प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.
गीतेंतील विचारांचा विकास - गीतेंतील विचारांचा विकास खालीलप्रमाणें झाला असावा. आपणांस ज्या पंथांचा विचार करावयाचा आहे त्यांच्या उदयकालीं संसाराचा त्याग करून अरण्यांत जाऊन राहण्याकडे लोकांची प्रवृत्ति होती. खुद्द बौद्ध, जैन व त्यांसारखे इतर धर्म पंथ संन्यस्त वृत्तीचा अंगीकार करणें ही पारमार्थिक उन्नतीस अत्यंत आवश्यक गोष्ट आहे असें समजत. बौद्ध संप्रदायाचा उदय होण्यापूर्वीहि श्रमणांचें अस्तित्व होतें, असें मानण्यास जागा आहे. जे कांहीं पंथ निर्माण झाले त्यांतील बरेच ईश्वर न मानणारे होते. नैतिक उन्नति घडवून आणण्यांत किंवा नीतिविषयक गोष्टींचा खल करण्यांतच हे प्राचीन लोक गढून गेले होते. तेव्हां ईश्वराच्या अस्तित्वाविषयीं विचाराचा अभाव होता, हे बौद्ध ग्रंथांतील व महाभारतांतील पुष्कळशा नीतिविषयक उता-यांवरून दिसून येते. या त-हेच्या प्रवृत्तीस आळा घालण्यास भगवद्गीतेंत व्यक्त केलेल्या विचाराप्रमाणें एखाद्या जोरदार विचारसंप्रदायाची अत्यंत आवश्यकता होती. ईश्वराविषयींच्या कल्पना उपनिषदांत इतक्या रानोमाळ पसरल्या होत्या कीं, त्यांवरून सर्वांस सहज समजेल असें एक मोक्षसाधनशास्त्र बनविणें अवश्य झालें होतें. अशा परिस्थितींत गीता अस्तित्वांत आली असावी. वासुदेवानें केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता ज्या काळीं रचली गेली, त्या काळीं वासुदेव जिवंत होता असें म्हणतां येणार नाहीं. ती रचली जाण्यापूर्वींच वासुदेवास देवाचें स्वरूप मिळालें असावें. बुद्धानें केलेल्या उपदेशास जेव्हां पुस्तकाचें स्वरूप दिलें गेलें तेव्हां बुद्ध जिवंत होता असें ज्याप्रमाणें म्हणतां येणार नाहीं, त्याप्रमाणेंच हेंहि आहे. दोघांचाहि उल्लेख भगवान् असाच होतो.
जुन्या धर्मांविषयीं भगवंताचें धोरण कसें होतें या प्रश्नास उत्तर द्यावयाचें असल्यास तें पूर्वपरंपरेस धरून होतें असेंच म्हणावें लागतें. धर्माची सांगता करण्यास भगवान् अवतरले, धर्मावर कुरघोडी करण्यास नव्हे. पूर्वींचा धर्म टाकण्याकरितां भगवान् अवतरले नसून तो आचरणांत आणण्याकरितांच ते अवतरले. भगवान् व उपनिषदें या दोघांची यज्ञयागादि कर्में ज्यांत सांगितलीं आहेत अशा श्रौत धर्माकडे पाहण्याची दृष्टि बहुतेक एकच आहे. यज्ञयागांत वासनांस उत्तेजन मिळतें तें अपायकारक होय, व वासनांपासून मिळणारें फलहि नाशवंतच होय. हा एकान्तिक धर्म पूर्वपरंपरेस इतका धरून होता म्हणूनच हिंदुसमाजांत त्याचा प्रसार झाला. तथापि सदर धर्मानें यज्ञयागादिकर्में ज्यांत सांगितलीं आहेत त्या धर्मास समूळ उपटून टाकलें नाहीं. स्त्रियांनां व शूद्रांसहित इतर जातींनां पाळतां येण्यासारखें या धर्माचें स्वरूप होतें; व या धर्माच्या पुढील वाढीच्या काळांत त्या वेळीं जीं कांहीं वैदिक विधिविषयक कर्में अस्तित्वांत होतीं त्यांची व या धर्माची ब्राह्मणांनीं सांगड घातली. परंतु खालच्या जातींस अशी सांगड घालण्याची आवश्यकताच नव्हती व त्यामुळें त्यांच्यावर या धर्माचा बराच पगडा बसत चालला होता. इतर देवांस भजणा-या लोकांकडे पाहण्याची भगवंताची दृष्टि अगदीं उदार स्वरूपाची होती. उपासना, मग ती कोणत्याहि देवाची असो शेवटीं भगवंतासच रुजू होते. परंतु इतर देवांस भजणा-या लोकांस भगवंताचें वास्तविक स्वरूप कळत नसल्यामुळें त्यांची वाट चुकते असें म्हणावें लागतें. वासुदेव-कृष्णाच्या भक्तिपंथास खालच्या जातींवर जो पगडा बसला होता त्याच्याशीं सदर दृष्टींचा थोडासा संबंध असावा.