प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ६ वें.
भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-
आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास.

विष्णूचे किंवा नारायणाचे अवतार - दोन देवांचें एकीकरण व एखाद्या देवाचा अवतार या दोहोंत मुख्य फरक हा आहे कीं, अवतार घेणारा देव मानवाप्रमाणें किंवा पशूप्रमाणें आचरण करतो; पण त्याच्या अंगीं अद्भुत दैवी शक्ति असते. एकीकरणाच्या कल्पनेपासून अवताराची कल्पना हें अवस्थांवर होणें साहजिक आहे. अवताराच्या कल्पनेंत देह सामान्य जनासारखा व आंतील बुद्धि मात्र ईश्वरी हा अर्थ येतो.

विष्णूचे किंवा नारायणाचे अवतार निरनिराळ्या ग्रंथांतून निरनिराळे सांगितले आहेत. नारायणीय आख्यानांत एके ठिकाणीं फक्त सहाच अवतार सांगितले आहेत. ते येणेंप्रमाणें:  वराह, नृसिंह, वामन, भार्गव राम, दाशरथि राम व कृष्ण (कंसवधार्थ धारण केलेला). यानंतर त्याच आख्यानांत दुस-या ठिकाणीं दशावतार सांगितले आहेत. हंस, कूर्म व मत्स्य हे आरंभीं आणि कल्की हा शेवटीं असे चार, व प्रथम सांगितलेले सहा मध्यें, येणेंप्रमाणें हे दहा अवतार आहेत. कल्कीच्या आधींचा सात्वत म्हणजे वासुदेव-कृष्णाचा अवतार आहे. तेव्हां दुस-या ठिकाणचा हा उतारा दशावतारांची कल्पना निघाल्यानंतर घुसडून दिलेला असावा. हरिवंशांत प्रथम सांगितलेले सहा अवतार आढळतात. वायुपुराणांत अवतारांबद्दल दोन ठिकाणीं उल्लेख आले आहेत. पहिल्या ठिकाणीं बारा अवतार सांगितले आहेत, पण यांपैकीं कांहीं शिवाचे व इन्द्राचे अवतार आहेत. दुस-या ठिकाणीं दहा अवतार सांगितले आहेत. त्यांत वर सांगितलेले सहा आणि दत्तात्रेय, एक नांवरहित, वेदव्यास व कल्की हे चार येतात. वराहपुराणांत सर्वांच्या परिचयाचे असे दहा अवतार सांगितले आहेत; म्हणजे वर सांगितलेले सहा व मत्स्य, कूर्म, बुद्ध व कल्की हे चार मिळून दहा. अग्निपुराणांतहि हेच दहा सांगितले आहेत. भागवत पुराणांत तीन ठिकाणीं अवतारांची संख्या दिली आहे. पहिल्या ठिकाणीं २२ (प्रथम स्कंध, अ. ३), दुस-या ठिकाणीं २३ (द्वितीय स्कंध, अ. ७) व तिस-या ठिकाणीं १६ (एकादश स्कंध, अ.४) अवतार सांगितले आहेत. या पुराणांत सांगितलेल्या अवतारांत सनत्कुमार, नारद, कपिल, दत्तात्रेय, ॠषभ व अन्वन्तरि हेहि दिले आहेत हें ध्यानांत ठेवण्याजोगें आहे. या सर्व अवतारांपैकीं दत्तात्रेय व राम यांचीच उपासना समाजांत जास्त प्रमाणांत परसली आहे. बाकीच्या अवतारांच्या उपासनेचा प्रसार बहुतेक कोठेंच झालेला दिसत नाहीं. कृष्णावतयार या अवतारांत येत असला तरी तो अगदीं स्वतंत्र आहे. त्याची भक्ति किंवा उपासना सर्वत्र पसरली आहे याचें कारण तो अवतारी पुरुष समजला जातो हें नसून सात्वत लोकांत प्रथम उदय पावलेल्या अशा एका नवीन पंथाचे अनुयायी ज्यास अतिशय भक्तिभावानें भजतात असा एक तो विशिष्ट देव आहे हें होय.