प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
हिंदुस्थानांतील लेखनसाहित्य:- प्राचीन काळापासून आतांपर्यंत हिंदुस्थानांत ज्या ज्या वस्तूंचा लिहिण्याच्या कामीं कागदासारखा उपयोग करण्यांत आला त्यांचे मुख्यत: दोन विभाग करतां येतील; रोजच्या व्यवहारांत लिहिण्याकरितां व पुस्तकें छापण्याकरितां हल्लीं आपण जो कागद वापरतों तो फार झालें तर पांच सात शतकेंपर्यंत शाबूत राहूं शकेल. परंतु एवढ्या अवधींत तो इतका जीर्ण होईंल कीं, त्यावरील लेखाची नक्कल करून ठेविली नाहीं तर तो कायम राहील अशी आशाच बाळगावयास नको. अर्थात् नक्कल करणार्याच्या भरंशावर न राहतां ज्या गोष्टी चिरस्मरणीय करून ठेवावयाच्या असतात त्यांचे लेख पंचमहाभूतांच्या विनाशक क्रियेस दाद न देंता टिकून राहूं शकतील अशाच पदार्थांवर लिहून ठेविले पाहिजेत हें उघड आहे. यांत्रिकं शक्तीने तयार झालेल्या स्वस्त कागदांचा हिंदुस्थानांत प्रचार ताडपत्र, भूर्जपत्र, हातांनीं तयार केलेले कागद, पट अथवा कापसाचें कापड, लांकडी पाटी, रेशमी कापड व कातडें ह्या वस्तूंचा रोजच्या व्यवहारांत लिहिण्याच्या कामीं उपयोग करण्यांत येत होता. जे लेख चिरकाल टिकावे अशी लिहिणाराची इच्छा असे, ते शिलांवर, विटांवर, सुवर्णपटांवर, रौप्यपटांवर, ताम्रपटांवर अथवा पितळेच्या. कांशाच्या किंवा लोखंडाच्या वस्तूंवर खोदविलेले सांपडतात. सदरहू वस्तूंपैकीं कांहीचा उपयोग बर्याच प्राचीन काळापासून हिंदू लोकांस ठाऊक होता अशाविषयीं जुन्या ग्रंथांत उल्लेख आले आहेत. तथापि ताडपत्रादिकांवरच्या सारखे विनाशी लेख इसवीसनाच्या दुसर्या शतकापूर्वींचे आज हिंदुस्थानांत उपलब्ध नाहींत. चिरंजीव लिखाणांतील खात्रीलायक सर्वांत जुने लेख म्हटले म्हणजे ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकांतील अशोकाचे शिलालेख होत.
ताडपत्र:- वर सांगितलेल्या विविध वस्तूंपैकी ताडपत्राचाच उपयोग हिंदुस्थानांत प्रथमत: करूं लागले असावे असें संस्कृत वाङ्मयांत पुस्तकासंबधीं जे पारिभाषिक शब्द आढळतात त्यांवरून दिसून येत आहे. ताडपत्र हें ज्याच्या पानापासून तयार करतात त्या तालवृक्षाची उत्पत्ति हिंदुस्थानातील बहुतेक सर्व भागांत थोडीबहुत व दक्षिण हिंदुस्थानामध्यें विशेषेंकरून होते. काळजीपूर्वक बनविलेल्या पोथ्या या तालवृक्षाच्या पानाचे एकपासून चार इंचपर्यंत रूंदीचे तुकडे करून, वाळवून, त्यांना पाण्यांत उकळून व पुन्हां वाळवून, आणि मग शंख किंवा कवडी यांसारख्या एखाद्या गुळगुळीत वस्तूनें घोटून त्यांवर लिहिलेल्या असतात. पानांची लांबी थोडी असल्यास प्रत्येक पानास व त्याच आकाराच्या खाली व वर ठेविलेल्या लांकडाच्या फळ्यांस मध्यें एकच भोंक पाडून, व जास्त असल्यास दोन्ही बाजूंस एक एक भोंक पाडून त्यांतून दोरी ओवून त्यांचें पुस्तक बांधलेलें असतें, ह्या बांधण्याच्या रीतीवरूनच एखाद्या विषयावरील पुस्तक ग्रंथ किंवा सूत्र हें नांव पडलें असावें; व ताड पत्रामुळें वृक्षाचा व पुस्तकाचा जो संबंध जडला त्यायोगें पुस्तकाविषयींच्या परिभाषेंत स्कंध, कांड शाखा, वल्ली, पर्ण व पत्र यांसारखे वृक्षासंबधीं शब्द आले असावे. ताडपत्रावर शाईनेंहि लिहितात. परंतु लिहिण्याच्या क्रियेस संस्कृतमध्यें जो ‘ लिख् ’ हा धातु आहे त्यावरून लोखंडाच्या तीक्ष्ण कलमेनें ताडपत्रावर अक्षरें कोरुन त्यांवर काजळ फासण्याचीच रीति सर्वांत जुनी असली पाहिजे असें दिसतें. यांतील पहिली रीति पश्चिम व उत्तर हिंदुस्थानांत व दुसरी दक्षिणे मध्यें प्रचलित होती. ताडपत्रावर लिहिलेला सर्वांत जुना ग्रंथ म्हटला म्हणजे इसवी सनाच्या दुसर्या शतकाच्या सुमाराचा डॉ. लुडर्स यानें छापविलेला नाटकाचा अंश होय [ क्लीनर, संस्कृत टेक्स्टस, भाग १]. तथापि बुच्या निर्वाणानंतर म्हणजे ख्रिस्तपूर्व पांचव्या शतकांत राजदगृहाजवळ सप्तपर्ण गुंफेंत भरलेल्या बौद्धसंगीतीनें ‘ त्रिपिटक ’ ताडपत्रावरच लिहविलें होतें असा प्राचीन लेखांत उल्लेख सांपडतो [ हुएन्त्संगच्या चरित्रांचें बीलकृत रूपांतर पा. ११६-१७ ]. बंगालमध्यें दुर्गापाठ लिहिण्याच्या व रामेश्वराच्या व जगन्नाथाच्या मंदिरांत भरणा केलेल्या रूपयांच्या पावत्या देण्याच्या कामीं व तसेंच हिंदुस्थानच्या दक्षिण व आग्नेय भागांतील प्राथमिक शिक्षणाच्या शाळांत अद्यापहि ताडपत्रच वापरतात.
भूर्जपत्र:- कागदासारखा जिचा उपयोग करण्यांत येत होता अशी प्राचीन काळापासून हिंदुस्थानांत प्रचारांत असलेली दुसरी वस्तु म्हटली म्हणजे भूर्जपत्र होय. भूर्जपत्रावरील प्राचीन लेख विशेषत: पंजाबांत व थोडेसे ओरिसांत सांपडतात. हीं भूर्जपत्रें तूज अथवा भूर्ज नांवाच्या वृक्षाच्या सालीपासून बनविलेलीं असतात. ह्या सालीस तेल लावून व घोटून गुळगुळीत व मजबूत केल्यावर वाटेल तेवढ्या लांबीरूंदीचीं पानें कापून मग तीवर शाईनें लिहीत असत. पुरातन काळीं भूर्जपत्रांचीं पुस्तकें ताडपत्रांच्या पुस्तकांप्रमाणेंच दोरी ओंवून बांधीत असत. मोंगलाच्या कारकीर्दीत मात्र या पुस्तकांनां हल्लीच्या पुस्तकांप्रमाणें कातड्याचा पुठ्ठा चढवून बांधण्याची वहिवाट पडली. भूर्जपत्रावर लिहिलेलीं सर्वांत जुनीं अशी आज उपलब्ध असलेलीं पुस्तकें म्हटलीं म्हणजे खोतान येथें सांपडलेला दुसर्या किंवा तिसर्या शतकांतील ‘ धम्मपद ’ नामक खरोष्टी लिपीच्या प्राकृत ग्रंथाचा कांहीं अंश, चौथ्या शतकांतील ‘ संयुक्तागमसूत्र ’ नामक संस्कृत ग्रंथ, सहाव्या शतकाच्या सुमाराचीं मि. बॉवर यांच्या संग्रहातील पुस्तकें व आठव्या शतकांतील बख्शालींचें अंकगणित हीं होत. हीं जी भूर्जपत्रांवर लिहिलेलीं कांहीं थोडीशीं पुस्तकें आज शाबूत स्थितींत सांपडलीं आहेत, त्याचें कारण स्तूपांच्या आंत दगडांमध्यें गाडलेलीं असल्यामुळें तीं तेथें सुरक्षित राहूं शकलीं हेंच होय. भूर्जपत्रें मोकळ्या हवेंत लवकर जीर्ण होत असल्यानें पंधराव्या शतकापूर्वींची मोकळीं राहिलेलीं कोणतींहि भूर्जपत्रें अद्याप मिळालीं नाहीत. हल्ली भूर्जपत्रांचा लिहिण्याच्या कामीं मुळींच उपयोग करण्यांत येत नाहीं. तरी गंड्यागोट्यांतील यंत्रतत्रं भूर्जपत्रांवर काढण्याची रूढी असल्याकारणानें अद्यापहि तीं पसार्याच्या दुकांनी विकत मिळतात ( भारतीय प्राचीन लिपिमाला पानें १४३-४४).
कागद:- कित्येक यूरोपीय विद्वानांचें असें मत आहे कीं, यूरोपप्रमाणें हिंदुस्थानांतहि मुसलमानांनीच कागद आणले, इसवी सनाच्या तेराव्या शतकापूर्वींची कागदाचीं पुस्तकें अद्याप हिंदुस्थानांत सांपडलीं नसल्यामुळें ह्या विधानास खोडून काढण्यास प्रत्यक्ष असा कोणताच पुरावा आज उपलब्ध नाहीं. तथापि आशिया खंडात यार्कंद शहराच्या दक्षिणेस ६० मैलांवर कुगिअर [ ज. ए. सो. बंगा. पु ६२, पा. ८ ] येथें व काशगार इत्यादि ठिकाणीं जी पांचव्या शतकाच्या सुमारास भारतीय गुप्तलिपींत लिहिलेली कागदाचीं संस्कृत पुस्तकें सांपडलीं आहेत तीं हिंदुस्थानांतूनच तिकडे गेलीं असल्याचा संभव असल्यामुळें मुसलमानांच्या आगमनापूर्वीहिं हिंदुस्थानांत कागद तयार होत असले पाहिजेत असाहि संशय येतो. चिंध्यापासून तयार केलेले इसवी सनाच्या दुसर्या शतकांतील जे कांहीं कागद चिनी तुर्कस्थानांत सांपडले आहेत त्यांच्या आधारावर, ‘ मोंगलांच्या ’ पूर्वींहि हिंदुस्थानांत कागदांचा प्रचार असावा पण त्यांचा उपयोग विस्तृत प्रमाणांत होत नसेल असें डॉ. बार्नेटनें म्हटलें आहे [ बार्नेट, अँटिक्किटीज ऑफ इंडिया ] . अशी एक सर्वसाधारण समजूत आहे कीं, चिनी लोकांनीं इ. स. १०५ मध्यें प्रथम कागद तयार केला ( वा. अँ. इं. पा. २२९-३० ), परंतु ख्रिस्तपूर्व ३२७ च्या सुमारास आलेक्झांडरबरोबर हिंदुस्थानांत आलेल्या निआर्कस यानें हिंदू लोक रूई कुटून कागद तयार करतात अशी माहिती लिहून ठेवली आहे. यावर डॉ. बुहलरनें अशी शंका घेतली आहे कीं, हा कागद म्हणजे‘ रुईचा पट ’ असेल [ बु. इं. पा. ९८ ]. रुईचा कपडा अद्यापहि हिंदुस्थानांत बनविला जातो; पण तो रूई कुटून करीत नाहींत [ भारतीय प्राचीनलिपिमाला पा. १४४ ]. मॅक्समुल्लरनें मात्र तितक्या प्राचीन काळींहि हिंदुस्थानांत कागद होत होते असाच निआर्कसच्या विधानाचा अर्थ केला आहे. चिंध्यापासून कागद तयार करण्याचे कारखाने हिंदुस्थांनात अद्यापहि आहेत; पण त्यापासून तयार केलेले कागद गुळगुळीत होत नसल्यानें त्यांवर पुस्तकें लिहिण्याची पक्की शाई फैलत असे. म्हणून त्यांनां गव्हाची अथवा तांदुळाची पातळ लई लावून व वाळून कोरडे झाल्यावर शंखासारख्या कांही तरी पदार्थानें घोटून ते गुळगुळीत व मऊ करीत [ भा. प्रा. लि. पा. १४४ ] . इसवी सनाच्या चवदाव्या शतकापर्यंत देखील हीं पुस्तकें ताडपत्रांप्रमाणें मध्यें भोक पाडून बांधीत असत असें अजमीरच्या कल्याणमल ढढ्ढा यांच्या येथें असलेल्या हस्तलिखितांच्या संग्रहांतील कांहीं पुस्तकांवरून दिसतें. चवदाव्या शतकानंतर लिहिल्या गेलेल्या अनेक पोथ्यांत सोंगट्यांच्या पटाच्या आकाराची जागा पत्राच्या मध्यभागीं मोकळी ठेवण्यांत येत असे. असलीं हस्तलिखितें ज्ञानकोशकारांच्या दृष्टीस पडलेलीं असून त्यांपैकी कांही तर १८ व्या व १९ व्या शतकांतील आहेत.
पट:- कापसाच्या कापडाचाहि हिंदुस्थानांत प्राचीन काळापासून लिहिण्याच्या कामाकडे थोडा थोडा उपयोग करण्यांत येत आहे. उपयोगांत आणण्यापूर्वी कापडास गव्हाची पातळ लई लावून, मग वाळल्यावर शंखादि पदार्थांनीं घोटून गुळगुळीत करीत असतात. उत्सवाच्या प्रंसगीं रंगित तांदुळाचीं जीं निरनिराळीं मंडलें काढावयाचीं असतात त्यांचें जैन मंदीरांत ठेविलेले रंगित नकाशे व ब्राह्मणांच्या घरी सांपडणारे सर्वतोभद्र, लिंगतोभद्र इत्यादि मंडलांचें रंगित व मातृकास्थापन, गृहस्थापन इत्यादींचे साधे नकाशे अशाच पटावर काढलेले असतात. या नकाशात प्रत्येक घरांतील देवतेचें नांव तिच्या घरांत शाईनें लिहिलेलें असतें. अद्यापहि राजपुतान्यांतील भडली किंवा गुरडे लोक अशाच एका लांबलचक पटावर पंचांग लिहून तें घरोघर सांगून उपजीविका करीत असतात. म्हैसूरकडील व्यापारी लोकांच्या वह्या चिंचेच्या बियांची लई लावून वर काळा रंग दिलेल्या कापडाच्या पानांच्या केलेल्या असतात; व त्यांवर लिहिण्याकरितां खडूचा उपयोग करण्यांत येतो. अशा प्रकारच्या पटांना तिकडे ‘ कडितम् ’ असें नांव आहे. शृंगेरी मठांत [ म्हैसूर संस्थानच्या ‘ आर्किऑलॉजिकल ’ सर्व्हेचा रिपोर्ट, इ. स.. १९१६; पा. १८] जे शेंकडों ‘ कडिंतं ’ सांपडले आहेत, तें अजमासें दोनतीनशें वर्षोंपूर्वींचे असून त्यांवर मठाचा हिशेब, शिलालेख, ताम्रपट इत्यादिकांच्या नकला व गुरूपरंपरा वगैरे माहिती लिहलेली आहे. पाटण ( अनिहिलवाडा ) येथील जैन ग्रंथसंग्रहालयांत १३ इंच लांब व ५ इंच रूंद असें ९३ कापडी पानांचे ‘ श्रीप्रभसूरिरचित धर्मविधि ’ नामक एक पुस्तक असून त्यावर उद्यसिंहाची टीका [ पी. पिटर्सन याचा मुंबई इलाख्यांतील संस्कृत पुस्तकांच्या शोधाचा पांचवा अहवाल पा. ११३ ] आहे.
फलक:- दगडी पाट्या प्रचारांत येण्यापुर्वीं हिंदुस्थानांत सर्वत्र फलकाचा म्हणजे लांकडाच्या फळीचाच उपयोग करण्यांत येत असे. बौद्धांच्या जातक ग्रंथात जें समजाचें चित्र आहे, त्यांतील फलकाच्या उल्लेखांवरून लहान मुलांच्या शिक्षणाकडे लांकडाच्या पाटीचा उपयोग हिंदुस्थानांत पुरातन काळापासून होत असावा असें दिसतें. ह्या पाटीवर विटकरीची वस्त्रगाळ भुकटी पसरून तिजवर लांकडाच्या कलमेनें लिहीत असत. खेड्यापाड्यांतून ही धूळपाटी अद्यापहि पहावयास मिळूं शकते. राजपुतान्यांतील व्यापारी लोक रोजच्या विक्रीचा हिशेब दिवसा अशाच प्रकारच्या पाटीवर लिहून ठेवून रात्रीच्या निवांत वेळीं तो वहीवर उतरतात. कांही कांहीं ज्योतिषी लोक अजूनहि जन्मपत्रिका वर्षफल वगैरेसंबंधी गणित अगोदर अशाच प्रकारच्या पाटीवर करीत असतात. जन्मसमयीची जन्मकुंडली व लग्नाच्या प्रसंगाची विवाह कुंडली लांकडाच्या फळीवर गुलाल पसरूनच काढण्याची वहिवाट असते.
कौशेयपट:- सुती कापडाप्रमाणेंच रेश्मी कपड्याचाहि लिहिण्याकरितां हिंदुस्थानांत प्राचीन काळीं उपयोग करीत होते असें दिसतें. कारण अलबेरूणीनें लिहून ठेविलें आहे कीं [ एडवर्ड संचो अनुवादित ‘ अल्बेरूणीज इंडिया ’ पु. २ पा. ११ ], काबूलच्या हिंदू राजांची वंशावळी एका कौशेयपटावर शाईनें लिहिलेली नगरकोटच्या किल्ल्यांत आहे असें मी ऐकतों. जेसलमीरच्या ‘ बृहत् ज्ञानकोश ’ नामक एका जैन ग्रंथसंग्रहालयांत रेश्माच्या पटावर शाईनें लिहिलेली जैनसूत्रांची सूचि डॉ.बुहलर यानें तर स्वत: पाहिलीहि होती [ बु. इ. पं. पा. ९३ ]. तथापि सुतापेक्षा रेशीम महाग पडत असल्यामुळें कौशेयपटाचा अशा कामी क्वचित् प्रंसगीच उपयोग असले पाहिजेत हें उधड आहे.
हिंदुस्थानांत ताडपत्र, भूर्जपत्र इत्यादि लेखनोपयुक्त नैसर्गिक वस्तूंची वाण पडणें शक्य नसल्यानें व मृगचर्मशिवाय इतर कोणतेंहि कातडें हिंदू लोक अपवित्र मानीत आले असल्यानें, अरब वगैरे आशियाच्या दुसर्या देशांतील लोकांप्रमाणें हिंदुस्थानांतील लोक चर्मपत्रांचा लिहिण्याच्या कामीं उपयोग करीत नसावे असें प्रथमदर्शनीं वाटतें. परंतु बौद्धग्रंथात [ कच्चायनची भूमिका पा. २७; वु. इं. पं. पा. ९५] चर्म लेखनसामुग्रींत गणलें असून वासवदत्तेमधील [ हॉल संपादित वासवदत्ता, पा. १८२ ] सुबंधूच्या एका उत्प्रेक्षेवरूनाहि त्याचा लिहिण्याकडे उपयोग होत होता असें दिसतें. चर्मपत्रावर लिहिलेला एकहि लेख हिंदुस्थानांत अद्याप सांपडला नाहीं तरी जेसलमीरच्या ‘ बृहत् ज्ञानकोश ’ जैन ग्रंथालयांत हस्तलिखित पुस्तकांबरोबर एक कोरें चर्मपत्र मात्र मिळालें आहे [ बु. इं. पॅ. पा. ९५ ].
शिलालेख:- एखादा गोष्टीचें चिरकालीन स्मारक करून ठेवण्याकरितां लिहलेले लेख बहुधा लहानमोठ्या दगडांवर शिलास्तंभांवर, दगडाच्या पात्रांवर अथवा मूर्तीच्या आसनावर किंवा पाठीवर खोदविलेले असतात. हिंदुस्थानांत पूर्वी सबंध ग्रंथचे ग्रंथच दगडावर कोरविले असल्याचीं उदाहरणें सांपडलीं आहेत. उदाहरणार्थ, मेवाडांत विजोल्याच्या जैन मंदिराजवळील एका शिलेवर १२२६ मध्यें खोदविलेलें ‘ उन्नतशिखरपुराण ’ नामक दिगंबर जैन पुस्तक: अजमीरच्या राजपुताना म्यूझियममध्यें ठेविलेल्या, चव्हाण राजा विग्रहराज उर्फ वीसलदेवकृत हरकेली नाटक, सोमेश्वरकविरचित ‘ ललितविग्रहराजनाटक’ व चव्हाणांचें एक ऐतिहासिक काव्य ह्या ग्रंथांच्या शिला: भोजरचित कूर्मशतक नामक दोन प्राकृत काव्यांच्या [ ए. इं. पु. ८ पा. २४३-६० ] व पारिजातमंजरी नाटिकेच्या [ ए. इं. पु. ८, पा. १०१-१७ ] धार संस्थानांत मिळालेल्या शिला इत्यादि. हे लेख साध्या दगडांवरच कोरलेले असतात असें नाहीं. भट्टिप्रोलूच्या स्तूपांत स्फटिकासारख्या मूल्यवान् दगडाच्या तुकड्यावर कोरलेलाहि एक लहानसा लेख [ ए. इं. पु. २, पा. ३२८ च्या जवळचा आकृतिपट] सांपडला आहे. आज उपलब्ध असलेले हिंदुस्थानांतील सर्वांत प्राचीन शिलालेख म्हटले म्हणजे ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकांतील अशोकाच्या धर्माज्ञा होत. परंतु त्यांच्याहि अगोदरचे बडली व पिपरावा येथें दोन लेख सांपडले असून ते ख्रिस्तपूर्व पांचव्या शतकांतील असण्याचा संभव आहे. सर्वांत अलीकडील शिलालेख मराठींत आहे. तो तंजावर येथील कोंकणेश्वरच्या देवळांत आहे. त्यांत संबंध मराठी इतिहास थोडक्यांत म्हणजे ऐशीं पृष्ठें भरतील इतक्या विस्तारानें दिला आहे. हा लेख तंजावरचे वकील टी. सांबमूर्तिराव यांनीं छापून प्रसिद्ध केला आहे.
शिलालेख दोन प्रकारचे असूं शकतात. एक खोदलेल्या अक्षरांचा शिलालेख व दुसरा उठावदार अक्षरांचा शिलालेख. हिंदुस्थानांतील बहुतेक सर्व शिलालेख पहिल्याच प्रकारचे आहेत. मुसुलमानांचे अरबी किंवा फारशी लिपीचे शिलालेख दुसर्या प्रकारचे असतात. मुसुलमानांचें अरबी किंवा फारशी लिपीचे शिलालेख दुसर्या प्रकारचे असतात. मुलुलमानांचे पाहून पुढें हिंदू लोकहि उठावदार अक्षरांचे शिलालेख करूं लागले. अशा प्रकारचा एक शिलालेख मथुरेच्या पदार्थसंग्रहालयांत आहे व दुसरा धोलपुरच्या राज्यांत वाडी येंथे आहे. परंतु त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीहि निघेल किंवा नाहीं याची शंकाच आहे.
कोणताहि लेख कोरविण्यापूर्वी ज्यावर लेख खोदवावयाचा तो दगड टाकींने सपाट करून घेतलेला असतो. नंतर सुबक अक्षर लिहिणार्या माणसाकडून त्या दगडावर शाईनें लेख लिहून नंतर शिलावटाकडून तो खोदविण्यांत येत असतो.
मंदिरावरील किंवा विहिरीवरील लेख बहुधा अगोदर वेगळ्या दगडावर खोदून मग ते दगड त्याच्याकरितां राखून ठेविलेल्या जागेंत बसविण्यांत येत असत. अशा दगडांमध्यें चार्ही बाजूंस सीमा सोडण्याचा प्रघात होता. कधीं कधीं ह्या सीमेच्या आंतील लेखाची जागा पाव इंचापासून एक इंच पर्यंत टाकीनें फोडून घेतलेली दृष्टीस पडते. लेखाच्या आरंभी व शेवटीं मंगलसूचक स्वस्तिकासारखें एखादें चिन्ह किंवा ‘ सिद्धं ’ सारखा शब्द घातलेला सांपडतो. ओळींतील शब्द अलग अलग लिहिलेले नसतात; किंवा असले तरी त्या लिहिण्यास काहीं निर्बेध नसतो. श्लोकार्थ दाखविण्याकरितां किंवा शब्द किंवा वाक्ये अलग तोडण्याकरितां एक, व श्लोकाची किंवा विषयाची समाप्ति सुचविण्याकरितां दोन उभ्या रेषा बहुधा काढण्यांत येत असत. नक्षीदार अक्षर काढण्याच्या प्रवृत्तीचा विरामाच्या रेघांवरहि परिणाम होऊन कोठें उभ्या रेषेच्या जागीं अर्धवर्तुळ, कोठें तिच्या वरच्या भागांत बांक, तर कोठें तिच्यावर किंवा मध्ये लहान आडवी रेषा काढलेली सांपडते. कांहीं ठिकाणी प्रत्येक ओळींत अर्धा किंवा एक श्लोक देखील लिहिला असून, कोठें कोठें कविताबद्ध लेखांत श्लोकांक दिले आहेत. लेखाच्या शेवटी किंवा विषयसमाप्तीनंतर कोठें कोठें कमल, वर्तुळ किंवा दुसरें कांहीं तरी चिन्ह काढलेलें असतें. ओळींतील एखादें अक्षर चुकून राहून गेल्यास तें त्या ओळीच्या वर, खाली किंवा लेखाच्या सीमेंत लिहीत. कधीं कधी कोणत्या ठिकाणचें अक्षर राहून गेलें तें दाखविण्यासाठी ज्यांनां काकपद किंवा हंसपद म्हणतात त्या चिन्हांताहि उपयोग करीत. एखादें अक्षर, शब्द, कान, मात्रा चुकीनें जास्त काढली गेली तर, ती टाकी मारून काढून टाकीत; किंवा त्यावर एक किंवा अधिक उभ्या किंवा तिरकस लहान रेषा खोदीत असत. जे लेख काळजीपूर्वक खोदविलेले असतात त्यांमध्ये एखादा ठिकाणीं टाकीनें दगडाचा तुकडा उडून गेला असल्यास तेथें दगदडाच्या रंगाची मिश्र धातु भरून जागा पुन्हां सपाट केलेली असते. व तुकड्याबरोबर अक्षराचा अशं गेला असल्यास तो पुन्हां कोरविलेला असतो. कांहीं ठिकाणी लेखाच्या शेवटी तो केव्हां कोरला गेला त्याचें, किंवा ज्या स्थळास उद्देशून तो लेख लिहिला असेल तें केव्हां बनून तयार झालें त्याचें साल, ऋतु, मास, पक्ष, तिथि, वार वगैरे माहिती व लेख खोदविणार्यांचें नांवहि दिलेलें आढळतें ( भारतीय प्राचीन लिपिमाला पानें १४७-५० ).
मृत्तिका पात्र:- बौद्ध लोक शिलांप्रमाणेंच विटांवर व मृत्तिकापात्रांवरहि आपली धर्मंसंबधी सूत्रें खोदवून ठेवीत असत. मथुरेच्या पदार्थसंग्रहालयांत अजमासें ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकांतील लिपीच्या अशा कित्येक विटा ठेविल्या आहेत. ह्या विटा पूर्वी भिंतींत ओळीनें एकापुढे एक लाविलेल्या असतील. इसवी सनाच्या तिसर्याचौथ्या शतकांतील अशाच प्रकारच्या दुसर्या कांही विटा गोरखपूर जिल्ह्मांत गोपाळपूर गांवी [ एशिआटिक सोसायटी, बंगालचें प्रोसीडिंग्ज इ. स. १८९६, पा. १००-१०३; डे. वु. इं. पा. १२२ जवळचा आकृतिपट ] न नैनिताल जिल्ह्माच्या तराई परगण्यांत काशीपूरजवळील उज्जेन नांवाच्या किल्लयांत [ ६ डिसेंबर सन १९०१ चा पायोनिअरचा अंक ] सांपडल्या आहेत. मृत्तिकापात्रावरील लेख दोन प्रकारचे असतात. यांतील पहिला प्रकार म्हटला म्हणजे खोदविलेल्या अक्षरांचे [ इं. अँ. पु. १४, पा. ७५ ] मामूली लेख होत. परंतु मुद्रिकांचे ठसे उमटविलेले जे लेख [ आ.स. रि. इ. स.१९०३-४, आकृतिपट ६०-६२ ] असतात त्यांतील अक्षरें उठावदार असतात. हे सर्व लेख विटा किंवा मृत्तिकापात्रें भट्टीत घालून, भाजण्यापूर्वीच त्यांवर काढलेले असतात.
सुवर्णपट व रौप्यपट:- सोनें चांदी ह्या मौल्यवान् धातू असल्यामुळें लिहिण्याच्या कामीं त्यांचा उपयोग झाला तरी तो क्कचित् प्रसंगीच असला पाहिजे हें उघड आहे. बौद्धांच्या जातककथांमध्ये राजाज्ञा वगैरे कांही लेख सुवर्णपत्रावर कोरविले असल्याचे उल्लेख आहेत. परंतु आज उपलब्ध असलेले सुवर्णपत्रावर कोरविलेले लेख म्हटले म्हणजे तक्षशिलेच्या गंगू नामक स्तूपांत सांपडलेला खरोष्टी लेख [ कं. आ. स. रि. पु. २, पा. १३० व आकृतिपट ५९ ] व ब्रह्मदेशांतील प्रोम जिल्ह्माच्या ह्मज्वा गांवाजवळ मिळालेले इसवी सनाच्या चौथ्यापांचव्या शतकांतील ब्राह्मी लिपीच्या दक्षिण शैलीचे दोन लेख [ ए. इं. पु. ५, पा. १०१ व त्याजवळचा आकृतिपट ] होत. रौप्यपत्रावरील एक लेख भट्टिप्रोलूच्या स्तूपांतून [ बु. इं. पॅ. पा. ९५ ] व दुसरा तक्षशिला येथें [ ज. रॉ. ए. सो. इ. स. १९१४, पा. ९७५-७६ व इ स. १९१५ पा. १९२ च्या समोरचा आकृतिपट ] मिळालेला आहे. याशिवाय ‘ नमोकार मंत्र ’ व यंत्रें खोदलेले चांदीचे गट्ठेहि जैन मंदिरांत पहावयास मिळतात.
पितळ, कांसे व लोखंड:- ह्या धातूंच्या वस्तूंवरहि कोरविलेले जुने लेख सांपडतात. जैन मंदिरांत ज्या शेकडों पितळेच्या लहान मोठ्या मूर्ती दृष्टीस पडतात, त्यांच्यापैकीं मोठ्या मूर्तीच्या बैठकींवर व छोट्या मूर्तीच्या पाठीवर लेख लिहिलेले असून ते इसवी सनाच्या ७ व्या शतकापासून १९ व्या शतकापर्यंतचे आहेत. ह्याशिवाय त्याच मंदिरांत पितळेच्या गोल गठ्टयांवरहि ‘ नमोकार मंत्र ‘ व यंत्रें कोरविलेलीं सांपडतात. भाविक लोक मंदिरांत कांशाच्या ज्या घंटा बांधतात त्यांवर देणार्याचें नांव, देणगीचा शक वैगैरे गोष्टी लिहिलेल्या असतात. दिल्ली येथील कुतुबमिनार जवळील चंद्र राजाचा पांचव्या शतकांतील लेख ज्या स्तंभावर आहे तो लोखंडाचा असून अब्रूच्या पहाडावरील अचलेश्वराच्या मंदिरांतल्या त्याच धातूच्या त्रिशूलावर व चितोड वगैरे ठिकाणाच्या लोखंडाच्या तोफांवरहि लेख कोरलेले आहेत.
ताम्रपट:- सर्व धातूंमध्यें तांबें ह्या धातूचाच हिंदु स्थानांत लिहिण्याकडे सर्वांत अधिक उपयोग केला जात असे. भांड्यावर मालकाचें नांव खोदविण्याची रीति तर प्राचीन आहेच, पण मंदिर, मठ व ब्राह्मण किंवा साधू ह्यांना गांव, शेतें, विहिरी वगैरे दान केल्याच्या सनदा तांब्याच्या पत्र्यावर खोदवून देण्याची वहिवाटहि प्राचीन काळी सर्वसामान्य होती असें दिसतें. ह्या सनदांनां ताम्रपत्र, ताम्रशासन किंवा शासनपत्र म्हणत असत. ताम्रपटावर लिहिण्याचा प्रचार आज बराच कमी झाला आहे तरी तो अद्याप अगदींच बंद मात्र पडला नाहीं. कधीं कधीं राजाज्ञांकरितां [ सोहगौराचे ताम्रलेख- ए. सो. बंगा. प्रोसिडिंग्ज इ. स. १८९४, आकृतिपट १ ], स्तूप, मठ वगैरे बांधविले जाण्यासंबंधीच्या लेखांतकरितां [ तक्षशिलेचा ताम्रपट- ए. इं. पु. ४, पा. ५५-५६ ] व जैनांच्या व ब्राह्मणांच्या यंत्रतंत्रांकरितांहि [ उदाहरणार्थ, अजमीरच्या संभवनाथाच्या श्वेतांबरीय जैन मंदिरांतील ‘ बीसस्थानक यंत्र ] ताम्रपटाचाच उपयोग केलेला दृष्टीस पडतो. हे ताम्रपट त्रिकोणाकृति. चतुष्कोणाकृति किंवा वर्तुळाकार असून वाटेल तेवढ्या लहान मोठ्या आकाराचे असतात. अजमीरच्या ‘ राजपुताना म्यूझियम ‘ मध्यें असलेल्या दानपत्रांपैकीं सर्वांत लहान पत्र ४|| इंच लांब व ३ इंच रूंद असून त्यांचे वजन १२ तोळे आहे; व सर्वांत मोठें २९|| इंच लांब व १६ इंच रूंद असून त्याचें वजन अजमासें १९ ||| शेर आहे. उत्तर हिंदुस्थानांत सांपडणारीं दानपत्रें बहुधा एक किंवा दोन पानांवरच खोदविलेलीं असतात; परंतु दक्षिणेंतील दानपत्रे याहून अधिक पानांचीं असून लेडन युनिव्हर्सिटीच्या पदार्थसंग्रहालयांत ठेविलेल्या राजेंद्रचोल राजच्या एका दानपत्रांत तर २१ पत्रें आहेत. [डॉ. बर्जैस संपादित ‘तामिळ अँन्ड संस्कृत इन्सिकप्शन्स, पानें २०६-१६ ]. एकाहून अधिक पानांच्या दानपत्रांत पहिलें व शेवटचें पान फक्त एका म्हणजे आतल्या बाजूनेंच लिहिलेलें असतें. ही दानपत्रांची पाने प्रत्येक पानास एक किंवा दोन भोंकें पाडून व त्यांतून कड्या घालून एका ठिकाणी अडविलेली असतात. ह्या कड्यांच्या सांध्यावर किंवा दानपत्रांतील पानावर राजमुद्रा ठोकून त्या झाळून बसविण्यांत येत. शिलालेखांप्रमाणे दानपत्रांतहि थोडी थोडी सीमा सोडलेली असते व जेथें लेख लिहावयाचा ती सीमेच्या आंतील जागा ठोकून सीमेचा भाग तिजहून अधिक उन्नत केलेला दृष्टीस पडतो. लिहितांना एखादें अक्षर चुकून पडलें तर ती जागा हातोडीनें ठोकून सपाट करून तिजवर दुसरें अक्षर काढण्यांत येत असे. कांही दानपत्रांतील अक्षरें रेषायुक्त असतात तर दुसर्या कित्येक दानपत्रांत ती केवळ टिंबयुक्तच असतात. ताम्रपट खोदणारा सोनार अडाणी असला म्हजेच बहुधा त्याला टिंबयुक्त अक्षरें कोरण्याची पाळी येते. असल्या ताम्रपटांवर केवळ दानपत्रें व शासनपत्रेंच नव्हे, तर सबंध ग्रंथचे ग्रंथहि लिहून ठेविल्याचीं उदाहरणें हिंदुस्थानांत पहावयास मिळतात. मद्रास इलाख्यांत त्रिपति येथें तांब्याच्या पत्र्यावंर कोरविलेलीं तेलगू, पुस्तकें [ बर्नेल: सा. इं. पॅ. पा. ८६ ] सांपडली आहेत. हुएन्तसंगच्या लिहिण्यावरून असें समजतें कीं, काश्मीर येथें भरलेल्या बौद्धसंगीतीनें तयार केलेल्या उपदेशशास्त्र, विनयविभाषाशास्त्र व अभिधर्मविभाषाशास्त्र नांवाच्या लक्ष लक्ष श्लोकांच्या टीका कनिष्क राजानें ताम्रपटांवर खोदवून ते एका दगडाच्या पेटींत ठेवून तिजवर स्तूप बांधविला होता [ बील; बु. रे. वे. व. पु. १ पा. १५५. हुएन्त्संगच्या हिंदुस्थानांतील: प्रवासावर टॉमस वॉटर्सनें लिहिलेलें पुस्तक, भाग १ पान २७१ ]. असेंहि म्हणतात कीं, सायणानें केलेले वेदांवरील भाष्यहि ताम्र पटांवरच खोदून ठेविलें होतें [ मॅक्समुल्लर संपादित ऋग्वेद पु. १ पा. १७ ].
शाई:- प्राचीन काळीं हिंदुस्थानांत कागदावर लिहिण्याकरितां काळी, लाल, हिरवी, पिवळी सोनेरी किंवा रूपेरी शाई वापरीत असत. ह्या सर्व प्रकारच्या शायांमध्यें काळ्या शाईचाच व्यवहारांत सर्वांत अधिक उपयोग होत असे. काळ्या शाईंत कच्ची व पक्की असे दोन प्रकार होते. व्यापारी लोक आपल्या जमाखर्चाच्या वह्या कच्च्या शाईनेंच लिहीत असत. ही शाई काथ, बीजाबोर [?] गोंद व तिळाच्या तेलाचें काजळ एकत्र करून बनविण्यांत येत असे. परंतु तिने लिहिलेल्या पुस्तकांवर पाणी पडतांच ती शाई पसरत असल्यामुळें व पावसाळ्यांत त्यांचीं पानें एकमेकांस चिकटून जात असल्यामुळें ग्रंथ लिहिण्यास ती निरूपयोगी होती. म्हणून त्या कामाकरितां मुद्दाम पक्की शाईच तयार करीत असत. ही शाई बनविण्याची रीति अशी होती कीं, प्रथम पिंपळाच्या लाखेची बारीक भुकटी पाण्यांत घालून एका मडक्यामध्यें तें पाणी चुलीवर ठेवीत व त्यांत सुहागी ( टाकणखार ) व लोध्र बारीक करून टाकीत. उकळतां उकळतां त्या पाण्याने कागदावर चांगली लाल रेषा उमटुं लागली कीं शिरे तयार झालें असे समजून कापडाच्या एका पुरचुंडीत काजळ बांधून उत्तम काळी शाई होईपावेतों तें त्या शिर्यांत घोटण्यांत येई. राजपुतान्यामध्यें आजहि अशाच रीतीनें पक्की काळी शाई तयार करीत असतात. तडपत्रावरील पुस्तकेंहि याच शाईनें लिहिलीं जात असण्याचा संभव आहे. भूर्जपत्रांवर लिहिण्याची शाई मात्र बदामाच्या सालींचें कोळसे गोमूत्रांत उगाळून बनविली जात असे [ बुहलरचा काश्मीर वगैरे ठिकाणच्या पुस्तकांचा रिपोर्ट, पा. ३० ]. भूर्जपत्रें उष्ण हवेंत लवकर खराब होतात; परंतु पाण्यामध्ये कांही वेळ पडलीं राहिली तर ती बिघडत नाहींत. बदामाच्या शाईचा असा गुण आहे कीं, तिचीं अक्षरें भूर्जपत्र पाण्यातं ठेविल्याने खराब तर होत नाहींतच पण तें मळलें असलें तर मळ साफ धुवून जाऊन अक्षरे स्पष्ट दिसूं लागतात.
राहिलेल्या शायांपैकीं लाल शाईचा उपयोग त्यांतल्या त्यांत अधिक होत असे. ही शाई अळता किंवा हिंगूळ गोंदाच्या पाण्यातं उगाळून तयार केली जाते. वेदांच्या हस्तलिखित पोथ्यांत स्वरांची चिन्हें काढण्याकरितां प्रत्येक पानांतील दोन्ही बाजूंच्या सीमेच्या उभ्या रेषा ओढण्याकरितां, अध्याय समाप्तीचीं व श्रीभगवानुवाच. ऋषिरूवाच वगैरे वाक्यें लिहिण्याकरितां आणि विराम चिन्हाच्या लहान लहान उभ्या रेषा व वर्षफल जन्मपत्रिका वगैरेमधील कुंडल्या काढण्याकरितां ह्या शाईचा उपयोग करतात. हिरवी शाई हिरव्या रंगापासून व पिवळीं शाई हरताळापासून बनविली जात असे. अध्यायसमाप्तीच्या वाक्यांत व जैन ग्रंथात ह्या रंगित शायांचा उपयोग केलेला सांपडतो. यांतील पिंवळ्या रंगाचा विशेषकंरून अक्षरें खोडण्याकडे उपयोग केला जात असे. जी अक्षरें नको असतील त्यांवर एक तर हरताळ फिरवून देत, त्या अक्षरांभोवतीं शाईचें कुंडल काढीत. किंवा त्यांवर उभ्या रेषा ओढीत. गोंदाच्या पाण्यात सोन्याचा वर्ख घोटून सोनेरी, व रूप्याचा वर्ख घोटून रूपेरी शाई बनविली जात असे. ह्या शायांचा श्रीमंत लोक पुस्तकें लिहिण्याकडे [ अजमीरचे शेट कल्याणमल ढढ्ढा यांच्या ग्रंथसंग्रहांत वर्खाच्या शाईनें लिहिलेलीं पुस्तकें आहेत ] व चित्रकार चित्रें काढण्याकडे उपयोग करीत असत. ह्या शायांनीं लिहिण्यापूर्वी पानें पांढरी असल्यास अगोदर लाल किंवा काळा रंग देत. या पानांवर सोनेरी किंवा रूपेरी शाईनें लिहून अक्षरें कवडी सारख्या पदार्थांने घोटलीं म्हणजे तीं चमकावयास लागत.