प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.
या काळांतील सर्वसामान्य स्थिति - या दीर्घ कालांत अशी विशिष्ट गोष्ट सांपडत नाहीं कीं, जिच्या योगानें एका राष्ट्रापेक्षां दुस-या राष्ट्राचा इतिहास अधिक महत्त्वाचा किंवा फारसा भिन्न होईल. अनेक राष्ट्रें व त्यांतील मारामा-या या चालूच असाव्यात. कोणीहि सार्वभौमत्वाची प्रामाणिकपणानें खटपट करावी. एकानें दुस-याचा प्रदेश जिंकण्यांत पाप नाहीं अशा त-हेची राजनीति भारतयुद्धकालीं संपली नाहीं. लोकांचा राजाचा धंदा कोण करतो या विषयींचा बेफिकीरपणा, संस्कृत भाषेची भ्रष्टता पण कोणत्याहि प्राकृत भाषेचा विकासाभाव, अशा प्रकारची सर्वसामान्य स्थिति या कालांत होती. म्हणजे हा संस्कृतिविकासाच्या दृष्टीनें फारसा महत्त्वाचा काल नव्हता. मात्र या कालांत संस्कृत पंडितांच्या आणि ब्राह्मणांच्या विचारांचा ओघ अप्रतिहत चालत असावा, आणि औपनिषद विचारांचा प्रसार चोहोंकडे झाला असावा. यामुळें या काळांतील बौद्धिक भारतीय इतिहासच कायतो उपलब्ध असून राजकीय इतिहास अज्ञात आहे. त्याच्या नंतरच्या काळाचा इतिहास मात्र बराच मनोरंजक आहे. कला, नवीन मतें, नवीन विचारसंप्रदाय यांनीं हा काल चित्रित आहे. तथापि हें शक्य आहे कीं, भागवत धमाचीं मुळें बुद्धपूर्व असतील आणि कुरुयुद्धोतर बुद्धपूर्व काळामध्यें नारायणीस धर्माच्या रूपांत भावी कालाचें प्रतिबिंब पडलें असेल.
इतिहासाचे बुद्धपूर्व आणि बुद्धोत्तरकाल असे दोन भाग केले आहेत, तरी येथें हें सांगून ठेविलें पाहिजे कीं, बुद्धोत्तर काल हा शब्द वापरण्यापेक्षां महावीरोत्तर काल हा शब्द वापरला असतां शब्दयोजना अधिक सार्थ होईल. महावीराच्या वार्धक्यकालीं बुद्ध तरुण असावा असें दिसतें. श्रौत धर्माखेरीज इतर पारमार्थिक विचारांची उचल ज्या काळांत झाली तो काळ बुद्धापूर्वीचाच होता, आणि ज्या कर्त्या पुरुषांनीं ती घडवून आणली त्यांमध्यें सात्वतांतील कृष्ण आणि जैनांचा महावीर हे दोन प्रमुख पुरुष होऊन गेले होते. श्रौतधर्म भारतीयुद्धाच्या वेळेसच संकोच पावत होता. भारतीयुद्धानंतर शेंपन्नास वर्षांनीं झालेलें म्हणजे व्यासशिष्यांनीं घडविलेलें संहितीकरण कायम झालें याचा अर्थ श्रौतविकास पुढें फारसा झाला नाहीं हाच होय. सूत्रग्रंथांमध्यें जे थोडे बहुत फरक दिसतात त्यांत अथर्व्यांची विद्या त्रैविद्यांनीं आत्मसात् करून घेऊन अथर्व्यांचें अस्तित्व निष्प्रयोजन केलें ही क्रिया झालेली दिसते.
कर्मवादाचें महत्त्व कमी झालें व ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग यांमध्यें, आणि तशीच जैन व बौद्ध संप्रदायाचे चित्तशुद्धिमार्ग यांमध्यें स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेमुळें पुढें अनेक विचारसंप्रदाय उत्पन्न झाले. जैन व बौद्ध यांनीं आपले संप्रदाय परंपरेपासून अगदीं पृथक् करण्याची खटपट केली, तर भागवतांनीं आणि ज्ञानमार्गी वेदांत्यांनीं ''स्वतः जगावें व दुस-यास जगूं द्यावें'' या त-हेच्या नीतितत्त्वाचा अवलंब करून आपलें महत्त्व स्थापन केलें. वेदांत व भक्तिमार्ग यांच्या विचारांमध्यें देखील पुढें अन्योन्याश्रम उत्पन्न झाला. ज्ञान हें अंतिम साध्य झालें आणि ज्ञान उत्पन्न होण्यापूर्वीं भक्तीची आवश्यकताहि मान्य झाली. वैदिक कर्ममार्ग सर्व जनसमाजास स्मार्त संस्कारांपुरताच राहिला. ही चळवळ समजून घेण्यास पुढील विवेचन उपयोगीं पडेल. प्रथम आपण भागवत धर्माकडे वळूं.