प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.
उपरिचर वसूच्या गोष्टीवरून निष्कर्ष - याप्रमाणें आपणांपुढें या धर्मांविषयीं दोन (दुसरींत पहिलीचीहि थोडीशी हकीकत आली आहे) हकीकती असून दुसरीची पहिलीशीं सांगड घातली आहे; पैकीं पहिली अधिक जुनी असावी. या संबंधांत खालील गोष्टी ध्यानांत ठेवण्यासारख्या आहेत:- (१) उपरिचर वसूच्या यज्ञप्रसंगीं प्राणिहत्या करण्यांत आली नाहीं; (२) आरण्यकांतील (यांतच उपनिषदें येतात) नियमांप्रमाणें हवन करण्यांत आलें; (३) मुख्य देव देवाधिदेव हरि हा होता; (४) या देवाधिदेवाचें दर्शन याज्ञिकी उपासना करणारास होत नाहीं (उ. बृहस्पति); किंवा एकत, द्वित, त्रित यांच्याप्रमाणें हजारों वर्षे तपश्चर्या करूनहि होत नाहीं; तर उपरिचर वसु याच्याप्रमाणें जो त्यास भक्तीनें भजतो त्यासच होतें. म्हणजे या सर्वांवरून असें दिसतें कीं, ही जी धर्मांत सुधारणा झाली ती बौद्ध किंवा जैन पंथांपेक्षां पूर्वपरंपरेस जास्त धरून आहे. प्राणिहत्त्येबद्दल निषेध आणि यज्ञयागादि कर्मे ज्यांत सांगितलीं आहेत अशी उपासना व तपाचरण या दोहोंची परमेश्वरसाधनाच्या बाबतींत निष्फलता, वगरे गोष्टी या धर्मांत व बुद्ध संप्रदायांतहि आहेत. पण प्रभु हरीची भक्तीनें उपासना करणें, व आरण्यकांस प्रमाण मानणें या दोन गोष्टी हा या धर्माचा विशेष होय. उपरिचर वसूच्या गोष्टीवरून आपणांस एवढाच निष्कर्ष काढतां येतो.
नारदांनीं श्वेतद्वीपास केलेल्या सफरीच्या हकीकतींतहि परमात्म्याची जो भक्तीनें पूजा करील त्यासच फक्त तो दिसेल ही गोष्ट पुन्हां बजावून सांगितली आहे. अशा माणसालाच देवाधिदेव नारायण दर्शन देतो व वासुदेव व इतर तीन व्यूह यांचा धर्म समजावून सांगतो. वासुदेवाच्या नाना अवतारांचा उल्लेख या हकीकतींत आला आहे. यांपैकीं एक अवतार कंसवधार्थ मथुरा येथें व्हावयाचा आहे असें सांगितलें आहे. परमश्रेष्ठ नारायण आणि वासुदेव व इतर चार व्यूह हे सर्व एकच असून सात्वत लोक हा धर्म पाळतात असें शेवटीं म्हटलें आहे.