प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.
गोविन्द हें नांव वासुदेवकृष्णास कसें मिळालें - भगवद्गीतेंत व महाभारतांत अन्यत्र गोविन्द हें नांव आढळतें. हें नांव बरेंच प्राचीन आहे. पाणिनि ३.१, १३८ या सूत्रावरील वार्तिकाप्रमाणें हें नांव बनलें आहे. गोकुलांत असतांना गाईंशीं संबंध असल्यामुळें कृष्णाला गोविन्द हें नांव मिळालें असें मानावें, तर असा संबंध दर्शविणारी या नांवाची व्युत्पात्त महाभारतांत आढळावयास पाहिजे. पण आदिपर्वांत गोविन्द नांव पडण्याचें कारण असें दिलें आहे:-
गां विन्दता भगवता गोविन्देनामितौजसा ।
वराहरूपिणाचान्तर्विक्षोभितजलाविलम् ॥
पुन्हां शांतिपर्वांतहि
नष्टांच धरणीं पूर्वमविन्दं वै गुहागताम् |
गोविन्द इति तेनाहं देवैर्वारिभरीभष्टुतः ॥
असें म्हटलें आहे. याप्रमाणें गोविन्द नांवाचें मूळ या गोष्टीवरून शोधून काढतां येईल; पण बहुतकरून 'गोविद्' याचा हा नंतरच्या काळांत झालेला अपभ्रंश असावा.' 'गोविद्' हें नांव ॠग्वेदांत इन्द्रास 'गाईस पाहून काढणारा' या अर्थी लाविलेलें आहे. वासुदेव-कृष्ण हा जेव्हां सर्वांत मुख्य देव मानला गेला तेव्हां त्यास इन्द्राचें सदर नांव व त्याचप्रमाणें दुसरें 'केशिनिषूदन' हेंहि नांव मिळालें असावें.