प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.

पूज्य देव, वासुदेव व वृष्णि कुलांतील वासुदेव एकच.- पतंजलीच्या महाभाष्यांत वासुदेवाचा उल्लेख आल्याबद्दल वर सांगितलेंच आहे. त्यांत तो म्हणतो, वासुदेव हें क्षत्रियाचें नांव समजावयाचें नसून पूज्य देवाचें समजावयाचें. वृष्णि कुलांतील वासुदेवाचा व या वासुदेवाचा मुळींच संबंध नाहीं असा पतंजलीच्या म्हणण्याचा आशय आहे किंवा काय हें पाहिलें पाहिजे ''निद्देस'' या पाली पुस्तकांत वासुदेवाचा बलदेवाच्या बरोबरच उल्लेख केला आहे. त्यावरून व वरील तीन शिलालेखांपैकीं दोहोंमध्यें संकर्षण व वासुदेव यांचा बरोबरच निर्देश केला आहे त्यावरून ''पूज्य देव'' असें ज्यास पतंजलि म्हणतो तो वासुदेव वृष्णि कुलांतीलच असला पाहिजे. वासुदेव हा क्षत्रिय असून अवतारी पुरुष होता असा पतंजलीच्या म्हणण्याचा अर्थ घ्यावयास हरकत नाहीं. भागवत धर्माच्या सर्व वाङ्‌मयावरून अवतारी पुरुष व पूज्य देव म्हणून समजला जाणारा वासुदेव वृष्णि कुलांतीलच असावा हेंच उघड होतें.