प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.

पांचरात्र किंवा भागवत धर्म - याप्रमाणें अर्वाचीन काळांतील वैष्णवपंथाच्या एका मुख्य अंगाचा आपण विचार केला. तथापि प्राचीन पांचरात्र धर्मांतील तत्त्वांचा पायावर वैष्णव संप्रदायांतील ज्या कांहीं शाखा उभारल्या गेल्या आहेत त्यांत सदर अंग हा मोठासा महत्त्वाचा किंवा मुळींच महत्त्वाचा भाग नाहीं असें म्हटलें तरी चालेल. भगवद्गीतेंत सांगितलेला जो धर्म तो एकान्तिक धर्म हें मागें सांगितलेंच आहे. भक्तिमार्ग हा भगवद्गीता व पांचरात्र धर्म या दोहोंतहि सांगितला आहे; आणि पांचरात्र धर्मांत वासुदेव व त्याचे व्यूह यांची उपासनाहि सांगितलेली आहे. तथापि पांचरात्र व भगवद्गीतोपदिष्ट धर्म या दोहोंचा निकट व स्वाभाविक संबंध आहे असें दिसून येत नाहीं. सदर धर्म ख्रि. पू. तिस-या शतकाच्या सुमारास रूढ होता हें शिलालेखांवरून व ग्रंथांवरून आपण ठरविलेंच आहे. या शिलालेखांत व ग्रंथांत गोपालकृष्णाविषयीं कांहीं उल्लेख नाहीं हें सयुक्तिकच आहे. अर्वाचीन वैष्णव संप्रदायाच्या रामानुज व माध्व यासारख्या कांहीं मतांत प्राचीन भागवत धर्मांतील तत्त्वांचा किंवा कल्पनांचा बराचसा आधार घेतला आहे व त्यांत गोपाल-कृष्ण किंवा त्याच्या कथा या वगळल्या आहेत. तथापि वैष्णव संप्रदायाच्या इतर शाखांत विशेषतः लोकांत पसरलेल्या वैष्णव संप्रदायांत ह्या (म्ह. गोपाल-कृष्ण व त्याच्या कथा) अंगावर सामान्यपणें बराच भर दिलेला आढळून येतो.