प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.

नारायण शब्दाची व्युत्पत्ति - नारायण हा शब्द नाडायन या शब्दाप्रमाणें आहे. पाणि. ४.१, ९९ (नडादिभ्यः फक) या सूत्रास धरून नाडाथन रूप झालें आहे; व त्याचा अर्थ नाडायन गोत्र असा आहे. यांतील प्रत्यय अन्वर्थक असून या ठिकाणीं त्याचा अर्थ नाड लोकांचें आश्रयस्थान किंवा ते ज्या ठिकाणाप्रत जातात तें ठिकाण असा आहे. याप्रमाणेंच नारायण म्हणजे नारांचें आश्रयस्थान होय. नारायणीय आख्यानांत (महाभारत, पर्व १२, अध्याय ३४१) श्रीहरि अर्जुनास ''अहमेव गतिस्तेषां (नराणाम)'' असें म्हणतात. शूर पुरुष या नात्यानें देवांस नृ किंवा नर शब्द विशेषतः वेदांत लावलेला आहे. तेव्हां देवांचें आश्रयस्थान किंवा गति असाहि नारायण शब्दाचा अर्थ घेतां येईल.