प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.

महाभारतांतील नारायणीय आख्यान - वासुदेव ही मध्यवर्ती देवता कल्पून त्याची उपासना ज्यांत सांगितली आहे असा एक पंथ ख्रि. पू. तिस-या चवथ्या शतकापूर्वीं अस्तित्वांत होता; व या पंथाच्या अनुयायांस ''भागवत'' म्हणत, असें पुराव्यानिशीं निर्विवाद सिद्ध झाल्यावर आतां या विषयाच्या वाङ्‌मयाचें, विशेषतः महाभारतांतील यासंबंधीं माहितीचें परीक्षण करूं. महाभारताचा किंवा त्याच्या कोणत्याहि भागाचा काळ निश्चितपणें ठरवितां येत नसल्यामुळें त्यांतील पुराव्यास अर्थात् प्राधान्य नाहीं. श्रीमच्छंकराचार्यांनीं शांतिपर्वांतील नारायणीय आख्यानांतून अवतरणादाखल श्लोक घेतले आहेत. त्यांवरून सदर आख्यान श्री. शंकराचार्यांच्या आधींचें आहे हें खास. सदरहू नारायणीय आख्यान पुढें दिल्याप्रमाणें आहे:-

नर व नारायण यांचें दर्शन घेण्यास नारद बदरिकाश्रमीं गेले होते. तेथे नारायण उपासना करण्यांत गुंतलेले पाहून त्यांस नारदांनीं प्रश्न केला कीं, ''हे नारायणा, आपण स्वतः देवाधिदेव अहांत; मग आपण कोणाची पूजा करतां ?'' तेव्हां नारायणांनीं उत्तर केलें, ''वर्तमान व भविष्य गोष्टींचें उगमस्थान अशी जी माझी मूल प्रकृति तिचें मी पूजन करीत आहे. नर व नारायण, त्याचप्रमाणें कृष्ण व हरि हे जे धर्माचे पुत्र ते सर्व एकाच परमेश्वराचीं चार (निरनिराळीं) स्वरूपें होत.''

तेव्हां त्या मूल प्रकृतीचें दर्शन घेण्याकरितां नारदांनीं आकाशांत उड्डाण केले व मेरुपर्वताच्या एका शिखरावर (गन्धमादनपर्वतावर) ते उतरले; तेथें त्यांनीं निरिंद्रिय, निराहारी, शुद्ध, आतपत्राप्रमाणें मस्तकें असलेले, मेघांच्या सारखा स्वन (आवाज) असलेले व भगवानाची उपासना करणारे असे श्वेतवर्णी लोक पाहिले.

युधिष्ठिरानें भीष्मास हे लोक कोण व ते असे कशानें झाले असा प्रश्न केल्यावरून भीष्मांनीं उपरिचर वसु राजाची पुढील गोष्ट सांगितली.