प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.

भक्ति शब्दाचा उपनिषत्कालीन अर्थ. - येणेंप्रमाणें भगवद्गीतेंतील एकान्तिक धर्माच्या सर्व बाबी प्राचीन तत्त्वज्ञानविषयक वाड्मयांत आढळून येतात. प्रेम या अर्थीं भक्ति हा शब्द श्वेताश्वतरोपनिषदाशिवाय दुस-या ठिकाणीं कोठेंहि योजलेला दिसत नाहीं. पण नेहमीं प्रेम या अर्थीं सदर शब्द रामनुजानें देखील वापरलेला नाहीं. रामानुजाच्या मतांत, भक्ति म्हणजे संतत ध्यान (किंवा उपनिषत्कालीं ज्यास उपासना म्हणत ती) असा अर्थ आहे. भक्ति या शब्दाचा व्युत्पत्तिशास्त्रदृष्ट्या मूळ अर्थ “चा अवलंब करणें, आश्रय करणें” असा असून नंतर “ज्या वस्तूचा अवलंब केला असेल तिजवर प्रेम करणें” असा आहे. याच अर्थी पाणिनीनें (४.३, ९५) हा शब्द वापरला आहे. पण टीकाकारांनीं तो कर्मणि अर्थानें घेऊन आवडली किंवा प्रिय वस्तु असा त्याचा अर्थ दिला आहे. त्यांनीं कांहीं सामान्य वि विशेष सांगितले असून ते एखाद्या नामास लाविले म्हणजे त्या नामानें जी वस्तु दर्शविली जाते ती वस्तु ज्वास आवडते तो असा अर्थ होतो. या अर्थीं भक्ति हा शब्द यास्कानें वापरला आहे. उ. अग्निभक्तीनि, इन्द्रभक्तीनि वगैरे. यावरून असें दिसून येईल कीं, प्रेमाची कल्पना सदर शब्दांत पूर्वींच्या काळींहि होती; फरक इतकाच कीं, त्याचा “प्रेम” असा भाववाचक अर्थ नसून “प्रेम केलेला” असा विशेषणात्मक अर्थ होता. खरें पाहिलें तर पाणिनीच्या नियमाप्रमाणें ‘ति’ हा भाववाचक प्रत्यय असल्यानें “प्रेम” असाच अर्थ व्हावयास पाहिजे. पुढील काळांत हा शब्द कशाहि अर्थानें प्रचारांत आलेला असो, त्यांत परमात्म्याविषयीं प्रेम ही जी कल्पना आहे ती उपनिषत्कालीं “प्रिय” किंवा “प्रेय:” या शब्दांनीं व्यक्त करीत.