प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.

भागवत धर्माचा उदय - ही जी विचाराची लाट उठली तिचें पर्यवसान पूर्वेकडील भागांत बौद्ध व जैन या संप्रदायांत झालें. सृष्टीचा उत्पत्तिकर्ता या नात्यानें परमेश्वराचें अस्तित्व या दोन्ही पंथांस संमत नव्हतें; व मतप्रसाराकतिरां वरील कल्पनेचें साहाय्य घेतलेलें दोहोंतहि आढळून येत नाहीं. बौद्ध पंथ तर आत्म्यास स्वतंत्र असें कांहीं अस्तित्व आहे असेंहि मानीत नसे. तथापि संप्रदायप्रसारास आवश्यक असे गुण या दोन्ही पंथांच्या संस्थापकांच्या ठायीं होते. उलटपक्षीं पश्चिमेकडे या काळांत एक नवीन पंथ उदयास आला. ईश्वर मानवांत येऊन राहतो ही कल्पना या पंथाच्या मुळाशीं होती. ख्रि. पू. ४ थ्या शतकांत जे जे धर्म किंवा धर्मसमजुती प्रचारांत होत्या त्या सर्व ''निद्देस'' या पाली पुस्तकांत दिल्या आहेत. उदाहरणार्थ, ''आजीवक लोकांची मुख्य देवता आजीवक; निघंठ लोकाची निघंठ; हत्ती, घोडा, गाय, कुत्रा, वासुदेव, बलदेव वगैरेंच्या उपासकांच्या मुख्य देवता अनुक्रमें हत्ती, घोडा, गाय, कुत्रा, वासुदेव वगैरे वगैरे.''

सदर ग्रंथाच्या कर्त्यानें वासुदेव, बलदेव, अग्नि, चंद्र, सूर्य, ब्रह्मा, हत्ती, घोडा या सर्वांच्या उपासकांनां एका माळेंतच गोंविलेलें आहे.

बौद्ध ग्रंथानें वासुदेवोपासना इतकी तुच्छ लेखली तरी सूर्य, चंद्र, ब्रह्मा, हत्ती, घोडा वगैरेंची उपासना करणारे जे पंथ होते त्या सर्वांनां खालीं दडपून वासुदेवाची उपासना ज्यांत सांगितली आहे अशा पंथानें हिंदुस्थानच्या ब-याच मोठ्या प्रदेशांत प्रामुख्य मिळविलें. हा पंथ उदयास कसा आला व त्याचा प्रसार कसा झाला हें पाहूं.