प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३० वें.
जगद्विकासाची कारकें.

वृत्तकथन प्रधान कीं नियमाविष्करण प्रधान.- इतिहासांत जगद्विकासविषयक नियमांनां किती प्राधान्य द्यावें याविषयींहि भिन्नवृत्ती दृष्टीस पडतात.

'इतिहास म्हणजे उदाहरणांनीं तत्त्वज्ञान शिकविणारा ग्रंथ' अशी व्याख्या इतिहासाच्या शास्त्रीय अभ्यासाचे आग्रही करतात. ह्या लहानशा व्याख्येंत इतिहासाचें मुख्य महत्त्व व विचारी माणसांनां इतिहासाचा होणारा खरा उपयोग हीं दोन्हीं चांगलीं दिग्दर्शित होतात हें खरें आहे; तथापि इतिहास व तत्त्वज्ञान यांच्यामधील परस्पर संबंध पूर्णपणें बरोबर या व्याखेवरून व्यक्त होत नाहीं. उपयुक्त व्याख्येवरून असा ग्रह होतो कीं, इतिहास म्हणजे वास्तविक तत्त्वज्ञानाचाच ग्रंथ असून केवळ तत्वें नीट समजण्यापुरता ऐतिहासिक गोष्टीचा उपयोग त्या ग्रंथांत करावयाचा असतो. वास्तविक इतिहास याचा तसा अर्थ नाहीं. त्यांत आगाऊच कोणतींहि तत्वें ठाम ठरलेलीं नसतात; तर प्रथम गतकालीन घडामोडींचा संग्रह करावयाचा व त्यांवरून विशिष्ट तत्त्वांची ग्राह्याग्राह्यता ठरवावयाची. तात्पर्य, इतिहासकारानें प्रथम गतगोष्टी सविस्तर वर्णन केल्यानंतर इतिहासविषयक तत्त्ववेत्त्यानें ऐतिहासकि गोष्टीसंबंधानें तात्त्विक विवेचन मुत्सद्दी लोक व सर्व साधारण नागरिकांचे पुढारी यांच्या उपयोगाकरितां करावयाचें असतें.

तथापि इतिहास या विषयाच्या क्षेत्रांतहि व्यापक आणि तात्विक विचार लागू करतां येतील असा एक भाग आहे. इतिहासाचा मानवजातीच्या कृत्यांशीं सर्वस्वीं संबंध असल्यामुळें तत्त्वज्ञानविषयक संशोधन करण्यास इतिहासाइतकें विस्तृत क्षेत्र दुस-या कोणत्याहि शास्त्रामध्यें सापडणें शक्य नाहीं. गणितशास्त्रांत सत्य केवळ मुख्यतः वादानें ठरवावयाचें असतें, ज्योतिषशास्त्रांत अवलोकनानें, आणि रसायनशास्त्रांत प्रयोगानें ठरवावयाचें असतें. पण इतिहास व तत्संबद्ध शास्त्रें, यांपैकीं कोणत्याहि मार्गांनीं निश्चित निर्णय देतां येईल अशी नाहींत. कायदेशास्त्र, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र हीं सर्व अनिश्चितस्वरूप शास्त्रें आहेत; कारण त्यांत आपण ज्या गृहीत गोष्टीवरून अनुमानें काढतों त्या गोष्टी म्हणजे मानवसमाजाची परिस्थिति नेहमीं बदलणारी असते, त्यामुळें त्रिकालाबाधित अशी तत्त्वें किंवा नियम ठरविणें कठिण असतें. इतिहासंबद्ध अशा प्रत्येक शास्त्रांत कांहीं मूलभूत व्यापक तत्वें असतात, पण तीं लागू करून काढावयाच्या अनुमानांत परिस्थितिभिन्नत्त्वामुळें पुष्कळच फेरफार होत असतो.

प्रत्येक काळांतील निघणारी अनुमानें बदलणारी असली तरी इतिहासविषयक तात्त्विक चर्चा करणारे ग्रंथ निर्माण होत राहणारच, कारण मानवी मनाला तात्विक चर्चा करून परस्परांशीं असंबद्ध अशा दिसणा-या गोष्टीत कांहीं विशिष्ट प्रकारची कार्यकारणविषयक सूत्रबद्धता आहे असें दाखविल्यावाचूंन चैन पडत नाहीं. शास्त्रीय शोधांची बरीच वाढ होऊन अनेक शास्त्रांत उत्क्रांतितत्त्व उर्फ विकासवाद लागू करण्यांत आल्यापासून ऐतिहासिक घडामोडीनांहि हें उत्क्रांतितत्त्व लागू करून दाखविण्याकरितां इतिहासविषयक तात्त्विक विवेचन करणारे ग्रंथ अगदीं अलीकडे होऊं लागले आहेत. उत्कांतितत्त्वासारखें एखादें सर्वव्यापी तत्त्व इतिहासाला लागू करतां येते असें म्हणणारे जे विद्वान् आहेत, त्यांच्या मतें ऐतिहासिक गोष्टींनां धार्मिक, नैतिक व राजनैतिक क्रियविकासास कारक एवढ्याच दृष्टीनें महत्त्व असतें. असे ग्रंथकार जगाच्या एकंदर इतिहासाचें अवलोकन करून त्यावरून व्यापक अनुमानें काढण्यामध्यें मुख्य लक्ष घालतात. असलें कार्य करण्यास प्राचीन ग्रीक विद्वान् लायक होते, पण त्यांनां निरनिराळ्या प्राचीन देशांच्या इतिहासाची माहिती नव्हती. त्यांच्यापैकीं फक्त आरिस्टॉटलनें अनेक सुधारलेल्या समाजांचे कायदे व राज्यकारभारघटना यांची माहिती मिळविली व राजनीतिशास्त्रावर ग्रंथ लिहिला. त्यानंतर सेंट आगस्टाईननें ख्रिस्तीधर्माला सरकार दरबारांत प्रवेश मिळविण्याकरितां अपला ग्रंथ लिहिला. आधुनिक काळांत असल्या प्रकारचा ग्रंथ लिहिणारा पहिला लेखक बौसेट हा होय. त्यानंतर विचो यानें ती परंपरा चालू ठेवली. अलीकडे तर डार्विनचें उत्क्रांतितत्त्व ऐतिहासिक घडामोडींनां लागू करणारे लेखक बरेच निघत आहेत.

उत्क्रांतितत्त्व उर्फ विकासवाद हाताशीं धरून जगांत चाललेल्या प्रत्येक दुष्ट गोष्टीचें समर्थन करणारे मुत्सद्दी व ग्रंथकारहि आपणांस दृष्टीस पडतात गो-यांनीं जग व्यापावें, दुर्बल लोकांस आपले नोकर किंवा आपणासाठीं राबणारे करावे हेंच जगाचें भवितव्य होय आणि असें होऊं न देणे म्हणजे केवळ विकासवादाच्या कायद्याशीं भांडणें आहे असें सांगणारे अरण्यपंडित देखील आढळतात.