प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.

भागवत धर्माचे अष्टाध्यायींतील व शिलालेखांतील उल्लेख - पाणिनीच्या अष्टाध्यायींतील ४. ३, ९८ व्या या सूत्रांत ''वासुदेव'' हें नांव आलें आहे; त्याचा पतंजलीच्या भाष्यांत ''पूज्य'' व्यक्तीचें नांव असा अर्थ दिला आहे.

''पूज्य'' म्हणजे सर्वांत अतिशय पूज्य म्हणजे देव. तेव्हां वासुदेवाची उपासना किंवा भक्ति बौद्धाचा मुळींच उल्लेख न करणा-या पाणिनीच्या काळाइतकी तरी जुनी आहे असें म्हटलें पाहिजे.

राजपुतान्यांत ''घोसुंडि'' येथें मोडक्या तोडक्या स्थितींत असलेला एक शिलालेख सांपडला आहे ''संकर्षण'' व ''वासुदेव'' यांच्या मंदिराभोंवतालच्या भिंतीचा उल्लेख त्यांत आला आहे. हा शिलालेख निदान ख्रि. पू. २०० वर्षांचा असावा.

बेसनगर येथे एक शिलालेख सांपडला आहे. त्यांत देवाधिदेव जो वासुदेव त्याच्या सन्मानार्थ हेलिओडोरानें गरुडध्वज उभारला असें म्हटलें आहे [विविधज्ञानविस्तार वर्ष ४१, देवदत्त भांडारकर याचे लेख पहा]. हेलिओडोर स्वतःस भागवत म्हणवून घेंत असे. या शिलालेखांत ''अंतलिकित'' हें गांवाचें नांव आलें आहे. बॅक्ट्रो-ग्रीक नाण्यांवर ज्याचा उल्लेख आहे असें ''अतिआल्किडस'' व वरील नाव बहुधा एकच असावें. हा शिललेखहि ख्रिस्तपूर्व दुस-या शतकाच्या पूर्वार्धातील असावा. या काळीं वासुदेव हा देवाधिदेव समजला जात असे व त्याचे उपासक भागवत या नांवानें संबोधले जात. या काळीं भागवत धर्म हिंदुस्थानच्या वायव्य भागांत पसरलेला होता व ग्रीकांनींहि तो उचलला होता.

नानाघाट येथील शिलालेख नं. १ मध्यें संकर्षण व वासुदेव यांच्या नांवांचा द्वंद्व समास आढळतो. हा शिलालेख ख्रि. पू. पहिल्या शतकांतील असावा.