प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.

कृष्णासंबंधीं बौद्ध ग्रंथांतील उल्लेख - घटजातक या बौद्ध ग्रंथांत कंसाची बहीण देवगभ्भा व उपसागर यांचीं मुलें ती वासुदेव व त्याचीं इतर भावंडें असें म्हटलें आहे. अंधकवेण्हु व त्याची बायको नन्दगोपा (देवकीची दासी) यांच्या ताब्यांत सदर मुलांस दिलें होतें. देवगभ्भा हा देवकीचाच अपभ्रंश असावा, व देवगभ्भेचीं मुलें जिनें वाढविलीं त्या दासीचें नांव नन्द व यशोदा किंवा गोपा या दोन नांवांचा समास करून बनविलें असावें. त्याचप्रमाणें अन्धकवेण्हु हें नांव अन्धक व ही दोन निरनिराळ्या कुलांचीं निरनिराळीं नांवें असल्याबद्दल खात्रीलायक आधार सांपडतो. यावरून वरील गोष्ट मागाहून बनविलेली असून ख-या इतिहासाचा एक कांहींतरी चुकीचा अवशेष म्हणून राहिली असावी. सगळीं जातकें एकाच वेळीं लिहिलेली नाहींत; कांहीं ख्रिस्तीसनापूर्वींचीं तर कांहीं नंतरचीं असावींत. घटजातक हें दुस-या वर्गांत येईल असें वाटतें. तेव्हां एकंदरींत नन्दगोपा या समासावरून, ख्रिस्ती सनापूर्वी नन्द व यशोदा या कृष्णाच्या पालकर्त्या आईबापांचा त्यांत उल्लेख असला तरी वासुदेव कृष्ण व गोपालकृष्ण यांचें एकीकरण झाले होतें असें म्हणतां येत नाहीं.