प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.
वेदकालीं शैवादि संप्रदायाचें अस्तित्व.- वेदकालीन यज्ञसंस्था ज्या वेळेस नष्ट झाली नव्हती तर तिच्यांत शाखाभेद होतच होते अशा कालांत शैव, वैष्णव संप्रदायांचें अस्तित्व होतें हें दाखविण्यासाठीं भागवतधर्माच्या विवेचनाकडे वळण्यापूर्वीं एक उतारा देतो. हा उतारा मैत्रायणीय संहितेंतील (२. ९, १) आहे.
तत्पुरुषाय विद्महे, महादेवाय धीमहि ।
तन्नो रुद्रःप्रचोदयात् ॥
तद्गौच्याय विद्यहे, गिरिसुताय धीमहि ।
तन्नो गौरी प्रचोदयात् ॥
तत्कुमाराय विद्महे, कार्तिकेयाय धीमहि ।
तन्नः स्कन्दः प्रचोदयात् ॥
तत्कराटाय विद्महे, हस्तिमुखाय धीमहि ।
तन्नो दन्ती प्रचोदयात् ॥
तच्चतुर्मुखाय विद्महे पद्मासनाय धीमहि ।
तन्नो ब्रह्मा प्रचोदयात् ॥
तत्केशवाय विद्महे, नारायणाय धीमहि ।
तन्नो विष्णुः प्रचोदयात् ॥
तदभास्कराय विद्महे, प्रभाकराय धीमहि ।
तन्नो भानुः प्रचोदयात् ॥
तत्सोमराजाय विद्महे, महाराजय धीमहि ।
तन्नश्चंद्रः प्रचोदयात् ॥
तत्परमात्माय विद्महे, वैनतेयाय धीमहि |
तनः सृष्टिः प्रचोदयात ॥
यासारखा उतारा काठक संहितेंतहि १७.११ येथें आढळतो. यावरून शैव, वैष्णव संप्रदायांच्या अधिष्ठानभूत देवता भौतिकस्वरूपांत असलेल्या संहिताकारांस सांपडल्या आणि त्यांस त्यांनीं आपल्या यज्ञसंस्थेंत स्थान दिलें हें उघड आहे. या देवतांचें अस्तित्व केवळ वेदोत्तर नसून वेदकालींच श्रौतेतर प्रचलित परमार्थसाधनांत होतें. म्हणजे यांचा मांत्रेतर संस्कृतींतून श्रौत संस्थांत समावेश झालेला दिसतो.
या विषयावर डॉ. भांडारकरांनीं जें विवेचन केलें आहे तें बरेंचसें सविस्तर असल्यामुळें येथें त्याचा गोषवारा विचारभिन्नतेमुळें होणारे फेरफार करून देतों.
उपनिषदांचें संहितीकरणात्मक स्वरूप - पुढील काळांतील पूजाविषयक व धर्मविषयक विचारांच्या वाढीस वळण लावण्याच्या कामीं उपनिषदांचें बरेंच प्रमुख अंग आहे.
ईश्वर, मनुष्य व जग यांचें स्वरूप काय व त्यांचा एकमेकांशीं संबंध काय याविषयींचीं निरनिराळ्या मतांचीं तत्त्वें उपनिषदांत सांठविलीं आहेत. एकमेकांशीं विसंगत असलेले असे जे अर्वाचीन काळांतील अनेक धर्मविषयक व तत्त्वज्ञानविषयक पंथ आहेत ते आपल्या विशिष्ट मतास आधारभूत असे उतारे उपनिषदांतूनच घेतात. ब-याच ठिकाणीं हे उतारे बरोबर घेतलेले आहेत; पण आपआपल्या मतांची तरफदारी करण्याकरितां आपल्या विशिष्ट तत्त्वांशीं जुळणारा अर्थ विरुद्ध बाजूच्या ग्रंथांतूनहि बळेंच काढण्याचा प्रयत्न झाला आहे तो मात्र उघड उघड चुकीचा आहे. ॠग्वेद संहिता ज्याप्रमाणें निरनिराळ्या व्यक्तींनीं रचिली त्याप्रमाणें उपनिषदेंहि निरनिराळ्या माणसांनीं रचिली आहेत; असें असल्यामुळें उपनिषदांत केवळ एका मताचेंच नव्हे तर अनेक मतांचें प्रतिपादन केलेलें आढळतें. प्राचीन ॠषींच्या विचारांनां शाब्दिक स्वरूप मिळून ते एका पिढीकडून दुसरीस तोंडीं पढविण्यांत आले, व त्यांचा एक मोठा संग्रह तयार झाला. हे सर्व विचार (शाब्दिक स्वरूपांत आल्यावर) संगृहीत करून ठेवण्याची जेव्हां कल्पना सुचली तेव्हां त्या सर्वांचा निरनिराळ्या वैदिक पंथांच्या उपयोगासाठीं वेगवेगळ्या पुस्तकांत समावेश केला गेला; व म्हणूनच एका उपनिषदांत आढळणारे कांहीं श्लोक किंवा उतारे किंवा कधीं कधीं तर सबंध प्रकरणेंचीं प्रकरणें दुस-या उपनिषदांत जशींचीं तशींच उतरलेलीं आढळून येतात.