प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३० वें.
जगद्विकासाची कारकें.
जगद्विकासाची अनेक नियम आतांपर्यंत दिलेल्या विवेचनांत दिसून येतील त्यांमध्यें फक्त दोनतीन बाबतींत विकास दाखवितां आला. मनुष्यांचीं प्रयाणें व त्यामुळें जगांतील सर्व प्रदेशावर यूरोपीय रक्ताच्या लोकांचें वर्चस्व कसें होत गेलें हें दाखविलें आहे, आणि राष्ट्रविकासाचे नियम दिले आहेत.
विकासांगें व प्राधान्य.- जगांत विकास आपणांस अनेक बाबतींत दिसून येतो आणि राजकीय क्रियांचा उलगडा करतांना किंवा निरनिराळ्या क्रियांचा विकास दाखवितांना देखील इतिहास स्पष्ट करतां येतो. उत्पादन, वाहन व विक्रय यांच्या मोठमोठ्या संस्था भौतिक शक्तीच्या उपयोगानें कशा होत गेल्या, त्यामुळें अप्रगत देशांतील कच्च्या मालाचें महत्त्व कसें वाढेल, आणि आपल्या मालाचा दुस-या देशांत प्रसार करण्यासाठीं काय राजकारण करावें लागलें हें जगाचा आर्थिक दृष्टीनें इतिहास देतांनाहि देतां येईल, त्याप्रमाणेंच त्याचा संबंध विज्ञानेतिहासाशीं दाखवून राजकीय घडामोडी विज्ञानेतिहासाचें एक अंग म्हणून दाखवितां येईल. कोणत्या गोष्टींना अधिक महत्त्व द्यावें याविषयीं निरनिराळी अनिरूचि दृष्टीस पडते. आणि पुष्कळ ग्रंथकार आपला इतिहासविषय तें मुख्य कारण आणि इतर तीं आनुषंगिक कारणें किंवा निमित्त कारणें असें दाखविण्याच्या प्रयत्नांत पडलेले दृष्टीस पडतात.