प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.

नारायणाचा स्वर्ग म्हणजेच श्वेतद्वीप - या नारायणाचा स्वर्ग म्हणजे श्वेतद्वीपच होय. कथासरित्सागरांत (५४.१९;२१;२३), नरवाहनदत्तास देवसिद्धीनें, श्वेतद्वीपास नारद तुंबर ज्याची स्तुति करीत आहेत अशा शेषशायी भगवान् श्रीहरीकडे नेलें असें म्हटलें आहे. त्याच ग्रंथांत दुस-या एका ठिकाणीं (११५. १०१-३), कांहीं देव श्वेतद्वीपीं गेले व लक्ष्मी ज्याच्या चरणाजवळ बसली आहे अशा शेषशायी भगवान् श्रीहरीस रत्नखचित मंदिरांत त्यांनीं पाहिलें असें वर्णन आहे. बलीनें केलेली स्तुति अगर प्रार्थना म्हणून मोक्षेच्छू योगी व कपिलसांख्य श्वेतद्वीपाप्रत जातात असें हरिवंशात सांगितलें आहे (१४.३८४). यावरून श्वेतद्वीप हा स्वर्ग असून त्यांत नारायण, ज्यास कांहीं ठिकाणीं हरि म्हटलें आहे तो, वास करतो असें दिसतें.

विष्णूचें जसें वैकुंठ, शिवाचा जसा कैलास, गोपाल कृष्णाचा जसा गोलोक, त्याप्रमाणेंच नारायणाचें किंवा हरीचें श्वेतद्वीप; या ठिकाणींच नारद गेले व नारायणाचें दर्शन घेऊन त्यांजकडून एकान्तिक धर्म (वासुदेवधर्म) समजावून घेतला. श्वेतद्वीप म्हणजे श्वेतवर्णी लोक ज्यांत रहात आहेत असा ख्रिस्ती लोकांचा एक देश होता असें मानण्याची जरूर नाहीं असें यावरून दिसून येईल.