प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.
शंकाराचार्यकथित वासुदेवोपासनेचे पांच मार्ग - ब्रह्मसूत्र २.२, ४२ या ठिकाणीं भागवत पंथाचा परामर्श घेतांना शंकराचार्यांनीं चतुर्विध व्यूहासहित भगवान् वासुदेवाची उपासना करण्याचे पांच मार्ग सांगितले आहेत. ते येणेंप्रमाणें:- (१) अभिगमन किंवा कायावाचामन हीं सर्व देवाच्या ठायीं एकवटून त्याच्या देवळांत जाणें; (२) उपादान किंवा पूजासाहित्य तयार करणें; (३) इज्या किंवा पूजा; (४) स्वाध्याय म्हणजे मंत्रपुरश्चरण किंवा जप; आणि (५) योग म्हणजे ध्यान. या पांच मार्गांनीं भगवंताची १०० वर्षे उपासना केल्यास, मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होऊन भगवंताप्रत जातो असें तेथें म्हटलें आहे.