प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.

गोपाल म्हणजे आभीर लोक - या सर्व विवेचनावरून असें दिसतें कीं, गोकुलांतील कृष्णाची बाल्यासंबंधींची हकीकत ख्रिस्ती शकाच्या आरंभापर्यंत कोणासहि माहीत नव्हती. सदर हकीकतीस मुख्य आधारभूत ग्रंथ म्हणजे हरिवंश होय. त्यांत 'दिनार' हा लॅटिन शब्द आढळतो. यावरून तो ख्रिस्ती शकाच्या तिस-या शतकांत रचला गेला असला पाहिजे; व त्याच्या पूर्वीं कांहीं काळ कृष्णाच्या बाल्यांतील गोष्टी प्रचारांत असाव्यात. कृष्ण ज्या गोपाल जातींत वाढला त्या जातीची स्थिति कृष्णाच्याच शब्दांवरून कळते. इन्द्राचा उत्सव न करतां त्याबद्दल गोवर्धन पर्वताची पूजा करण्याबद्दल नन्दाचें मन वळवितांना कृष्ण म्हणतो (हरिवंश ३८०८):-  ''गोधनावर उपजीविका करून रानावनांत भटकणारे आम्ही गोपाल आहोंत; गाई, पर्वत, वनें या सर्व आमच्या देवता होत.'' हे गोपाल घोषांत किंवा गौळीवाड्यांत रहात, व हे घोष त्यांनां चटकन एका स्थळाहून दुस-या स्थळीं नेतां येत असत. घोष याचा अर्थ 'आभीरपल्ली (म्ह. गौळीवाडा) असा आहे. पण आभीर याचा मूळ अर्थ 'गोपाळ' असा नाहीं. गाईंची निगा राखण्याचा किंवा गाई पाळण्याचा ज्यांचा धंदा होता अशा लोकांचें हें नांव होतें; व नंतर त्याचा गोपाल असा अर्थ झाला.

यावरून गोपाल हे आभीर नांवाच्या एका भटकणा-या जातीचे वंशज दिसतात. मथुरेजवळीत मधुवन व द्वारकेजवळीत अनूप, आनर्त या प्रदेशांच्या टापूंत सदर लोक रहात (हरिवंश ५१६१-६३). वृष्णिकुलांतील पुरुषवर्ग नष्ट झाल्यावर, त्या कुलांतील स्त्रियांस अर्जुन द्वारकेहून कुरुक्षेत्रीं नेत असतां त्यावर आभीर लोकांनीं हल्ला केला असें म. भा. मुसलपर्व अ. ७ या ठिकाणीं म्हटलें आहे. ते म्लेच्छ असून दरोडेखोर होते असें त्यांचें वर्णन आढळतें, व पंच नदाच्या (बहुतकरून हा पंजाब असावा) आसपास ते रहात असत. अपरान्त (कोंकण) व सौराष्ट्र यांच्या आसपास ते रहात असें विष्णुपुराणांत म्हटलें आहे; व वराहमिहिरानेंहि जवळ जवळ हेंच स्थान ठरविलें आहे. नैर्ॠत्यभागांत रहाणारे दक्षिणेकडील लोक असाहि त्यांच्यासंबंधीं उल्लेख आहे (बृहतसंहिता १४.१२, १८). तथापि आभीर लोक हे पुष्कळ मोठ्या प्रमाणांत देशांत शिरले असावेत. प्रथमतः ते निवळ भटकणारे होते; व नंतर पंजाबची पूर्व सरहद्द, मथुरा व दक्षिणेस सौराष्ट्र किंवा काठेवाड या प्रदेशांत - म्हणजे सबंध राजपुताना व त्याच्या ईशान्येस असणारा कांहीं प्रदेश एवढ्या भागांत - त्यांनीं वसति केली असावी. वास्तव्य करून राहिल्यानंतर त्यांनीं अनेक धंदे पतकरले. गुराख्यांचा धंदा हा त्यांपैकींच एक होता.