प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.
विचारविकासाच्या दोन पाय-या - सदरहू दोन हकीकती या विचारविकासाच्या बाबतींतील दोन पाय-या म्हणतां येतील. जींत वासुदेव व त्याचे इतर तीन व्यूह यांची पूजा सांगितली नाहीं, ती मूळ पायरी होय. परमश्रेष्ठ देवास हरि म्हणत व त्याच्या उपासनेंत यज्ञयागादि कर्मविषयक धर्माचा थोडाबहुत अवशेष कायम होता. ऐतिहासिक विभूतीशीं या मूळ सुधारणेचा कांहीं एक संबंध नव्हता. चित्रशिखंडी नांवानें संबोधल्या जाणा-या ॠषींकडून या धर्माचा प्रसार कला गेला. दुसरी पायरी जीस म्हणतां येईल तीमध्यें वासुदेव, त्याचा भाऊ बलराम, मुलगा प्रद्युम्न व नातू अनिरुद्ध या सर्वांचा संबंध जोडला आहे; भगवद्गीतेंत सांगितलेला धर्म व हा धर्म एकच असें म्हटलें आहे; व या धर्माचा प्रसार स्वतः नारायणांनींच केला असें प्रतिपादिलें आहे.
यावरून असें दिसून येईल कीं, भक्तिप्रधान धर्माची कल्पना मुळारंभीं निघाली; व तीस, अर्जुनास वासुदेवानें गीता सांगितली तेव्हांपासून मूर्त व निश्चित स्वरूप प्राप्त झालें. पुढील काळांत वासुदेवाचा भाऊ बळराम, मुलगा प्रद्युम्न, नातू अनिरुद्ध ह्या मानसिक व्यापारांच्या अधिष्ठात्री देवता असून हीं सर्व वासुदेवानें निर्माण केलेलीं त्याचीं स्वतःचींच रूपें होत या कल्पनेची त्यांत भर पडून या सर्वांची एकत्र सांगड घातली गेली. या सर्व कल्पनांचा ज्यांत समावेश केला आहे, असा एक स्वतंत्र धर्मपंथ अस्तित्वांत आला. व सात्वत लोकांचा पंथ व हा पंथ हे दोन्ही एकच समजण्यांत येऊं लागले. तेव्हां आतां हे सात्वत कोण तें पाहूं.