प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.

वासुदेवानें स्थापलेला धर्म व गीतोपदिष्ट धर्म एकच काय - वरील विधान भक्तिसूत्र ८३ व त्यावरील टीका येथें केलें आहे. या ठिकाणीं एकान्तभाव म्हणजे केवळ भक्ति व एकान्तभाव व भगवदगीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय हे दोन्ही एकसारखे आहेत असें म्हटलें आहे. परंतु परमात्म्याचे संकर्षण वगैरे चार व्यूह आहेत याबद्दल भगवदगीतेंत कोठेंहि उल्लेख नाहीं. भागवत पंथाचें वरील चार व्यूह हें एक विशेष लक्षण समजलें जातें. भगवदगीतेंत वासुदेवाच्या प्रकृती सांगितलेल्या आहेत त्या येणेंप्रमाणें:-

॥ भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च ॥
॥ अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ॥
॥ जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ॥

भागवत धर्मांत जीव म्हणजे संकर्षण, अहंकार म्हणजे अनिरुद्ध आणि मन (बुद्धि) म्हणजे प्रद्युम्न असें सांगितलें आहे. यावरून असें दिसतें कीं, भागवत धर्मास व्यवस्थित शास्त्राचें स्वरूप येण्यापूर्वीं भगवद्गीता रचिली गेली असावी, व नंतरच्या काळांत परमश्रेष्ठ वासुदेवाच्या तीन प्रकृतींसाठीं संकर्षण, प्रद्युम्न व अनिरुद्ध हे त्याच्याच वंशांतील तीन पुरुष तीन देवता कल्पिल्या गेल्या. ''निद्देस'' पुस्तकावरून व शिलालेखांवरून या धर्माच्या भरभराटीच्या काळांत वासुदेवाबरोबर फक्त संकर्षणाचाच उल्लेख केला जात होता असें दिसतें. 'धनपति, राम, केशव यांच्या देवळांत भक्तलोक जमून वाद्यें वाजवीत' असा एक श्लोक आहे असें पतञ्जलीनें अष्टाध्यायी २.२, ३४ वरील आपल्या भाष्यांत म्हटलें आहे. या ठिकाणीं राम व केशव म्हणजे बलराम व वासुदेव-कृष्ण हेच होत. तेव्हां पतञ्जलीच्या काळांत वरील देवांच्या देवळांत उत्सव होत असत हें उघड आहे. पतंजलीनें अष्टाध्यायी ६.३, ६ वरील भाष्यांत ''व जनार्दन हा स्वतः चवथा'' असें म्हटलें आहे. त्याचा अर्थ तीन सोबती म्हणजे तीन व्यूह असा घेतला तर वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न व अनिरुद्ध हे चार व्यूह पतञ्जलीच्या काळींहि माहीत होते असें म्हणतां येईल. तरीपण ही बाब संशयित आहे; व आपणांस असे धरून चालतां येईल कीं, वरील तीन शिलालेखांपैकीं अगदीं अलीकडच्या (म्ह. ख्रि. पू. पहिल्या शतकांतील) जो शिलालेख आहे त्याच्या काळापर्यंत वासुदेव व संकर्षण हे फक्त दोनच व्यूह माहीत असावेत. अर्थात् चार व्यूहांच्या कल्पनेला त्या काळापर्यंत पूर्ण विकास झाला नसावा. ही विचारसरणी बरोबर असेल, तर भगवद्गीतेंत चार व्यूहांचा उल्लेख ज्या अर्थी मूळींच नाहीं त्या अर्थी ती ''निद्देस'' पुस्तक व वरील शिलालेख यांच्या बरीच आधीं म्हणजे किमान पक्ष ख्रि. पू. चौथ्या शतकाच्या बरीच आधीं रचिली गेली असली पाहिजे. गीता ज्या वेळीं रचली गेली, त्या वेळीं वासुदेव व नारायण एकच किंवा तो एक विष्णूचा अवतार आहे ही कल्पना रूढ नव्हती असें गीतेवरूनच स्पष्ट दिसतें. अकराव्या अध्यायांत, भगवंतांनीं अर्जुनास विराट् स्वरूप दाखविलं तेव्हां त्या स्वरूपाच्या अत्यंत देदीप्यमान् तेजानें अखिल विश्व व्यापलें जाऊन सर्व चराचर वस्तू तापल्या, त्यामुळें अर्जुनानें त्यास विष्णु ह्या नांवानें दोनदां संबोधिलें आहे. या ठिकाणीं परम श्रेष्ठ भगवान् ह्या अर्थी विष्णु ह्या शब्दाचा उल्लेख केला नसून आदित्यांतील मुख्य या नात्यानें केला आहे. एखाद्या समुदायांतील किंवा वर्गांतील श्रेष्ठ वस्तु ही वासुदेवाची विभूति असल्यामुळें त्यास या ठिकाणीं 'विष्णु' म्हटलें आहे.

एखादा धर्म प्रचारांत येतो तेव्हां त्या धर्माचा जो मूळ संस्थापक त्यानें तो धर्म स्थापला एवढें म्हणूनच त्या धर्माचे अनुयायी थांबत नाहींत, तर याच्याहि पुढें जाऊन आपल्या धर्माचा उगम किंवा आरंभ सदर अनुयायी मूळ संस्थापकाच्या मागच्या काळापर्यंत नेऊन भिडविण्याचा प्रयत्न करतात. यास अनुसरूनच सिद्धार्थाच्या आधीं बरेचसे बुद्ध व महावीराच्या आधीं बरेचसे तीर्थकर निर्माण करण्यांत आले.

त्याचप्रमाणें भागवत धर्माच्या बाबतींतहि प्रत्येक ब्रह्याच्या आरंभी प्रथमतः नारायण हा धर्म प्रगट करी व प्रस्तुतच्या ब्रह्म्याच्या काळांत तो पितामह किंवा प्रजापति, दक्ष, विवस्वत, मनु व इक्ष्वाकु यास अनुक्रमें सांगितला गेला असें सांगितलें असल्याचें वर दाखविलेंच आहे. हाच अनुक्रम गीतेच्या चौथ्या अध्यायांतहि सांगितला आहे. यावरून नारायणानें सांगितलेला एकान्तिक धर्म व गीतेंतील धर्म एकच या नारायणीय आख्यानांतील विधानास बळकटी येते. याप्रमाणें मूळ आरंभ किंवा उगम मागें नेऊन भिडविण्याच्या बाबतींत भागवत धर्माचें बौद्ध व जैन खटपटींशीं साम्य आहे.