प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.

नारायण व वासुदेव एकच - याप्रमाणें नंतरच्या ब्राह्मण-काळांत परब्रह्माच्या पदवीस चढलेला नारायण वासुदेवाच्या पूर्वींच अस्तित्वांत होता; पण पुढें महाभारताच्या काळीं जेव्हां वासुदेवभक्ति प्रचारांत आली तेव्हां नारायण व वासुदेव हे दोन एकच मानले गेले. वनपर्वांत (अ. १८८-८९) विश्वाच्या प्रलयकालच्या स्थितीचें वर्णन केलें आहे त्यांत असें म्हटलें आहेः

''सर्वत्र पाणीच पाणी होऊन गेलें व त्या पाण्याच्या पृष्ठभागावर न्यग्रोध वृक्षाच्या एका फांदीवर पर्यंकावर निजलेलें एक अर्भक होतें. या अर्भकानें आपलें तोंड उघडून मार्कण्डेयास आंत घेतलें. मार्कण्डेयानें आंत सर्वत्र संचार करून तेथें अखिल विश्व पाहिलें तेव्हां त्यास अत्यंत विस्मय वाटला. अर्भकानें मार्कण्डेयास तोंडाबाहेर काढतांच त्यास पुन्हां सर्वत्र पाणी दिसूं लागलें. तेव्हां मार्कण्डेयानें त्या अर्भकास तूं कोण असा प्रश्न केला. अर्भकानें उत्तर दिलें कीं पुरातन काळीं मी पाण्यास 'नाराः' हें नांव दिलें व तें माझें निवास स्थान म्हणजे 'अयन' असल्यामुळें मला नारायण हें नांव मिळालें.''

येणेंप्रमाणें नारायणानें आपलें गुणमाहात्म्य वर्णन केलें तें येथें दिलें आहे. मार्कण्डेय युधिष्ठिरास ही गोष्ट सांगतांना शेवटीं म्हणतो कीं, हा जो जनार्दन तुझा नातेवाईक आहे तो व नारायण एकच. नारायणीय आख्यानाचें तर नारायण व वासुदेव हें एक पालुपदच दिसतें. या सृष्टिकर्त्या नारायणाशिवाय नरनारायण यांत ज्या नारायणाचा उल्लेख येतो त्या नारायणाविषयींहि एक गोष्ट आहे. ''द्वासुपर्णासयुजा सखाया'' या उपनिषद्वाक्यांतील कल्पनेवरून ही नरनारायणाच्या जोडीची कल्पना केली असावी. दोन पक्ष्यांपैकीं ज्यास स्वामी म्हटलें आहे व जो एका ठिकाणीं बसून सर्वत्र टेहळणी करतो तो सदर कथेंतील नारायण होय; आणि दुसरा जो फळें खाण्यांत गर्क झाला आहे तो नर होय. नारायणीय आख्यानाच्या पहिल्या अध्यायांत सनातन विश्वात्मा जो चार मूर्ती धारण करणारा तो धर्माचा पुत्र होय असें म्हटलें आहे. ह्या चार मूर्ती म्हणजे नर, नारायण, हरि व कृष्ण या होत. यांपैकीं पहिल्या दोघांनीं आपणांस बदरिकाश्रमीं तपश्चर्या करण्यास वाहून घेतलें. वामनपुराणांतहि (अ. ६) हीच कथा दिली आहे. या चार मूर्ती ही धर्माचीं चार मुलें असून ''अहिंसा'' ही त्यांची माता होय असें तेथें म्हटलें आहे. या गोष्टींत कांहीं विशेष अर्थ भरलेला दिसतो. ही गोष्ट त्या काळच्या परिस्थितीची निदर्शक असावी. नवीन पंथ उदयास आले त्या काळीं यज्ञयागादि कर्में व प्राणिहत्या ज्यांत सांगितली आहे अशा धर्माविरुद्ध नीति व अहिंसा या दोन तत्त्वासंबंधीं विचारांची खळबळ चालू होती. तेव्हां सद्धर्म किंवा धार्मिकपणा व अहिंसा ही दोन तत्वें ज्यांत गोंविलीं गेली आहेत अशा पंथाशीं वरील चार मूर्तीचा किंवा नांवांचा संबंध जोडला जावा हें साहजिक आहे. धर्म हा पिता व अहिंसा ही माता असें जें म्हटलें आहे त्याचा हाच अर्थ अभिप्रेत असावा. नर व नारायण यांस कधीं कधीं ॠषी म्हणतात, त्याचा नारायण हा पुरुषसूक्ताचा ॠषि किंवा कर्ता अशी जी कल्पना आहे तिच्याशीं संबंध असावा. महाभारतकाळीं हे दोघेहि फार प्रसिद्ध असले पाहिजेत. कारण, प्रत्येक पर्वाच्या आरंभीं या दोघांस वंदन केलें आहे. वनपर्व अ. १२ श्लो. ४६-४७ या ठिकाणीं जनार्दन अर्जुनास म्हणतो:-

नरस्त्वमसि दुर्धर्ष हरिर्नारायणो ह्यहम् ।
काले लोकमिमं प्राप्तौ नरनारायणावृषी ॥
अनन्यः पार्थ मत्तस्त्वं त्वत्तश्चाहं तथैवच ।
नावयोरन्तरं शक्यं वेदितुं भरतर्षभ ॥

याच पर्वाच्या ३० व्या अध्यायांत महादेव अर्जुनास म्हणतो:-  ''तूं पूर्वीं नरॠषि असून नारायण हा तुझा सहाध्यायी होता; व बदरिकाश्रमीं तुम्हीं दोघांनीं हजारों वर्षे तपश्चर्या केली.'' त्याचप्रमाणें

वासुदेवार्जुनौ वीरौ समवेतौ महारथौ ।
नरनारायणौ देवौ पूर्वदेवाविति श्रुतिः ॥

असें उद्योगपर्व अ. ४९ श्लो. १९ या ठिकाणीं म्हटलें आहे. अर्जुन व वासुदेव हे नरनरायण आहेत अशा बद्दलचीं आणखी पुष्कळ स्थळें आहेत. सारांश भगवद्गीतारूपी संवाद ज्या दोघांत झाला ते दोघे अर्जुन व वासुदेव यांचा संबंध नरनारायण ॠषींच्या गोष्टीशीं जोडला गेला आहे.