प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.

भक्तिधर्माच्या उपदेशकाचें नांव वासुदेव कीं कृष्ण - भगवद्गीतेंत ''...ज्ञानवान् मां प्रपद्यते ।  वासुदेवः सर्वमिति...'' असें म्हटलें आहे. ॐ नमो भगवते वासुदेवाय'' या द्वादशाक्षरी मंत्रांतहि वासुदेवाचाच निर्देश केला आहे. भीष्मपर्व अ. ६५ मध्यें ब्रह्मदेवानें पुरुष परमेश्वराची स्तुति करून यदुकुलाचा विस्तार करण्याविषयीं प्रार्थना केली आहे व नंतर म्हटलें आहे:-

यत्तत् परमकं गुह्यं त्वत्प्रसादादिदं प्र (वि) भो ।
वासुदेव तदेतत्ते मयोदगीतं यथातथम् ॥६९॥
दृ (सू) ष्टवा संकर्षणं देवं स्वयमात्मानमात्मना ।
कृष्ण त्वमात्मन् साक्षी (त्वमात्मनास्त्राक्षीः) प्रद्युम्नं

                  ह्या (चा) त्मसम्भवम् ॥७०॥

प्रद्युम्नञ्चानिरुद्धं (प्रद्युम्नादनिरुद्धं त्वं) यं विदुर्विष्णुमव्यम् ।
अनिरुद्धोऽमृजन् मां वै ब्रह्माणं लोकधारिणं ॥७१॥
वासुदेवमयः साऽहूं त्वयैवास्मि विनिर्मितः ।
विसृज्य (विभज्य) भागशोऽत्मानं व्रज मानुषतां विभो ॥७२॥

याच पर्वाच्या ६६ व्या अध्यायांतहि प्रजापति म्हणतो:-

जगातोऽनुग्रहार्थाय याचितो मे जगत्पतिः ॥७॥
मानुषं लोकमातिष्ठ वासुदेव इति श्रुतः ।

या अध्यायांत सनातन अशा पुरुष परमेश्वराला सर्वत्र वासुदेव असेंच संबोधिलें आहे. या दोन अध्यायांत, पूर्वींच्या काळीं पुरुष परमेश्वर जो वासुदेव त्यानें संकर्षणापासून ब्रह्मदेवापर्यंत व्यक्ती निर्माण केल्या होत्या त्याचप्रमाणें प्रस्तुत प्रसंगींहि युदुकुलाचा विस्तार करण्यासाठीं, वासुदेव म्हणून यदुकुलांत जन्म घेण्यासाठीं व वर निर्दिष्ट केल्याप्रमाणें स्वतःचे चार अंश (विसृज्य भागशः आत्मानम) निर्माण करण्यासाठीं ब्रह्मदेवानें (ईश्वराची) प्रार्थना केली आहे. यावरून हें स्पष्ट दिसतें कीं, भक्ति-धर्माचा मूळ उपदेशक वासुदेव हाच असून पूर्वींच्या युगांतील आपल्या इतर तीन मूर्तींसह तो अस्तित्वांत होता. वृष्णिकुळांत उत्पन्न झालेला या नात्यानें महाभाष्य व काशिका टीका या दोहोंमध्येंहि ''वासुदेव'' हेंच नांव त्यास दिलेलें आढळतें. भगवद्गीतेंतहि ''वृष्णीनां वासुदेवोस्मि'' असेंच म्हटलें आहे. ''घटजातक'' या बौद्ध ग्रंथांत उपसोगर व देवगभ्भा यांच्या दोन ज्येष्ठ मुलांचीं नांवें ''वासुदेव'' व ''बलदेव'' अशीं आहेत. गद्यात्मक भागांत दुसरें कोणतेंहि नांव आढळत नाहीं; पण गद्यपद्यमिश्रित असा जो भाग आहे त्यांत ''कण्ह'' व ''केशव'' हीं नांवें आढळतात. ''कण्हायन'' गोत्रांतील म्हणून ''कण्ह'' हें नांव पडलें असा टीकाकारानें अर्थ दिला आहे - म्हणजे व्यक्तीचें नांव वासुदेवच होतें असा टीकाकाराचाहि समज आहे. कारण सदर टीकाकारानें दुस-या एका ठिकाणीं म्हणजे ''महौम्मग्गजातक'' ग्रंथांतील एका श्लोकावरील आपल्या टीकेंत ''जम्बावती'' ही वासुदेव कण्हाची आवडती राणी होती असें म्हटलें आहे. मूळ श्लोकांत ''वासुदेवस्स कण्हस्स'' असें म्हटलें आहे. त्यावरून कण्ह हें गोत्राचें नांव व 'वासुदेव' हें व्यक्तीचें नांव असावेंसें दिसतें.

याप्रमाणें ''वासुदेव'' हें व्यक्तीचें विशेषनाम होतें, व जेव्हां वासुदेव किंवा भागवत धर्म उदयास आला त्या वेळीं या धर्मांतील मुख्य देवास हें नांव मिळालें असें दिसतें. वसुदेव हा त्याचा पिता होय ही कल्पना नंतरची असावी. कारण वर दाखविलेंच आहे कीं, महाभाष्यांत ''वासुदेवाः'' याचा अर्थ ''वसुदेवाचे'' पुत्रपौत्रज असा घेतला नसून ''वासुदेवाचे'' पुत्रपौत्रज असा घेतला आहे (ज्याप्रमाणें बालदेव हे बलदेवाचे पुत्रपौत्रज). बलदेवाची सांगड वसुदेवाशीं घातलेली नसून, वासुदेवाशीं घातलेली आहे. कृष्ण, जनार्दन, केशव हीं वृष्णिकुलात्पन्न पुरुषांचीं नांवें नसून तीं मागाहून म्हणजे वासुदेवधर्म चोहोंकडे पसरल्यावर वासुदेवास मिळालेलीं असावींत. हीं तिन्ही नांवें पतञ्जलीच्या महाभाष्यांत आढळतात. तथापि शेवटची दोन फक्त एके ठिकाणींच आढळतात. या सर्वांत महत्त्वाचें असें नांव कृष्ण हें होय. वासुदेव या नांवाप्रमाणें हेंहि विशेष नामच आहे. पण वासुदेव हें नांव उच्चारतांच धर्मसंबंधीं अर्थ किंवा कल्पना विशेषेंकरून डोळ्यापुढें उभी राहते. आतां असा प्रश्न उद्भवतो कीं, कृष्ण हें नांव कसें प्रचारांत आलें असावें ?