प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.

अवताराच्या कल्पनेचा उगम- ईश्वर एकच आहे किंवा देव तेवढे येथून तेथून एकच या विचाराचा पगडाहि पुढील काळांतील लोकांच्यावर बसला होता. परमात्मा निरनिराळ्या स्वरूपांत व्यक्त होतो व सर्व देव-उदाहरणार्थ अग्नि, वरुण, मित्र इन्द्र, अर्यमन् - हे एकच आहेत; या दोन कल्पनांची वाढ परस्परविरुद्ध दिशांनीं झाली. निरनिराळे सर्व देव जर एक आहेत तर एका देवास निरनिराळीं रूपें घेतां येणें शक्य आहे. या कल्पनेपासूनच पुढील काळांत प्रामुख्यानें दिसून येणा-या अवताराच्या कल्पनेचा उगम आहे. उपनिषत्कालच्या मोठमोठ्या तत्त्वज्ञांचे विचार पुढील काळांतील सामान्य व्यवहारी माणसास आकलन करतां येण्याजोगे नसल्यामुळें व सामान्य जनसमूहास स्पष्ट आकृतीची विशेष आवश्यकता भासल्यामुळें मूर्तिपूजा प्रचारांत आली. येणेंप्रमाणें वैदिक काळचे प्राचीन देव व इतरहि नवीन देव यांची उपासना सुरू झाली.