडलीं आहेत तीं हिंदुस्थानांतूनच तिकडे गेलीं असल्याचा संभव असल्यामुळें  मुसलमानांच्या आगमनापूर्वीहिं हिंदुस्थानांत कागद तयार होत असले पाहिजेत असाहि संशय येतो. चिंध्यापासून तयार केलेले इसवी सनाच्या दुसर्‍या शतकांतील जे कांहीं कागद चिनी तुर्कस्थानांत सांपडले आहेत त्यांच्या आधारावर, ‘ मोंगलांच्या ’ पूर्वींहि हिंदुस्थानांत कागदांचा प्रचार असावा पण त्यांचा उपयोग विस्तृत प्रमाणांत होत नसेल असें डॉ. बार्नेटनें म्हटलें आहे [ बार्नेट, अँटिक्किटीज ऑफ इंडिया ] . अशी एक सर्वसाधारण समजूत आहे कीं, चिनी लोकांनीं इ. स. १०५ मध्यें प्रथम कागद तयार केला ( वा. अँ. इं. पा. २२९-३० ), परंतु ख्रिस्तपूर्व ३२७ च्या सुमारास आलेक्झांडरबरोबर हिंदुस्थानांत आलेल्या निआर्कस यानें हिंदू लोक रूई कुटून कागद तयार करतात अशी माहिती लिहून ठेवली आहे. यावर डॉ. बुहलरनें अशी शंका घेतली आहे कीं, हा कागद म्हणजे‘ रुईचा पट ’ असेल [ बु. इं. पा. ९८ ]. रुईचा कपडा अद्यापहि हिंदुस्थानांत बनविला जातो; पण तो रूई कुटून करीत नाहींत [ भारतीय प्राचीनलिपिमाला पा. १४४ ].  मॅक्समुल्लरनें मात्र तितक्या प्राचीन काळींहि हिंदुस्थानांत कागद होत होते असाच निआर्कसच्या विधानाचा अर्थ केला आहे. चिंध्यापासून कागद तयार करण्याचे कारखाने हिंदुस्थांनात अद्यापहि आहेत; पण त्यापासून तयार केलेले कागद गुळगुळीत होत नसल्यानें त्यांवर पुस्तकें लिहिण्याची पक्की शाई फैलत असे. म्हणून त्यांनां गव्हाची अथवा तांदुळाची पातळ लई लावून व वाळून कोरडे झाल्यावर शंखासारख्या कांही तरी पदार्थानें घोटून ते गुळगुळीत व मऊ करीत [ भा. प्रा. लि. पा. १४४ ] . इसवी सनाच्या चवदाव्या शतकापर्यंत देखील हीं पुस्तकें ताडपत्रांप्रमाणें मध्यें भोक पाडून बांधीत असत असें अजमीरच्या कल्याणमल ढढ्ढा यांच्या येथें असलेल्या हस्तलिखितांच्या संग्रहांतील कांहीं पुस्तकांवरून दिसतें. चवदाव्या शतकानंतर लिहिल्या गेलेल्या अनेक पोथ्यांत सोंगट्यांच्या पटाच्या आकाराची जागा पत्राच्या मध्यभागीं मोकळी ठेवण्यांत येत असे. असलीं हस्तलिखितें ज्ञानकोशकारांच्या दृष्टीस पडलेलीं असून त्यांपैकी कांही तर १८ व्या व १९ व्या शतकांतील आहेत.

पट:- कापसाच्या कापडाचाहि हिंदुस्थानांत प्राचीन काळापासून लिहिण्याच्या कामाकडे थोडा थोडा उपयोग करण्यांत येत आहे. उपयोगांत आणण्यापूर्वी कापडास गव्हाची पातळ लई लावून, मग वाळल्यावर शंखादि पदार्थांनीं घोटून गुळगुळीत करीत असतात. उत्सवाच्या प्रंसगीं रंगित तांदुळाचीं जीं निरनिराळीं मंडलें काढावयाचीं असतात त्यांचें जैन मंदीरांत ठेविलेले रंगित नकाशे व ब्राह्मणांच्या घरी सांपडणारे सर्वतोभद्र, लिंगतोभद्र इत्यादि मंडलांचें रंगित व मातृकास्थापन, गृहस्थापन इत्यादींचे साधे नकाशे अशाच पटावर काढलेले असतात. या नकाशात प्रत्येक घरांतील देवतेचें नांव तिच्या घरांत शाईनें लिहिलेलें असतें. अद्यापहि राजपुतान्यांतील भडली किंवा गुरडे लोक अशाच एका लांबलचक पटावर पंचांग लिहून तें घरोघर सांगून उपजीविका करीत असतात. म्हैसूरकडील व्यापारी लोकांच्या वह्या चिंचेच्या बियांची लई लावून वर काळा रंग दिलेल्या कापडाच्या पानांच्या केलेल्या असतात; व त्यांवर लिहिण्याकरितां खडूचा उपयोग करण्यांत येतो. अशा प्रकारच्या पटांना तिकडे ‘ कडितम् ’ असें नांव आहे. शृंगेरी मठांत [ म्हैसूर संस्थानच्या ‘ आर्किऑलॉजिकल ’ सर्व्हेचा रिपोर्ट, इ. स.. १९१६; पा. १८]  जे शेंकडों ‘ कडिंतं ’ सांपडले आहेत, तें अजमासें दोनतीनशें वर्षोंपूर्वींचे असून त्यांवर मठाचा हिशेब, शिलालेख, ताम्रपट इत्यादिकांच्या नकला व गुरूपरंपरा वगैरे माहिती लिहलेली आहे. पाटण ( अनिहिलवाडा ) येथील जैन ग्रंथसंग्रहालयांत १३ इंच लांब व ५ इंच रूंद असें ९३ कापडी पानांचे ‘ श्रीप्रभसूरिरचित धर्मविधि ’  नामक एक पुस्तक असून त्यावर उद्यसिंहाची टीका [ पी. पिटर्सन याचा मुंबई इलाख्यांतील संस्कृत पुस्तकांच्या शोधाचा पांचवा अहवाल पा. ११३ ]  आहे.

फलक:- दगडी पाट्या प्रचारांत येण्यापुर्वीं हिंदुस्थानांत सर्वत्र फलकाचा म्हणजे लांकडाच्या फळीचाच उपयोग करण्यांत येत असे. बौद्धांच्या जातक ग्रंथात जें समजाचें चित्र आहे, त्यांतील फलकाच्या उल्लेखांवरून लहान मुलांच्या शिक्षणाकडे लांकडाच्या पाटीचा उपयोग हिंदुस्थानांत पुरातन काळापासून होत असावा असें दिसतें. ह्या पाटीवर विटकरीची वस्त्रगाळ भुकटी पसरून तिजवर लांकडाच्या कलमेनें लिहीत असत. खेड्यापाड्यांतून ही धूळपाटी अद्यापहि पहावयास मिळूं शकते. राजपुतान्यांतील व्यापारी लोक रोजच्या विक्रीचा हिशेब दिवसा अशाच प्रकारच्या पाटीवर लिहून ठेवून रात्रीच्या निवांत वेळीं तो वहीवर उतरतात. कांही कांहीं ज्योतिषी लोक अजूनहि जन्मपत्रिका वर्षफल वगैरेसंबंधी गणित अगोदर अशाच प्रकारच्या पाटीवर करीत असतात. जन्मसमयीची जन्मकुंडली व लग्नाच्या प्रसंगाची विवाह कुंडली लांकडाच्या फळीवर गुलाल पसरूनच काढण्याची वहिवाट असते.