प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.
नारायणाविषयीं दंतकथेचा विकास - नारायण व उत्पत्तिकाळचें पाणी यांचा संबंध जोडणारी एक दंतकथा आहे. मनुस्मृति १.१० या ठिकाणीं व वरील नारायणीय आख्यानांत 'आपो नारा इति प्रोक्ता आपो वै नरसूनवः' असें म्हटलें आहे; व पहिल्या ठिकाणीं पाणी हें ब्रह्मदेवाचें, व दुस-या ठिकाणी श्रीहरीचें वसतिस्थान असल्यामुळें दोघांसहि नारायण म्हटलेलें आहे. वायुपुराण व विष्णुपुराण यांमध्येंहि असेंच सांगितलें आहे. नारायण किंवा विष्णु यांच्या नाभिकमलापासून ब्रह्मदेव उत्पन्न झाला असें महाभारतांत म्हटलें आहे (३.१२, ३४; १२. ३४९, १८). वायुपुराणांत, अव्यक्ताच्या पूर्वीं नारायण होता, व अव्यक्तापासून ब्रह्माण्ड व ब्रह्माण्डापासून ब्रह्मदेव झाला अशी उत्पत्ति दिली आहे. या सर्व दंतकथा ॠ. १०.८२, ५-६ वरून घेतल्या असाव्यात. या ॠचा पुढील प्रमाणें आहेत :
परो दिवा पर एना पृथिव्या परो देवेभिरसुरैर्यदस्ति ।
कं स्विद्गर्भे प्रथमं दध्र आपो यत्र देवाः समपश्यन्त विश्वे ॥५॥
तमिद्गर्भे प्रथमं दध्र आपो
यत्र देवाः समगच्छन्त विश्वे ।
अजस्य नाभावध्येकमर्पितं
यस्मिन्विश्वानि भुवनानि तस्थुः ॥६॥
येथें ''आपः'' म्हणजे पाणी प्रथम, आणि त्यावर गर्भ म्हणजे ब्रह्मा (नंतरच्या काळांतील कल्पनेप्रमाणें) व अज म्हणजे नारायण होय. या गर्भांत सर्व देव होते. सर्व नरांचें आश्रयस्थान नारायण होय या समजुतीशीं वरील गोष्ट जुळते. तात्पर्य, मनुस्मृति व पुराणें यांत ब्रह्मा व नारायण एकच असें म्हटलें आहे, त्यास या गोष्टीनें बळकटी येते. पण, ब्रह्मदेवाच्या आधीं नारायण होता असेंहि कित्येक ग्रंथांत म्हटलें आहे; तेव्हां यावरून असें दिसतें कीं, हा नारायण कोणी तरी दुसराच असावा व नारायण हा कोणी ऐतिहासिक किंवा पौराणिक एकच व्यक्ति नसून ती विश्वव्यापी असावी. ब्राह्मणें व आरण्यकें यांच्या काळांत नारायणाबद्दलच्या या कल्पनेची वाढ झाली. शतपथ ब्राह्मणांत (१२ ३,४) म्हटलें आहे की सकाळीं, मध्यान्हीं व संध्याकाळीं दिलेल्या आबापांच्या योगानें यज्ञस्थलापासून, पुरुष नारायणानें स्वतः जागींच राहून, वसु, रुद्र व आदित्य पुढें धाडले. या सर्व उता-यांचा एकंदर निष्कर्ष असा कीं, सर्व लोक, देव, वेद व प्राण यांच्या ठिकाणीं नारायण असून नारायणाच्या ठायीं हें सर्व आहेत. नारायणास परमात्म्याचें पद प्राप्त होण्याच्या मुळाशीं ही कल्पनाच असावी. कारण परमात्माहि सर्वत्र भरला असून त्याच्या ठायीं सर्व आहे. दुस-या एका ठिकाणीं (१३.६, १) असें म्हटलें आहे कीं, आपण स्वतः सर्व चराचर वस्तुमय होऊन शिवाय सर्वांवर आपणांस प्रभुत्व मिळवितां यावें म्हणून पुरुष नारायणानें पंचरात्र यागाची कल्पना काढली; व तें यज्ञसत्र शेवटास नेऊन आपल्या कार्यांत त्यानें सिद्धि मिळविली. म्हणजे या ठिकाणींहि विश्वव्यापी होऊन नारायण सर्वांचा शास्ता झाला असें म्हटलें आहे. ॠ. १०. ९० या ठिकाणीं नारायण हा पुरुषसूक्ताचा कर्ता असें म्हटलें आहे. विश्वकर्मा वगैरेंस सूक्तांचे कर्ते म्हणणें ही जशी एक कल्पना आहे त्याप्रमाणेंच नारायण हा पुरुषसूक्ताचा कर्ता हीहि केवळ कल्पनाच असावी; पुरुष किंवा नारायण या देवतेला उद्देशून हें सूक्त रचिलें असावें. वरील सूक्तांचा, सूक्त ज्या ज्या देवतेचें आहे त्या त्या देवतेशीं संबंध आहे. यावरून नारायण हें पुरुषाचेंच दुसरें नांव असावें, व या दोन नांवांचीच एके ठिकाणीं सांगड घातली गेली असावी असें दिसतें. उपनिषदांत परमात्म्याचे (किंवा पुरुष परमेश्वराचे) जे गुण सांगितले आहेत त्या सर्व गुणांनीं तैत्तिरीय आरण्यकांत नारायणाचें वर्णन केलें आहे. महाभारतांत व पुराणांत नारायण हा देवाधिदेव आहे असें म्हटलें आहे. क्षीरसागरांत शेषाच्या पाठीवर नारायण निजले आहेत असें पुराणांतरीं वर्णन आहे. म्हणजे ॠग्वेदांत सर्वांच्या आरंभीं पाणी व पाण्यावर नारायण, असें जें वर वर्णन आल्याचें सांगितलें आहे, तो संबंध पुराणांतहि कायम ठेवलेला दिसतो. याप्रमाणें नारायण पूजेचा किंवा उपासनेचा विषय होऊन बसला. घोसुंडि येथील शिलालेखांत एका ''नारायण वाटिके'' चा म्हणजे नारायणास अर्पण केलेल्या वाटिकेचा उल्लेख आला आहे.