प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३० वें.
जगद्विकासाची कारकें.

व्यक्तिपरिस्थितिप्राधान्यवाद. - जगद्विकासाच्या स्पष्टीकरणार्थ आर्थिक किंवा राजकीय विषयास प्राधान्य द्यावें यांविषयी जसे वाद आहेत तसेच ते व्यक्तीस अगर परिस्थितीस प्राधान्य द्यावें या विषयींहि आहेत.

ऐतिहासिक गोष्टीचें शास्त्रशुद्ध संशोधन करून त्यांनां विकासवाद लागू करण्याचे प्रयत्न होऊं लागल्यापासून गत कालांतील व्यक्तिविषयक गोष्टींनां कमी महत्त्व देण्याची, व कायदे, अर्थशास्त्रविषयक गोष्टी, मतें, वाङ्मय, कला इत्यादि ज्या गोष्टींवरून लोकांची सामाजिक व आध्यात्मिक स्थिति नीट कळते त्या गोष्टींनां विशेष महत्त्व देण्याची पद्धति सुरू झाली आहे. उदाहरणार्थ, सीझर किंवा काँस्टंटाईन या व्यक्तींच्या पराक्रमांचें रसभरित वर्णन करीत न बसतां त्यांनीं केलेलीं कृत्यें काय कारणांमुळें घडलीं याची चिकित्सा मागील अनेक पिढ्यांची परिस्थिति लक्षांत घेऊन करणें हें नवीन पद्धतीचे इतिहासकार आपलें कर्तव्य समजतात. अशा प्रकारच्या ग्रंथांनां ऐतिहासिक तत्त्वज्ञानाचे (हिसटारिकल फिलॉसफी) ग्रंथ असें म्हणतां येईल. अशा ग्रंथांत व्यक्तींनां महत्त्व कमी देऊन व्यक्ती व त्यांच्या हातून होणारीं कृत्यें कांहीं ठराविक व दुर्लंध्य नियमानुसार घडत आहेत असे प्रतिपादन केलेले असते. तथापि मुद्रणकलेचा प्रसार होण्यापूर्वींच्या काळांतील ऐतिहासिक माहिती अपुरी मिळते आणि जो जों प्राचीन काळाकडे जावें तों तों ही माहिती फारच अपूर्ण असल्यामुळें त्या त्या काळांतील ऐतिहासिक गोष्टीसंबंधाची कार्यकारणमीमांसा सदोष असणार हें उघड आहे.

निरनिराळ्या काळांतील मोठमोठ्या कार्यकर्त्यां व्यक्तीहि केवळ देशकालपरिस्थितीच्या हातांतील बाहुलीं असतात हें जितकें खरें आहे, तितकेंच हेंहि खरें आहे कीं मोठमोठ्या क्रान्त्या आपोआप घडून येत नसतात तर त्या घडवून आणण्यास मोठमोठ्या व्यक्ती लागत असतात. म्हणून कोणत्याहि समाजांत किंवा संस्थेंत मोठी क्रांति होणें जरूर आहे अशी स्थिति आली म्हणजे त्या वेळीं कोणी तरी मोठी व्यक्ति जन्मास येणार हें नक्की समजावें. परंतु या नैसर्गिक नियमाचा कित्येक शास्त्रैकदृष्टि इतिहासकार विपरीत अर्थ करतात व मोठ्या व्यक्तीची किंमत मुळींच मानीत नाहींत, तर उलट असें प्रतिपादन करतात कीं, त्या त्या परिस्थितींत नेपोलियन किंवा शिवाजी नसता तरी त्यांची कार्यें दुस-या कोणत्या तरी व्यक्तींनीं पार पाडलींच असतीं. अशा त-हेचा दैववाद किंवा शास्त्रीय वाद ऐतिहासिक पुराव्याच्या कसोटीला टिकत नाहीं. उदाहरणार्थ यूरोपांतील सोळाव्या शतकांतली ख्रिसतीधर्मसुधारणा उर्फ रेफर्मेशन ही गोष्ट घ्या. ही सुधारणा होणें तत्कालीन परिस्थित्यनुरूप अपरिहार्य होतें हें कबूल आहे; परंतु मार्टिनलुथर किंवा केल्व्हिन या पुरुषांच्या ऐवजीं दुस-या कोणी व्यक्ती असत्या तर या सुधारणेचें कार्य निराळ्या स्वरूपांत झालें असतें हेंहि कबूल केलें पाहिजे.