प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.

सात्वत संहितेचा सारांश - नारदमुनि मलय पर्वतावर परशुरामाचें दर्शन घ्यावयास गेले असतां परशुरामानें त्यांस श्रीहरीचें स्थान शोधून काढण्यांत निमग्न झालेल्या ॠषींस भेटून त्यांस सात्वत उपासनामार्गाचा उपदेश करावयास सांगितलें. नारदानें त्याप्रमाणें करून त्या ॠषींस आपला रहस्याम्नाय समजावून दिला. नारायण हा पुरुष, परमेश्वर किंवा परमात्मा होय असें या ठिकाणीं सांगितलें आहे. प्राचीन काळीं चक्रधारी वासुदेवानें संकर्षणानें विचारल्यावरून त्यास हीं रहस्यविद्या समजावून सांगितली. त्रैतायुगाच्या आरंभीं विष्णूचा चेहरा लाल झालेला पाहून संकर्षणानें विष्णूस असें होण्याचें कारण विचारलें. तेव्हां, या युगांत लोक विषयी होतील म्हणून, असें विष्णूनें त्यास उत्तर दिलें. नंतर, त्यांची विषयांपासून सुटका कशी होईल, असा संकर्षणानें प्रश्न केल्यावरून त्यास उत्तर मिळालें कीं, सनातन व परमश्रेष्ठ अशा ब्रह्माची तीन प्रकारांनीं उपासना केल्यास त्यांची मुक्तता होईल. परमात्मा हा षड्गुणान्वित असून त्यास सर्वत्र हस्त, पाद, नेत्र वगैरे अवयव आहेत. तो सर्वांत पर म्हणजे श्रेष्ठ आहे. तो एकच असून सर्वांस आधारभूत आहे. याशिवाय त्याच्या आणखी तीन मूर्ती किंवा व्यूह आहेत, व त्यांपैकीं प्रत्येक व्यूह ज्ञान व इतर गुण या बाबतींत दुस-याहून अगदीं भिन्न आहे. हे व्यूह ताबडतोब इष्टफलप्राप्ति करवून देतात.

उपासनेची पद्धत कशी असावी असें बलरामानें विचारल्यावरून भगवान् समजावून सांगतात:-

''सर्व विश्वाचें ध्येय जें शुद्ध ब्रह्म तें जेव्हां वासुदेवाची उपासना करणा-या सदाचारसंपन्न ब्राह्मणांच्या हृदयांत वास करतें, तेव्हां त्यापासून ब्राह्मणांचें श्रेष्ठ उपनिषद् असें परमश्रेष्ठ शास्त्र जगदुद्धारार्थ निर्माण होऊन तें सर्वांस विवेक-शक्ति देतें. या शास्त्रांत बरेंच ईश्वरी अगर दैवी मार्ग सांगितले असून ते अनुसरल्यास मोक्ष मिळतो. या शास्त्राचे अनेक प्रकार आहेत. अष्टांगी योगविद्या ज्यांनीं आचरिली आहे व ज्यांचें मन मानसयज्ञाच्या ठायीं रत झालें आहे, अशासच हें शास्त्र व रहस्यविद्या हीं फलदायी होतात. जे वेदांनां अनुसरून किंवा प्रमाण समजून चालतात, व अनेक देवतांची बाह्योपचारांनीं पूजा करण्याचें ज्यांनीं सोडून दिलें आहे, अशा ब्राह्मण योग्यांस अंतर्यामी वास करणा-या या एकमेवाद्वितीय ब्रह्माची मानसपूजा करण्याचा अधिकार आहे. क्षत्रिय, वैश्य व शूद्र या तीन वर्णांस व जे प्रपन्न म्हणजे गुरूला शरण गेलेले आहेत त्यांस चार व्यूहांची मंत्र म्हणून किंवा मंत्र न म्हणतां पूजा करण्याचा अधिकार आहे. हा त्यांचा अधिकार, चतुर्व्यूहांविषयीं जी विधिपरंपरा सांगितली आहे व विभव म्हणजे अवतार यांविषयीं जे मंत्र व विधी सांगितले आहेत तेवढ्यांपुरताच मर्यादित आहे. हे सर्व लोक सर्वसंगरहित, स्वकर्तव्यरत व कायावाचामनेंकरून परमेश्वराची भक्ति करणारे असे असावेत. याप्रमाणें चारी वर्ण लायक किंवा आधकारी झाल्यावर त्यांस मंत्रोपदेश करण्यांत येतो. आतां एका व्यूहाच्या पूजेची पद्धत सांगतो ती ऐक.''

यानंतर अक्षरांची गूढ मांडणी, मंत्र व मनन यांविषयी वर्णन दिलें आहे. मंत्रांची निरनिराळ्या त-हांनीं मांडणी करून पूजा करण्याचे गूढ मार्गच या ग्रंथांत सर्वत्र कथन केले आहेत. भीष्मपर्वांत ६६ व्या अध्यायाच्या शेवटीं संकर्षणानें वासुदेवाची सात्वत विधीप्रमाणें स्तुति केली असा उल्लेख आहे. हे सात्वतविधी म्हणजे बहुतकरून सात्वत संहितेंत सांगितलेलेच विधी असावेत.