प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.
भगवद्गीतेचें मूळ - कर्माच्या फलाकडे लक्ष न देतां म्हणजे निष्काम कर्म करीत राहणें हा भगवद्गीतेचा विशेष होय. तथापि ही कल्पना नवीन नाहीं. ईशोपनिषदांत दुस-या श्लोकांत असें सांगितलें आहे:-
कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतंसमाः ।
एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ॥
अर्थ:- निश्चयानें कर्म करीत रहात १०० वर्षें जगण्याची इच्छा माणसानें धरावी. अशा कृत्यानेंच कर्माचा त्याला लेप होणार नाहीं. मन उन्नत झाल्यावर कर्माचा लेप होत नाहीं.
अशाबद्दल छां. उ. ४.१४, ३ बृह. उ. ४.४, २३, व मै. उ. ६.२० या ठिकाणीहि उल्लेख आले आहेत.
परमश्रेष्ठ ईश्वराचे गुण गीतेनें उपनिषदांतून घेतलेले आहेत. परमेश्वराच्या मूर्त स्वरूपाचें स्पष्ट वर्णन उपनिषदांत कांहीं ठिकाणीं आलें आहे. तथापि कांहीं ठिकाणीं निव्वह ब्रह्माचेंहि (याचें स्वरूप तितकें व्यक्त नाहीं) वर्णन आलें आहे. भगवद्गीतेनें एतद्विषयक जे जे उतारे घेतले आहेत त्यांत अक्षरास किंवा ब्रह्मास मूर्त स्वरूप देण्याची पूर्ण खबरदारी घेतलेली आहे. आत्मसंयम किंवा इंद्रियनिग्रह करून परम शांतीप्रत किंवा निर्वाणास जाण्याचें गीतेंतील तत्त्वहि अगदीं आरंभींच्या उपनिषदापासून निरनिराळ्या पंथांच्या स्थापनेच्या काळापर्यंत सामान्यपणें प्रचलित होतें. म्हणून ब्रह्म-निर्वाणाची कल्पना गीतेंत बुद्धपंथांतून घेतली आहे असें म्हणतां येत नाहीं. सर्व पंथांतील या कल्पनेचा उगम एकच आहे.
उपनिषदांशिवाय इतर प्राचीन स्थळांतून गीतेनें तत्त्वज्ञान घेतलें आहे. हीं स्थळें म्हणजे सांख्य व योग हीं दर्शनें होत. सांख्य दर्शनांत सांगितलेलीं २४ तत्त्वें, त्यानंतरच्या काळांतील पुरुष किंवा आत्मा यासंबंधाचें २५ वें तत्त्व, फक्त प्रकृति तेवढीच व्यापारवान् आहे - पुरुषाला व्यापार नाहीं ही कल्पना, या सर्वांचा गीतेंत उल्लेख केला आहे. तथापि उत्तम पुरुष किंवा परमात्मा या संबंधाच्या सांख्यांत न आढळणा-या कल्पनेची गीतेनें नवीन भर टाकून एकपरी सदर दर्शनांस ईश्वराचें अस्तित्व मान्य करावयास लावलें आहे. सृष्टीच्या उत्पत्तिवर्णनाच्या बाबतींत पुराणें सदर तत्त्वज्ञानाचेंच अनुकरण करतात. उत्तरकालीन वैष्णव व शैव पंथांत हीच तत्त्वपरंपरा प्रसंगविशेषीं कमीजास्त फेरफार करून घेतली आहे. भगवद्गीतेंत सांख्य शब्द योजला आहे तो ईश्वराचें अस्तित्व ज्यांत मानलें नाहीं अशा उत्तरकालीन सांख्य-दर्शनाबद्दल योजलेला नाहीं. दुस-या व पांचव्या अध्यायावरून असें दिसतें कीं, ज्ञानमूलक तत्त्वज्ञान तें सांख्य व कर्ममूलक तत्त्वज्ञान तो योग असा अर्थ अभिप्रेत असावा सांख्य दर्शनांत सांगितलेलीं म्हणून जीं शेवटच्या अध्यायांत पांच कारणें दिलीं आहेत, तीं पुढील काळांतील सांख्य-तत्त्वज्ञांस माहीत नसावींत असें दिसतें. तेव्हां श्वेताश्वतरोपनिषद् व भगवदगीता यांच्या काळचें जें तत्त्वज्ञान तें सांख्य होय, व यांतूनच पुढील नास्तिकवादी सांख्य तत्त्वज्ञान निघालें असावें. योगदर्शनाचाहि या तत्त्वज्ञानावर बराच पगडा बसलेला होता; पण ब्रह्म, अक्षर किंवा परमात्मा यावर बाकीचे व्यापार बंद करून चित्ताची एकाग्रता करण्यापर्यंत त्याची मजल गेली होती, हा त्यांतील विशेष आहे.